नवी मुंबई, दि.५: हजार घरांच्या विक्रीकरिता सिडकोने दीड महिन्यांपूर्वी आणलेल्या महागृहनिर्माण योजनेतील वन बीएचके व टू बीएचके घरांच्या किंमती सिडकोने आजतागायत जाहीर न केल्यामुळे या महागृहनिर्माण योजनेतील घरे खरेदी करण्याकरिता नोंदणी केलेले ग्राहक संभ्रमात आहेत.
या विरोधात झालेल्या आंदोलनानंतर बामणडोंगरी येथील गृहनिर्माण प्रकल्पात अत्यल्प उत्पन्न गटासाठी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सिडकोने घराची किंमत ३५ लाखांऐवजी २९ लाख, ५०हजार इतकी करण्यात आली आहे. परंतु, या महागृहनिर्माण योजनेतील वन बीएचके व टू बीएचके घरांच्या किंमती अद्याप सिडकोने जाहीर न केल्यामुळे ग्राहक संभ्रमात आहेत. त्यामुळे शासनाने सिडको महागृहनिर्माण योजनेतील वन बीएचके घराची किंमत ३० लाखांच्या आत तर टू बीएचके घराची किंमत नोडवाईज ४५ ते ५० लाखांच्या आत ठेवण्याची मागणी जोर धरत आहे.
सिडको बांधत असलेल्या ६७ हजार घरांपैकी पहिल्या टप्प्यात २६ हजार घरांच्या विक्रीकरिता सिडकोने दसर्याच्या मुहुर्तावर माझे पसंतीचे सिडकोचे घर, या महागृहनिर्माण योजनेसाठी जाहिरात प्रसिध्द करून दि. ११ नोव्हेंबरपर्यंत ग्राहकांना नोंदणी करण्यास सांगितले होते. या दरम्यान राज्यात निवडणुकीचा माहोल असल्यामुळे ग्राहकांना घर घेण्यासाठी अधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सिडकोने या महागृहनिर्माण योजनेकरिता नोंदणी करण्यासाठी आणखी एक महिन्याची म्हणजेच ११ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. घर खरेदीकरण्याकरिता गत दीड महिन्यात ९४ हजार नोंदणी अर्ज सिडकोला प्राप्त झाले आहेत.