मुंबई, दि.५ : प्रतिनिधी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतीच नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर इंटिग्रेटेड ट्रॅक मॉनिटरिंग सिस्टम (ITMS) आणि रोड कम रेल इन्स्पेक्शन व्हेईकल (RCRIV)ची पाहणी केली. ही अत्याधुनिक प्रणाली भारतीय रेल्वेच्या ट्रॅक सुरक्षा आणि कामकाजाची गुणवत्ता सुधारण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.
यावेळी पत्रकारांना संबोधित करताना मंत्री वैष्णव म्हणाले, आरसीआरआयव्हीने आमचे ट्रॅकमन, गँगमेन, कीमेन आणि पीडब्ल्यूआय (स्थायी मार्ग निरीक्षक) यांच्या कामाच्या पद्धतीत मोठे बदल केले आहेत. याबदलांमुळे केवळ सुरक्षितता सुधारेल असेच नाहीतर कार्य आणि जीवनाची गुणवत्ता देखील सुधारेल. येत्या पाच वर्षांत सर्व रेल्वे झोनमध्ये ही नवीन प्रणाली लागू करण्याचे लक्ष्य आहे. विशेषत: ट्रॅक तपासणी आणि देखभालीच्या आधुनिकीकरणामध्ये रेल्वे विकासाचा हा एक महत्त्वाचा भाग असेल.
ही तांत्रिक प्रणाली केवळ ट्रॅकचे निरीक्षण आणि मोजमाप करण्यात मदत करेल असे नाहीतर रेल्वेचे कामकाज अधिक सुरक्षित आणि प्रभावी बनवेल. प्रत्येक रेल्वे झोनमध्ये ही यंत्रणा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पूर्वी दर चार महिन्यांनी होणारी ही देखभाल केली जात. मात्र, आता दर दोन महिन्यांनी केली जाईल. या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे भारतीय रेल्वेने दररोज प्रवास करणाऱ्या सुमारे २.३ कोटी प्रवाशांची सुरक्षा वाढवली जाईल.
इंटिग्रेटेड ट्रॅक मॉनिटरिंग सिस्टम आणि त्याचे कार्य
इंटिग्रेटेड ट्रॅक मॉनिटरिंग सिस्टम (ITMS) ही एक उच्च-कार्यक्षमता प्रणाली आहे, जी ट्रॅकचे परीक्षण, मोजमाप आणि संरक्षण करण्यासाठी नवीनतम तंत्रज्ञानाचा वापर करते. ट्रॅक रेकॉर्डिंग कार (TRC) वर आयटीएमएस स्थापित केले आहे. हे 20 ते 200 किमी प्रतितास वेगाने ट्रॅकचे विश्लेषण करू शकते. यात लेसर सेन्सर, हाय-स्पीड कॅमेरे, जीपीएस आणि इतर सेन्सर्स समाविष्ट आहेत. जे ट्रॅक स्थिती आणि संभाव्य दोष शोधतात.
रोड कम रेल इन्स्पेक्शन व्हेईकलची वैशिष्ट्ये
रोड कम रेल इन्स्पेक्शन व्हेईकल (RCRIV) हे टाटा योधा मॉडेलवरून स्वीकारण्यात आले आहे. या यंत्रास दोन २५०मिमी लोखंडी चाके आणि मागील बाजूस दोन ७५०मिमी लोखंडी चाके आहेत, ज्यामुळे वाहन रस्त्यावर तसेच रेल्वेवर चालण्यास सक्षम होते. यात ३ कॅमेरे आहेत जे १५ दिवसांच्या बॅकअपसह ट्रेक रेकॉर्ड करतील.