द्रमुकचा हिंदूद्वेष

05 Dec 2024 22:55:00

DMK
 
स्टॅलिन सरकारने कायम हिंदूंच्या अभिव्यक्तीचे, हिंदूंच्या शक्तीचे दमन करण्याचाच करंटेपणा केला. पण, म्हणा सनातन धर्मालाच रोग म्हणून अपमानित करणार्‍या स्टॅलिन आणि घराण्याकडून दुसरी अपेक्षा नाहीच. त्यांना देशातील हिंदूंची किंमत नाहीच, त्यामुळे बांगलादेशमधील हिंदूंप्रती संवेदना व्यक्त करण्याचा दुरान्वयेही प्रश्न उद्भवत नाही. अशा या हिंदूद्वेष्ट्या आणि इस्लामी कट्टरतावाद्यांच्या मूकसमर्थकांना धडा शिकवायलाच हवा!
 
बांगलादेशातील हिंदूंवरील अन्याय-अत्याचाराविरोधात भारताच्या कानाकोपर्‍यात आंदोलने सुरु आहेत. भारतीय हिंदू जागृत झाला असून, समाजमाध्यमांपासून ते आता प्रत्यक्ष रस्त्यावर उतरुन हिंदू बांधव मोठ्या संख्येने बांगलादेशातील हिंदूद्वेष्ट्या युनूस सरकारचा विरोध करताना दिसतात. बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ले थांबावे आणि युनूस सरकारवर दबाव वाढवावा, हा यामागचा उद्देश. तसेच बांगलादेशमधील हिंदूंना ‘आम्ही तुमच्यासोबत आहेत, धीर सोडू नका’ असाही संदेश भारतासह जगभरातील हिंदूंनी या आंदोलनांतून दिला. हिंदूंच्या या आंदोलनाची दखल घेत, जागतिक पातळीवरही अनेक संघटनांनी अमेरिकेपासून ते संयुक्त राष्ट्रांनी या प्रकरणी लक्ष घातले आहे. असे असताना तामिळनाडूतील द्रमुक सरकारने मात्र बांगलादेशातील हिंदूंच्या हत्याकांडाविरोधात आवाज उठवणार्‍या भाजपच्या कार्यकर्त्यांनाच अटक करण्याचा कृतघ्नपणा दाखवला. त्यामुळे यानिमित्ताने पुन्हा एकदा तामिळनाडूतील द्रमुक सरकारचा हिंदूद्वेष्टा चेहरा समोर आला आहे. तामिळनाडूच्या नेत्या आणि तेलंगणच्या माजी राज्यपाल तमिलिसाई सुंदरराजन यांनी द्रमुक सरकारवर दडपशाहीचा आरोप केला. तामिळनाडूतील स्टॅलिन सरकारने आंदोलन सुरु होण्याआधीच हजारो कार्यकर्त्यांना अटक केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, तब्बल आठ हजार कार्यकर्त्यांना पोलिसांनी यावेळी ताब्यात घेतले. यामध्ये तामिळनाडूमधील काही ज्येष्ठ राजकीय नेत्यांचाही समावेश होता. म्हणजे एकूणच काय तर हिंदूंची एकता दिसू नये, याची पुरेपूर खबरदारी स्टॅलिन सरकारने घेतली. म्हणा, अशापद्धतीने हिंदूंचे विराटदर्शन तामिळनाडूमध्ये दृष्टिपथासही पडूनये, म्हणून यापूर्वीही स्टॅलिन सरकारने वेळोवेळी कारवाईचा बडगा उगारला. रा. स्व. संघाच्या पथसंचलनांवर बंदी घालणे असो वा अयोध्येतील राममंदिराच्या भव्यदिव्य सोहळ्याचे थेट प्रेक्षपण रोखण्याचा कोतेपणा असो, स्टॅलिन सरकारने कायम हिंदूंच्या अभिव्यक्तीचे, हिंदूंच्या शक्तीचे दमन करण्याचाच करंटेपणा केला. पण, म्हणा सनातन धर्मालाच रोग म्हणून अपमानित करणार्‍या स्टॅलिन आणि घराण्याकडून दुसरी अपेक्षा नाहीच. त्यांना देशातील हिंदूंची किंमत नाहीच, त्यामुळे बांगलादेशमधील हिंदूंप्रती संवेदना व्यक्त करण्याचा दुरान्वयेही प्रश्न उद्भवत नाही. अशा या हिंदूद्वेष्ट्या आणि इस्लामी कट्टरतावाद्यांच्या मूकसमर्थकांना धडा शिकवायलाच हवा!
 
