मुंबई : मी देवेंद्र सरीता गंगाधरराव फडणवीस ईश्वरसाक्ष शपथ घेतो की, कायद्याद्वारे स्थापित झालेल्या भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवीसांनी शपथ घेतली. गुरुवार, ५ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा भव्य शपथविधी सोहळा आझाद मैदानावर पार पडला.
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "कायद्याद्वारे स्थापित झालेल्या भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन. मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सदसदविवेक बुद्धीने पार पाडेन. संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना निर्भयपणे आणि निष्पक्षपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईन."
"मी देवेंद्र सरीता गंगाधरराव फडणवीस ईश्वरसाक्ष शपथ घेतो की, महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब, असा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करुन एरवी कोणत्याही व्यक्तीला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही."
शपथ घेताना बाळासाहेब आणि आनंद दिघेंना वंदन!
उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना एकनाथ शिंदेंनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंना वंदन केले. ते म्हणाले की, "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंना वंदन, गुरुवर्य आनंद दिघे साहेबांचे स्मरण, देशाचे कर्तबगार आणि लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि देशाचे कणखर गृहमंत्री अमित शाह यांच्या भक्कम पाठीब्यांने आणि राज्यातील १३ कोटी जनतेच्या आशीर्वादाने मी एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे ईश्वरसाक्ष शपथ घेतो की, कायद्याद्वारे स्थापित झालेल्या भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन."
या भव्य शपथविधी सोहळ्यासाठी अनेक दिग्गज राजकीय नेत्यांसह चित्रपटसृष्टीतील विवध कलाकारदेखील उपस्थित होते. शपथविधीपूर्वी सुप्रसिद्ध गायक अजय-अतुल यांचा संगीत सोहळा आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा, केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल, परराष्ट्र मंत्री डॉ. सुब्रमण्यम जयशंकर, पर्यावरण मंत्री भुपेंद्र यादव यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. तसेच आंध्र प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, गुजरात, आसाम, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, हरियाणा, ओडीसा, गोवा, उत्तराखंड, पुडुचेरी, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा, या राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपालदेखील उपस्थित होते.