आझाद मैदानावर अवतरले भगवे वादळ!

मुख्यमंत्री देवाभाऊंना आशीर्वाद देण्यासाठी लाडक्या बहिणींची विशेष उपस्थिती

    05-Dec-2024
Total Views |

Devendra Fadnavis
 
मुंबई : भारत माता की जयsss, जय श्रीरामsss, वंदे मातरम्! या घोषणांनी मुंबईतील आझाद मैदान परिसर दुमदुमून गेला. लोकप्रिय नेते, लाडक्या बहिणींचे देवाभाऊंच्या शपथविधीला भाजपसह महायुतीतील कार्यकर्त्यांच्या मोठा जनसमुदाय उपस्थित होता. महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीसांच्या रुपात २१वे मुख्यमंत्री लाभले. दुपारी १ वाजल्यापासूनच राज्यातील विविध भागातून भाजपचे नेते, कार्यकर्ते, सर्वसामान्यांसह अन्य मान्यवर मंडळींना हा 'महाशपथविधी सोहळा' याची देही याची डोळा पहाण्याची उत्सुकता होती.
 
लाडक्या बहिणी, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी सुरुवातीला 'फोटोसेशन' करत हा सोहळा साजरा केला. 'बटेंगे तो कटेंगे', 'एक है तो सेफ है', 'लाडका देवाभाऊ', मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अशा आशयाचे बॅनर आणि महायुतीचे ध्वज फडकवत कार्यकर्त्यांच्या जथ्थे शपथविधी सोहळ्याच्या ठिकाणी मिळेल त्या वाहनाने पोहोचले होते. "आमचे लाडके देवाभाऊ मुख्यमंत्री होणार म्हटल्यावर आम्ही बहिणी आवर्जून येणारच!", असा भाव महिलावर्गाच्या चेहऱ्यावर दिसत होता. विशेषतः भाजप महिला कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत होता.
 
राज्यासह देशभरातील संतमहंत, राजकीय नेते, विविध प्रशासकीय मंडळी आणि अभिनेत्यांसह असंख्य 'व्हीव्हीआयपी' मंडळींची विशेष उपस्थिती होती. राज्य शासनाच्या राजशिष्टाचार विभागाकडे या संपूर्ण सोहळ्याची जबाबदारी असल्याने कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासन, राज्य शासकीय कर्मचारी आणि भाजपसह महायुतीचे हजारो कार्यकर्ते गर्दीचे नियोजन करत होते. उपस्थितांनीही अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने या सोहळ्याची मर्यादा पाळली. त्यामुळे आयोजकांच्या अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी आल्यानंतरही कार्यक्रम सुनियोजितरित्या पार पाडला.
 
भाजप कार्यकर्त्यांच्यासाठी आनंदाचा दिवस
 
२०१९ मध्ये जनादेश हा देवेंद्र फडणवीसांच्या पाठिशी असूनही उद्धव ठाकरेंच्या सत्तेच्या हव्यासापोटी मुख्यमंत्री होता आले नाही. त्यानंतर महाराष्ट्रात सत्तांतर झाले खरे मात्र, तेव्हाही देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री बनता आले नाही. यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला होता. गेल्या पाच वर्षांची कसर आजच्या दिवसाने भरून काढल्याचे भाव भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या चेहऱ्यावर होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतल्यानंतर उपस्थितांनी एकच जल्लोष केला.