तुमसे ना हो पाएगा...
 
ल्लीच्या विधानसभा निवडणुका नवीन वर्षात दृष्टिपथात असताना, आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल भलतेच सक्रिय झाले आहेत. मद्य घोटाळ्याप्रकरणी तुरुंगातून बाहेर पडल्यावर मुख्यमंत्रिपदाची माळ आतिशी मार्लेना यांच्या गळ्यात घातल्यानंतर केजरीवालांनी स्वत:ला निवडणुकीच्या प्रचारात अक्षरश: झोकून दिले. दिल्लीच्या गल्ली-मोहल्ल्यात आता केजरीवाल दररोज प्रचारार्थ फिरत असून, नागरिकांना राज्य सरकारच्या कामगिरीचे प्रगतीपुस्तक वाचून दाखविण्यात ते दंग आहेत. पण, आता त्यावर जनतेचा काडीमात्र विश्वास नाही. म्हणूनच आता दिल्लीची सुरक्षा हा एक मुद्दा प्रकर्षाने जनतेसमोर पोटतिडकीने मांडण्याचा खटाटोप ‘आप’कडून सुरु आहे. दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्थेची सर्वस्वी जबाबदारी ही केंद्र सरकारची असून, गृहखाते आणि गृहमंत्री अमित शाह कसे अपयशी ठरले आहेत, असा ‘नॅरेटिव्ह’ सेट करण्याचा महत् प्रयास केजरीवालांकडून नित्यनेमाने सुरु आहे. त्याअंतर्गतच दिल्लीत काहीही घडले की, थेट अमित शाहच त्यासाठी कसे जबाबदार आहेत, हे ओढूनताणून पटवून देताना केजरीवाल अजिबात थकत नाहीत. म्हणूनच मागे आपल्या ‘एक्स’ खात्यावरुन दिल्लीचा एक नकाशा केजरीवालांनी शेअर केला. त्यामध्ये अमित शाह यांच्या बंगल्यापासून किती किमीच्या परीघात कसे विविध दिवशी गुन्हे घडले, याची माहिती केजरीवालांनी दिली. त्यानंतर लगेच दुसर्‍या दिवशी कुणी तरी केजरीवालांच्या अंगावर पाणी फेकले, तर त्यावरुनही दिल्ली असुरक्षित असल्याचा कांगावा त्यांनी केला. या सगळ्यात कहर म्हणजे, दिल्ली मेट्रोच्या एका मार्गिकेवर काल केबल वायरची चोरी झाली. आता त्यावरुनही दिल्लीत काहीही सुरक्षित नसल्याचा आरोप करुन केजरीवालांनी तोंडसुख घेतले. पण, मुळात केजरीवाल मुख्यमंत्री असताना त्यांच्याच शासकीय निवासस्थानी, त्यांच्याच सचिवाने, त्यांच्याच पक्षातील खासदार स्वाती मालिवालला मारहाण केली होती, याचा मात्र केजरीवालांनी सोयीस्कर विसर पडलेला दिसतो. एवढेच नाही, तर ‘आप’चा माजी नगरसेवक ताहीर हुसैन याची दिल्ली दंगलीतील भूमिका असेल किंवा ‘आप’चे माजी मंत्री सोमनाथ भारती यांनी महिलांनी केलेले मारहाणीचे प्रकरण... त्यामुळे पक्षांतर्गत गुन्हेगारी फोफावलेली असताना, केजरीवाल दिल्ली कशी सुरक्षित ठेवणार? म्हणूनच म्हणावेसे वाटते, तुमसे ना हो पाएगा!
Powered By Sangraha 9.0