कोटी कोटी रुपे तुझी

    05-Dec-2024
Total Views |

fadnavis
  
एकावेळी एक माणूस किती रुपे घेऊ शकतो? अगदी शब्दशः याचा अर्थ नाही घेतला, तरी किती भूमिका एखादा माणूस सक्षम आणि यशस्वीपणे निभावू शकतो?
 
‘जलदूत’, ‘आरोग्यदूत’, ‘मेट्रोमॅन’, ‘इन्फ्रामॅन’, देशातील एकूण परदेशी गुंतवणुकीपैकी तब्बल ५२ टक्के परदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात आणणारे बिझनेस माईंडेड देवेंद्रजी ते लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ, देवाभाऊ. बरं, या सगळ्या भूमिका निभावताना त्यांनी कुठल्याही एका पदाची अपेक्षा ठेवली वा आधार घेतला का, तर याचे उत्तर ‘नाही’ असेच कोणीही देईल.
२०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला जे अपयश आले, त्याची जबाबदारी एकट्या स्वतःवर घेणारे आणि २०२४ या वर्षातच झालेल्या महाराष्ट्र विधानसभेतल्या दिग्विजयी बहुमताचे श्रेय आपल्या कार्यकर्त्यांना देऊन टाकणारे देवेंद्र फडणवीस नक्की बनले आहेत तरी कशाचे, असा प्रश्न आम्हा कार्यकर्त्यांना पडत राहतो.
 
देवाभाऊंच्या राजकीय कारकिर्दीतला महत्त्वपूर्ण असा काळ २०१४ सालपासून सुरू झाला. यावर्षी गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली व स्वतःचा कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण करणारे ते महाराष्ट्रातले दुसरे मुख्यमंत्री ठरले. मग २०१९ सालच्या निवडणुकीनंतर मित्रपक्षाने केलेली गद्दारी व बहुमत मिळूनही या गद्दारीमुळे वाट्याला आलेले विरोधी पक्षनेतेपद निभावताना त्यांनी दाखवलेला झंजावात आम्ही सगळे पाहत होतो. महाविकास आघाडीचा ‘कोविड’ काळातला अपयशी कारभार व त्यामुळे पिचत जाणार्‍या महाराष्ट्राच्या जनतेचे हाल न बघवल्यामुळे प्रचंड राजकीय पेच डावपेच खेळून बनवलेले महायुती सरकार...
 
यात आम्हाला पाहायला मिळाला तो देवेंद्रजींचा चाणक्य अवतार. त्यानंतर यातही पुढे एक मोठा ट्विस्ट आला. ‘मी पुन्हा येईन’ असे वचन देऊन २०१९ सालच्या निवडणुकांना सामोरे गेलेले देवेंद्रजी, सलग दुसर्‍यांदा शंभरच्या पुढे (१०५) आमदार निवडून आणणारे देवेंद्रजी, आता पुन्हा एकदा या नाट्यपूर्ण राजकीय घडामोडीनंतर, अडीच वर्षांनंतर का होईना मुख्यमंत्री होणार. या आनंदात आम्ही कार्यकर्ते असतानाच एकनाथ शिंदे यांच्या नावाची मुख्यमंत्रिपदासाठीची घोषणा खुद्द आमच्या देवेंद्रजींनी केली.
काय होते आहे, आपण काय ऐकतो आहे या धक्क्यात आम्ही कार्यकर्ते असताना, ‘मी सरकारमध्ये असणार नाही, मी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेचे काम यापुढे करेन,’ असे देवेंद्रजींनी जाहीर करून टाकले.
  
महाविकास आघाडीचे दडपशाही सरकार गेले. देवेंद्रजीच्या नेतृत्वातले महायुती सरकार सत्तेवर आले. आमचा नेता आता सर्वोच्च पदावर आम्हाला पाहता येईल, ही आमची अपेक्षा फोल ठरली होती. त्याच दिवशीच्या संध्याकाळी देवेंद्रजींनी पक्षनेतृत्वाच्या आदेशावरून उपमुख्यमंत्री पद स्वीकारले आणि आमच्या मनात त्यांच्याबद्दलचे आदराचे अढळपद कोरून ठेवले.
 

shivani gokhale 
 
उपमुख्यमंत्री पदाबरोबरच गृहमंत्री पद देवेंद्रजींकडे आले आणि पुढे ज्या तडफेने त्यांनी ते निभावले, ते सार्‍या महाराष्ट्राने पाहिले आहे. १०५ आमदार निवडून आणणारा, राज्यात सर्वांत जास्त जागा मिळवणार्‍या भारतीय जनता पक्षाचा हा नेता शपथ घेतल्याच्या दुसर्‍या क्षणी कर्तव्यावर रुजू झाला. अर्थात विरोधी पक्षनेते पदावर असतानाही ‘कोविड’ काळात रस्त्यावर उतरून काम करताना आम्ही त्यांना पाहिले होतेच. कर्तव्याच्या आड त्यांनी कधी पद येऊ दिले नाही, हे महाराष्ट्र पाहत होता.
 
गलिच्छ टिंगलटवाळी, अवहेलना, उपमर्द, स्वतःच्या कुटुंबावर उडवलेले लांच्छन, देवस्वरूप आईवरही विरोधकांनी केलेले कटू वार, हे सगळे पचवून फक्त आणि फक्त महाराष्ट्राचा विकास, येथील जनतेचे प्रश्न यात देवेंद्रजी इतके गढून गेले की, हे असे जहरी बाण त्यांच्यावर कुठलाही नकारात्मक परिणाम करू शकले नाहीत.
 
देवेंद्रजी स्वतःच्या कर्तृत्वाने ‘लोकनेते’ झाले.कर्तव्याच्या कसोटीवर खणखणीत वाजणार्‍या या नाण्याला महाराष्ट्राच्या जनतेने नुकत्याच झालेल्या नोव्हेंबर २०२४ सालच्या विधानसभा निवडणुकीत दणदणीत कौल दिला. सलग तिसर्‍यांदा देवेंद्रजींच्या नेतृत्वात भाजपने महाराष्ट्रात शंभर आमदारांचा टप्पा सहज पार केला. मोदीजींच्या आणि अमितजी शाह यांच्या मार्गदर्शनात तब्बल १३२ आमदार देवेंद्रजींनी निवडून आणले.
 
महाराष्ट्राला लागू पाहणारे जातीद्वेषाचे ग्रहण येथील जनतेने देवेंद्रजींना उच्चांकी बहुमत देऊन कायमचे सोडवले. कुठल्याही एका जातीचा हा नेता नसून, छत्रपती शिवाजी महाराजांनी आखून दिलेल्या अठरापगड जाती आणि बाराबलुतेदारांचे तत्त्व पाळणारा, त्यांना सोबत घेऊन चालणारा, त्यांच्यासाठी झिजणारा हा नेता आहे आणि महाराष्ट्राच्या सर्वोच्च, मुख्य पदावर तो आम्हाला हवा आहे, हेच जनतेला या निकालातून सांगायचे आहे.
 
‘सरकारे आएंगी जाएंगी, पार्टीयां बनेंगी, बिगड़ेंगी मगर यह देश रहना चाहिए’ या स्व. अटलजींच्या ओळी स्मरणात ठेवणार्‍या देवेंद्रजींनी ‘वाट्याला कुठलीही भूमिका येऊ देत, कुठलेही पद असो व नसो, काम करत राहा, तुमचे दातृत्व पार पाडत राहा’ हेच आजवर स्वतःच्या आचरणातून आम्हा कार्यकर्त्यांना शिकवले आहे.
 
शिवानी गोखले