महाराष्ट्रासाठीचा भाग्ययोग!

05 Dec 2024 22:48:48

Devendra Fadnavis
 
‘लोकतंत्र न बहुमत का शासन हैं, न अल्पमत का; यह जनता के इच्छा का शासन हैं।’ तत्त्वचिंतक आणि अंत्योदयाचा विचार मांडणार्‍या पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या या उक्तीला साजेशा पद्धतीने प्रभावी प्रशासन राबविणारे देवेंद्र फडणवीस यांना अवघा महाराष्ट्र पाहतो आहे. जनतेच्या इच्छा-आकांक्षांची अचूक जाण, त्यानुसार कृती, राज्याला अव्वल स्थानावर नेण्यासाठीची दीर्घदृष्टी ही देवेंद्रजींची वैशिष्ट्ये असल्याने ते प्रभावी नेता ठरले आहेत. कर्तृत्व, नेतृत्व आणि वक्तृत्व यांचा सुयोग्य संयोग असलेल्या देवेंद्रजींच्या गळ्यात पुन्हा मुख्यमंत्रिपदाची माळ पडणे, हा महाराष्ट्रासाठीचा भाग्ययोग आहे.
 
महाराष्ट्र केवळ एक राज्य नाही, तर ते देशाच्या आर्थिक प्रगतीचे इंजिन आहे. देशातील विचारप्रवाहांचे केंद्र आहे. देशातील सर्वोत्तम मनुष्यबळाचे भांडार आहे, याची पक्की जाणीव ज्या नेत्यांना आहे, त्यात देवेंद्रजी अग्रस्थानी आहेत. विचारधारेवर अतूट श्रद्धा, प्रगती म्हणजे नेमके काय याची सखोल जाण, विश्वास निर्माण करण्याची हातोटी, आश्वासकता ही देवेंद्रजींना उपजत लाभलेली आभूषणे आहेत.
 
महाराष्ट्राचे भवितव्य देवेंद्रजींच्या हातातच सर्वात उज्ज्वल आहे आणि सुरक्षित आहे, असे जेव्हा मी म्हणतो, तेव्हा ते फक्त भावनेच्या पोटी नाही. विकासाभिमुख, प्रगल्भ आणि व्यापक विचार करणारे नेतृत्व कसे असते, याची प्रचिती मी गेल्या दहा वर्षांत वारंवार अनुभवली. विशेषतः स्थायी समितीचा अध्यक्ष आणि त्यानंतर पुण्याचा महापौर या जबाबदार्‍या सांभाळताना मी देवेंद्रजींमधील नेता आणि प्रशासक जवळून अनुभवला. शहरांच्या समस्यांचे आकलन आणि त्यावरील उपायांचा सर्वांगाने विचार करणारे नेतृत्व म्हणजे देवेंद्र फडणवीस हा विश्वास दिवसेंदिवस प्रबळ होत गेला.
 
पक्षनेते म्हणून त्यांचे नागपूरपासून ते कोल्हापूरपर्यंत आणि लातूरपासून ते नंदुरबारपर्यंत सतत दौरे सुरू असतात. शिवाय विविध समस्या मार्गी लावण्यासाठी मुंबई-दिल्ली असा प्रवास सुरू असतो. पायाला सतत भिंगरी लावल्याप्रमाणे दिवसाचे 24 तास आणि वर्षाचे 365 दिवस देवेंद्रजी सतत कार्यरत असतात. मला त्यांचे कौतुक वाटते ते अशासाठी की, कर्‍हाडच्या ‘कृष्णा साखर कारखान्या’च्या निवडणुकीपासून ते विदर्भातील पीकपाणी आणि लातूरमधील डाळ उत्पादक शेतकर्‍यांपासून ते नंदुरबारमधील आदिवासींच्या समस्या अशा सगळ्या गोष्टींवर एकाच वेळी काम करीत असताना त्यांचे प्रत्येक नागरी समस्या आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठीच्या विकास प्रकल्पांवर बारकाईने लक्ष असते. त्यामुळेच पुण्यात आले की, ते आधी महापालिकेतर्फे सुरू असलेल्या विकास प्रकल्पांचा आढावा घेत. आधीच्या दौर्‍यात दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी कशाप्रकारे करण्यात आली आहे, याची माहिती घेतात. कोणत्याही विकास प्रकल्पात नजरचुकीनेही त्रुटी राहू नये, यासाठी नव्याने काही सूचना करत. विविध प्रकल्पांबाबत त्यांना असणारी तांत्रिक माहिती, खर्च, निविदा, प्रकल्पाची गुणवत्ता याबाबतचा त्यांचा आग्रह पाहताना, हा सगळा अभ्यास ते कधी करतात, असा प्रश्न पडायचा. पण, त्याचेही उत्तर त्यांच्या आजपर्यंतच्या वाटचालीतून मिळते. त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली ती नागपूर महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून येण्यापासून. नगरसेवक, महापौर, आमदार, प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्रिपद अशा जबाबदार्‍या टप्प्याटप्प्याने त्यांच्याकडे येत गेल्या. या सगळ्या काळात महाराष्ट्रात वेगाने होत असलेले शहरीकरण त्यांनी जवळून पाहिले आहे. एवढेच नव्हे, तर शहरीकरणामुळे निर्माण होणार्‍या समस्यांच्या मुळाशी जाऊन अभ्यास केला. महापौर, आमदार आणि नंतर मुख्यमंत्री असताना त्यांनी पुण्याबरोबरच राज्यातील नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नवी मुंबई अशा मोठ्या शहरांतील समस्या आणि त्यांवरील उपाययोजना, विकास प्रकल्पांची उभारणी यासाठी मोठे काम केले आहे. वेगाने होणारे नागरीकरण, त्यामुळे निर्माण होणार्‍या समस्या आणि त्यावरील उपाययोजना, विकास प्रकल्प याबाबत ते गेली 25 वर्षे सातत्याने काम करीत आहेत. त्यामुळेच केवळ माझ्यासारख्या कार्यकर्त्यालाच नव्हे, तर विकासाभिमुख कामाचा ध्यास घेतलेल्या भारतीय जनता पक्षातील आणि अन्य पक्षातील कार्यकर्त्यांना आणि नेत्यांनाही देवेंद्रजींबद्दल आपुलकी, विश्वास वाटतो. विकासकामात येणार्‍या अडचणी असोत किंवा राजकीय मतभेदांचे मुद्दे असोत, देवेंद्रजी आपली समस्या नक्की सोडवतील, असा ठाम विश्वास प्रत्येकाच्या मनात असतो.
 
पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता कसा असावा, याचेही देवेंद्रजी म्हणजे चालतेबोलते उदाहरण आहे. ‘महाराष्ट्राचा निर्विवाद मुख्यमंत्री’ अशी ओळख कमावलेली असताना पक्षासाठी जेव्हा मुख्यमंत्रिपदावर पाणी सोडण्याची वेळ आली, त्यावेळी त्यांनी तो निर्णय अतिशय सहजपणे स्वीकारला. एवढेच नव्हे, तर महाराष्ट्राच्या विकासाचे जे ध्येय ठेवलेले होते, त्याच्या पूर्ततेसाठी त्यांनी पुन्हा एकदा पूर्ण ताकदीनिशी झोकून दिले. भारतीय जनता पक्षासाठी ‘राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष, शेवटी मी’ हा जो मूलमंत्र आहे, त्याचे पालन व्यक्तिगत वर्तनातून घालून देणारे देवेंद्रजी आम्ही पाहिले. माझ्यासारखे कार्यकर्ते यातूनच शिकतात.
 
कार्यकर्त्यांना जपावे कसे, याचेही आदर्श उदाहरण म्हणजे देवेंद्रजी. कार्यकर्त्यांशी त्यांचे नाते वरवरचे नसल्याने त्याच्या मनातील चलबिचल ते अचूक ओळखतात. कार्यकर्त्याच्या सुखदुःखात त्याला धीर देत त्याच्या पाठीशी ते उभे राहतात, हे मी अनुभवले आहे.
 
‘कोविड’च्या काळात मी पुण्याचा महापौर होतो. रस्त्यावर, वस्त्यांवर बेधडक फिरायचो. कारण, शतकातील सर्वांत मोठ्या महामारीमुळे सर्वसामान्य जनता हवालदील झाली होती. त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे त्यांना धीर देण्यासाठी, त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी मी रस्त्यावर उतरून काम करत होतो. त्यावेळी देवेंद्रजींचा फोन यायचा आणि ते ‘काळजी घ्या आणि फिरा’ असे सांगायचे. मला स्वतःला ‘कोविड’ झाल्यावर अख्खे कुटुंब हबकले होते. कुटुंबातील सगळ्यांमध्ये असलेली अस्वस्थता लक्षात घेऊन, देवेंद्रजी रोज मोठ्या भावाप्रमाणे विचारपूस करायचे, कुटुंबीयांनाही धीर द्यायचे. डॉक्टरांना योग्य उपचारासाठी आवर्जून सांगायचे. सहकारी कार्यकर्त्यांबद्दल त्यांच्या मनातील आस्था किती खोल आहे, हे मी अनुभवले आहे.
देवेंद्रजींचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, कार्यकर्त्याला विश्वासात घ्यायचे, त्याची समजूत काढायची आणि योग्यवेळी त्याला न्याय द्यायचा. 2014 साली कोथरूड विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी मी मोठी तयारी केली होती. परंतु, उमेदवारी मिळू शकली नाही. त्यावेळी देवेंद्रजींनी माझ्याशी संवाद साधला, माझी समजूत काढली. पुढे महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश लाभले. देवेंद्रजींनी मला स्थायी समितीचे अध्यक्षपद, महापौरपद या दोन जबाबदार्‍या सोपवत योग्य तो न्याय केला. त्यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, त्यांनी कर्तबगारीने कमावलेले वलय. अनेक नेत्यांभोवती पदामुळे वलय प्राप्त होते. परंतु, गोपीनाथ मुंडे, बाळासाहेब ठाकरे यांसारख्या नेत्यांचे वलय गर्दी नसतानाही कायम असायचे. देवेंद्रजींनाही हे भाग्य त्यांच्या कर्तबगारीमुळे लाभले. विरोधी पक्षात असताना त्यांचा प्रवास थांबला नाही, कार्यक्रम कमी झाले नाहीत, लोकांचे प्रेम आटले नाही. जनतेच्या मनात स्थान आणि त्यांनी मिळवलेले स्थान किती भक्कम आहे, हेच आज आपण अनुभवतो आहोत.
 
पक्षातील कार्यकर्त्यांचे मनोधैर्य पुन्हा उंचावत, त्यांना प्रेरित करून महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला पुन्हा अव्वल स्थानावर नेण्यासाठी अतोनात मेहनत देवेंद्रजींनी घेतली. कामावर, विचारावर, सहकार्‍यांवर आणि जनतेच्या सद्भावनांवर विश्वास असल्याशिवाय हे घडूच शकत नाही. देवेंद्रजींची ही कारकीर्द महाराष्ट्राला कळसावर पोचवेल, याची खात्री आहे. त्यासाठी त्यांना उदंड शुभेच्छा!
 
(लेखक सहकार आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री आणि पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत.)
मुरलीधर मोहोळ 
Powered By Sangraha 9.0