जर एकनाथ शिंदेंनी शपथ घेतली नाही तर आम्हीही मंत्रीपद स्वीकारणार नाही : उदय सामंत

05 Dec 2024 13:33:43
 
Uday Samant
 
मुंबई : जर एकनाथ शिंदेंनी शपथ घेतली नाही तर आम्हीही मंत्रीपद स्वीकारणार नाही, असे वक्तव्य शिवसेना नेते उदय सामंत यांनी केले आहे. लवकरच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. मात्र, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्विकारणार की, नाही याबाबत अद्याप कुठलीही स्पष्टता आलेली नाही. दरम्यान, यावर आता उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली.
 
उदय सामंत म्हणाले की, "एकनाथ शिंदे यांच्याशिवाय कुणीही उपमुख्यमंत्री होण्यासाठी इच्छूक नाही. तेच आमचे नेते आहेत. एकनाथ शिंदे साहेबच उपमुख्यमंत्री होतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. या गोष्टीला आता पुर्णविराम देणे गरजेचे आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी जर उपमुख्यमंत्रीपद स्विकारले नाही तर आम्हीदेखील कोणतीही जबाबदारी स्विकारणार नाही, अशी स्पष्ट भूमिका आम्ही शिंदे साहेबांना सांगितली आहे. या सरकारमध्ये आमचे नेते एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्विकारतील आणि महाराष्ट्राच्या जनतेसाठी आणलेल्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी ते देवेंद्रजींना सहकार्य करतील. एकत्र बसून महाराष्ट्रातील सगळे निर्णय होतील. त्यामुळे आता उपमुख्यमंत्रीपदासाठी इतर कोणाचीही नावे घेऊ नये. आमच्या सर्वांचे राजकीय करियय आम्ही शिंदेंच्या हातात दिले आहे. त्यामुळे त्यांना डावलून कुणीतरी काहीतरी करत असेल तर आम्हीसुद्धा गप्प बसणार नाही," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  महाराष्ट्राच्या विकासासाठी विरोधकांनी सहकार्य करावं! शपथविधीला उपस्थित राहण्यासाठी बावनकुळेंचं आवाहन
 
माझी प्रतिमा मलिन करण्याचा डाव!
 
"एकनाथ शिंदे साहेब हे संघटन प्रमुख म्हणून काम करणार होते. परंतू देवेंद्रजींनी त्यांना सांगितले की, शिवसेना विलीन होणार असल्याने तुम्ही उपमुख्यमंत्रीपद घ्यावे. त्यानंतर शिंदे उपमुख्यमंत्रीपद घ्यायला तयार झाले," हे सगळे मी सांगितले असल्याची बातमी एका नामांकित वृत्तपत्राच्या वेबसाईटवर आली आहे. परंतू, अशा वाईट पद्धतीने न बोललेले प्रसार माध्यमांमध्ये येणे हे फार चुकीचे आहे. मी असे काहीही बोललो नाही. सगळ्या पत्रकार परिषदा मी कॅमेऱ्यासमोर घेतल्या आहेत. पण हे मी बोललो नसताना ते माझ्या तोंडी घालून कदाचित शिंदे साहेबांच्या मनात असलेली माझी प्रतिमा मलिन करण्याचा हा डाव आहे. संबंधित वृत्तपत्राच्या लोकांशी मी बोललो आहे. याच्याशी त्यांचा काहीही संबंध नसून हे एडिट करून तयार केले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे मी स्वत: याबाबत तक्रार दाखल करणार आहे," असेही उदय सामंत यावेळी म्हणाले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0