मुंबई : अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषदेचे राष्ट्रीय अधिवेशन १९ ते २२ डिसेंबर दरम्यान पुणे येथे होणार आहे .दैवज्ञ समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष व संमेलनाध्यक्ष डॉ. गजानन रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली चार दिवस हा सोहळा होणार असून श्री अष्टभुजा दुर्गादेवी इस्टेट ट्रस्ट संस्थेने त्याची जय्यत तयारी केली आहे. देशभरातील असंख्य दैवज्ञ बांधव या अधिवेशनास उपस्थित राहणार आहेत. याचवेळी दहावे दैवज्ञ साहित्य संमेलनही पुण्यनगरीत रंगणार आहे.
दैवज्ञ समाजोन्नती परिषदेचे २१ वे राष्ट्रीय अधिवेशन व दहाव्या दैवज्ञ साहित्य संमेलनाचा भव्य सोहळा गुरूवारी १९ ते रविवारी २२ डिसेंबरपर्यंत पुण्यातील शुक्रवार पेठ येथील गणेश कला क्रीडा मैदानावर होणार आहे. गुरूवारी १९ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता भव्य शोभायात्रा निघणार असून शुक्रवारी २० डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता उद्घाटनाचा सोहळा होणार आहे. पद्माकरराव पांडुरंगपंत रत्नपारखी व स्व. सुमती रत्नपारखी नगरीत सकाळी १० वाजता केंद्रीय सहकार व नागरी वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. गजानन रत्नपारखी व अजय कारेकर यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी दैसपचे उपाध्यक्ष डॉ. आनंद पेडणेकर, नाना शंकरशेट प्रतिष्ठानचे अध्यक्ष, समाजश्रेष्ठी सुरेंद्र शंकरशेट यांच्यासह डॉ. गजानन रत्नपारखी अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करणार आहेत.
परिसंवाद रंगणार
शनिवारी सामाजिक कार्यात युवांची वानवा, ज्ञातीपत्रके व समाजप्रबोधन, कौटुंबिक जबाबदारी व महिलांचे सामाजिक योगदान, महिलांचा राजकारणातील सहभाग, वधु-वर मेळाव्यातील आजची वास्तविकता, कवीसंमेलन आदी परिसंवाद होणार आहेत. याचवेळी दुपारी दुपारी ३ वाजता दैवज्ञ साहित्य संमेलनाचे उद्घाटन साहित्य संमेलनाध्यक्ष कृष्णी वाळके यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापुरकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
साहित्य, नाट्य, ग्रंथ हंडी व कार्यकर्ता गौरव
रविवारी २२ डिसेंबर रोजी संत साहित्य, प्रेरणादायी आत्मचरित्र, पत्रकारिता आणि साहित्य, नाट्य व साहित्य, ग्रंथ हंडी आदींवर मान्यवर लेखक, साहित्यिक मार्गदर्शन करणार आहेत. याचवेळी दैवज्ञ साहित्य मंच पदाधिकारी, यजमान संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात येणार असून दुपारी तीन वाजता या चार दिवसीय अधिवेशनाचा समारोप होणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष विजय कारेकर व दैसपचे सरचिटणीस चंद्रशेखर दाभोळकर यांनी दिली.