मुंबई, दि.५: विशेष प्रतिनिधी मुंबई बुलेट ट्रेन स्थानकाचा पहिला काँक्रीट बेस स्लॅब ३० नोव्हेंबर २०२४ रोजी जमिनीपासून अंदाजे ३२ मीटर खोलीवर टाकण्यात आला आहे. हा स्लॅब १० मजली इमारतीच्या समतुल्य इतक्या खोलीवर आहे. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरमध्ये केवळ बीकेसी हे एकमेव भूमिगत स्थानक आहे.
मुंबईतील बीकेसी येथील भूमिगत स्थानकाचे बांधकाम तळापासून वरच्या दिशेने केले जात आहे. म्हणजेच, जमिनीपासून खोदकाम सुरु झाले असून पायापासून काँक्रिटीकरणाचे कामही सुरू झाले आहे. हा स्लॅब ३.५ मीटर खोल, ३० मीटर लांब आणि २० मीटर रुंद आहे. स्थानकासाठी टाकल्या जाणाऱ्या एकूण ६९स्लॅबपैकी हा पहिला स्लॅब आहे, जो बुलेट ट्रेन स्टेशनसाठी सर्वात खोल बांधकाम पातळीवर आहे. प्रत्येकी १२०m3 क्षमतेच्या दोन इन-सिटू बॅचिंग प्लांटद्वारे काँक्रीटचा पुरवठा केला जात आहे. काँक्रीट ओतण्याच्या वेळी तापमान 25 अंश सेल्सिअसच्या खाली ठेवण्यासाठी इन-सिटू बर्फ आणि चिलर प्लांटद्वारे तापमान नियंत्रित केले जात आहे. स्लॅब टाकण्यापूर्वी पुरेशा जलरोधक उपायांची खात्री केली आहे.
या स्लॅबबद्दल काही रंजक माहिती
1) ६८१ मेट्रिक टन उच्च दर्जाचे स्टीलचे मजबुतीकरण
2) ६२०० रिबार कपलरचा वापर
3) २२५४ घन मीटर एम६० दर्जाचा काँक्रीट
4) ४२८३ मेट्रिक टन ऍग्रीगेट्सचा वापर
मुंबई बुलेट ट्रेन स्थानकाबद्दल
मुंबई बुलेट ट्रेन स्थानक बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे स्थित असून, मुंबई-अहमदाबाद एचएसआर रेल्वे मार्गावरील एकमेव भुयारी स्टेशन आहे. हे प्लॅटफॉर्म जमिनीपासून सुमारे २४ मीटर खोलीवर नियोजित करण्यात आले आहे. या प्लॅटफॉर्ममध्ये प्लॅटफॉर्म मजला, संकुल मजला आणि सेवा मजला असे तीन मजले असतील. संबंधित कामासाठी सध्या जमिनीपासून ३२ मीटर खोलीपर्यंत उत्खनन केले जात आहे. या स्थानकात ६ प्लॅटफॉर्म असतील, आणि प्रत्येक प्लॅटफॉर्मची लांबी सुमारे ४१५ मीटर असेल (16 कोचांच्या बुलेट ट्रेनसाठी पुरेशी). स्टेशनला मेट्रो आणि रस्त्याद्वारे जोडणी दिली जाईल. दोन प्रवेश/निर्गमन बिंदू नियोजित करण्यात आले आहेत. यामधील एक नजीकच्या मेट्रो लाईन २ बीच्या मेट्रो स्थानकाकडे जाण्यासाठी आणि दुसरा एमटीएनएल इमारतीकडे जाण्यासाठी आहे. स्थानक अशा प्रकारे नियोजित करण्यात आले आहे की, प्रवाशांच्या हालचालीसाठी आणि सुविधा उपलब्ध करण्यासाठी पर्याप्त जागा प्रदान करण्यात आली आहे, ज्यामध्ये कॉन्कोर्स आणि प्लॅटफॉर्म स्तराचा समावेश आहे. नैसर्गिक प्रकाशासाठी समर्पित स्कायलाइटची व्यवस्था करण्यात आली आहे.
--------
मुंबई बुलेट ट्रेन स्टेशन हे मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरमधील एकमेव भूमिगत स्टेशन आहे. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्सच्या मध्यभागी हे ३२-मीटर-खोल स्टेशन बांधण्यासाठी सुमारे १८.७ लाख घनमीटर उत्खनन करण्यात येणार आहे, त्यापैकी ५२% उत्खनन आधीच पूर्ण झाले आहे. घटनास्थळी सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी अत्याधुनिक उपकरणे वापरली जात आहेत. पहिला बेस स्लॅब पूर्ण करणे हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.”
- विवेक कुमार गुप्ता, एमडी/एनएचएसआरसीएल