अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल; 'पुष्पा २'च्या प्रीमियर दरम्यान महिलेचा मृत्यू झाल्यामुळे केली तक्रार

    06-Dec-2024
Total Views |
 
pushpa 2
 
 
हैदराबाद : मुंबईतच नाही तर संपूर्ण देशभरात सध्या पुष्पाचीच हवा आहे. सुकुमार दिग्दर्शित आणि अल्लू अर्जून अभिनित पुष्पा २ : द रुल हा चित्रपट देशभरात ५ डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित झाला. एकीकडे या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत असून दुसरीकडे मात्र अल्लू अर्जूनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चित्रपट प्रदर्शनापुर्वी ४ डिसेंबरच्या संध्याकाळी हैदराबादमध्ये विशेष प्रीमियर झाला होता. यावेळी अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि चित्रपटाची टीम त्यांच्या कुटुंबीयांसह आणि चाहत्यांसह हैदराबादच्या संध्या चित्रपटगृहामध्ये चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. यावेळी अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांचे नियंत्रण सुटले आणि चेंगराचेंगरी झाली, ज्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आणि तिचा लहान मुलगा जखमी झाला. याच प्रकरणी अल्लू अर्जूनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
दरम्यान, या दुर्दैवी घटनेबद्दल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३५ वर्षीय रेवती असे पीडितेचे नाव असून तिच्यासोबत तिचा १३ वर्षांचा मुलगा श्रीतेज होता. झालेल्या चेंगराचेंगरीत मुलगा जखमी झाल्यामुळे त्याला ४८ तासांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. मृत कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम १०५ आणि ११८(१) अंतर्गत चिक्कडपल्ली पोलिस स्थानकात अल्लू अर्जून, त्याची सुरक्षा टीम आणि चित्रपट व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, अल्लू अर्जुन त्याच्या वैयक्तिक सुरक्षेसह चित्रपटगृहामध्ये पोहोचला होता. त्यानंतर लोकंही त्याच्या पाठोपाठ आत जाताना त्याच्या वैयक्तिक सुरक्षा पथकाने लोकांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली, ज्यामुळे परिस्थिती आणखी बिघडली, कारण थिएटरमध्ये आधीच प्रचंड गर्दी होती. हैदराबादचे पोलीस आयुक्त सी.व्ही. आनंदने एका निवेदनात म्हटले आहे की, ‘चित्रपटगृह व्यवस्थापन किंवा कलाकारांच्या टीमकडून ते चित्रपटगृहामध्ये येतील असा कोणताही संवाद झाला नव्हता. चित्रपटगृहामधील गोंधळाच्या परिस्थितीला जबाबदार असलेल्या सर्व व्यक्तींवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल.’ दरम्यान, घडलेल्या प्रकारानंतर अल्लू अर्जूनच्या कुटुंबियांनी पीडीतांना आर्थिक मदत देऊ केली आहे.