ती आपली हिंदुत्वाची शाल काढून टाकली होती. वाटलं होतं की हिरवं वादळ पेटेल आणि आम्ही सत्तेतले राजे होऊ. पण, नाही. शाल उतरवली आणि हिरवं वादळ पेटलं नाही, तर भगवं वादळ उसळलं. त्यात आम्ही अगदी पालापाचोळा झालो. कोण आहे रे तिकडे? आणा ती आमची हिंदुत्वाच्या मुखवट्याची शाल. अरे कोणीच नाही? हं. आता हे वीसचं राहिले आणि त्यात तो पुन्हा आलाय.
‘धनुष्यबाण’ हे त्या एकनाथचे आणि ‘घड्याळ’ हे अजित पवारांचे हे असे लोकांनी ठरवून टाकले. त्यामुळे पिताश्रींचे नाव वापरून महाराष्ट्राच्या जनतेला भावनिकही बनवू शकत नाही. मी महाराष्ट्राला प्रश्न विचारला होता की, महाराष्ट्र माझ्याशी असे वागेल असं मला वाटलं नव्हतं. मला वाटले की, तेव्हा महाराष्ट्रातून जनसागर उसळेल. म्हणेल, नाही नाही साहेब, आम्ही तुमच्यासोबत आहोत. पण, महाराष्ट्राने चकार शब्द काढला नाही. काय म्हणता? आम्ही हिंदुत्ववादाला विसरलो आणि हिंदूविरोधी असणार्यांचे लांगूलचालन केले, याचा लोकांना राग आला? आम्हालाही हे कळतं बरं का, उगीच नाही हिंदुत्वाची ती शाल मी आता पुन्हा ओढणार आहे. काय म्हणता, लोकांना कळते की घेतलेली शाल परत केव्हाही टाकून देईन. पुढचं पुढे. आता लोकांना पटवायचं तर हिंदुत्व...हिंदुत्व करावंच लागेल मला. मी बांगलादेशच्या हिंदूंबद्दल बोलणार, माझ्या नगरसेवकांना आमदार-खासदारांना पण हे बोलायला लावणार. आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका येतील. त्यासाठी या हिंदुत्वाच्या शालीची गरज लागणार. बरं आठवलं. ‘तो’ म्हणे पुन्हा आलाय. त्यांना माझे चॅलेंज आहे, जनतेची कामे करून, वाईट शक्तींशी संघर्ष करून कुणीही मुख्यमंत्री होऊ शकतं. पण, जन्मजात सगळं आयतं मिळवण्यासाठी माझ्यासारखं भाग्य लागतं बरं का! मी मुख्यमंत्री असताना घरात बसून निष्क्रीयपणे महाराष्ट्राची जशी सत्ता चालवली, तशी निष्क्रीयपणे सत्ता चालवू शकतील का ते? नाही ना? ‘पुन्हा येईन’ म्हणणारे आले आणि त्यांना तर जनसेवा आणि महाराष्ट्र विकास असे काय काय करायचे आहे. त्यांचा जन्मच म्हणा काम करण्यासाठीच झालाय. मला पण देखावा करावाच लागणार. कोण आहे रे तिकडे? आणा ती काढून ठेवलेली हिंदुत्वाच्या मुखवट्याची शाल.
पूतना मावशीचे प्रेम
बांगलादेशातील हिंसाचाराने जगाच्या पाठीवरचा अवघा हिंदू व्यथित झाला. या पार्श्वभूमीवर प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारला विनंती केली की, “केंद्र सरकारने संयुक्त राष्ट्रांशी संपर्क साधत तत्काळ बांगलादेशात शांती प्रस्थापित करावी. तसेच, बांगलादेशातील पीडित भारतीयांना तत्काळ तिथून भारतात परत आणण्यात यावे.” ममता बॅनर्जी यांची एकंदर कारकीर्द पाहता, त्यांनी कधीही हिंदूंबद्दल ठोस भूमिका घेतली नाही. आता त्यांना बांगलादेशात हिंदूंवर होणार्या अत्याचाराबद्दल कशी काळजी वाटू लागली? तर एक लक्षात घ्यायला हवे की, ममता बॅनर्जींचे विधान काय आहे, त्यांनी ‘बांगलादेशातील पीडित हिंदूना परत आणा’ असे म्हटले नाही, तर त्या म्हणाल्या ‘पीडित भारतीयांना बांगलादेशातून परत भारतात आणा.’ इथेही त्यांनी राजकारण केले. त्या म्हणाल्या असत्या की, बांगलादेशातील पीडित हिंदूंना परत आणा, तर ममता या हिंदूसमर्थक आहेत, अशी प्रतिमा निर्माण झाली असती. त्याचा फटका ममता यांना पडला असता. कारण, ममता सत्तेत आहेत. त्याचमुळे एकगठ्ठा मुस्लीम मतदारांच्या मेहेरबानीने. त्यामुळे ममता यांनी शब्दप्रयोग वापरला ‘बांगलादेशातील पीडित भारतीय.’
असो. आपल्या मुख्यमंत्री रामनामाला विरोध करतात, हिंदूविरोधी भूमिका घेतात, हे प. बंगालच्या हिंदूंना माहिती आहे. याच प. बंगालच्या अनेक हिंदूंचे नातेवईक बांगलादेशात आहेत. ममता बांगलादेशातील पीडितांची बाजू घेतात, म्हणून हे प. बंगालचे हिंदू आपल्यासोबत राहतील, असे ममता यांना वाटते. दुसरे असे की, ममता यांना आताच बांगलादेशातील पीडितांची काळजी का बरं वाटली? आपल्या देशातही काश्मीर, केरळ आणि अगदी प. बंगालमध्येही पीडित हिंदू नाहीत का? काही महिन्यांपूर्वीच ममतांच्या राज्यात त्यांच्या तृणमूलच्या पदाधिकार्यांनी मागासवर्गीय महिलांवर अत्याचार केले होते. काही महिन्यांपूर्वीच एका डॉक्टर तरुणीचा निघृण खून झाला होता. त्यावेळी ममता यांनी चकार शब्द काढला नाही. मात्र, आज त्यांना बांगलादेशाची काळजी वाटते. कारण, ममता यांना कळून चुकले आहे की, हिंदू आता एक झाला आहे. धार्मिकदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्याही. जर आपण हिंदूचे समर्थन केले नाही, तर आपल्यालाही महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीसारखे घरी बसावे लागेल, हे ममता यांनी ओळखले.शेवटी काय, ममता यांचे हिंदूप्रेम म्हणजे पूतना मावशीची मायाच!
योगिता साळवी
९५९४९६९६३८