मुंबई : देवेंद्रजींचे जीवनच एक संघर्ष आहे. त्यांची जिद्द, चिकाटी आणि संयमामुळे ते आज इथे आहेत, अशा भावना फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहेत. गुरुवारी सायंकाळी ५ वाजता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्याआधी अमृता फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला.
अमृता फडणवीस म्हणाल्या की, "देवेंद्रजी यावेळी सहाव्यांदा आमदार झालेत आणि आता तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होताहेत, ही गोष्ट खूप आनंदाची आणि जबाबदारीची आहे. त्यांच्या मेहनतीला यश आले, याचा मला आनंद आहे. महायुती एकत्र आहे आणि यापुढे महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आजपासून त्यांनी वाटचाल सुरु केली आहे. देवेंद्रजींचे जीवनच एक संघर्ष आहे. मी त्यांना जवळून पाहिले आहे. कुठलीही गोष्ट करायची ठरवली की, ती ते करूनच दाखवतात. त्यांची जिद्द, चिकाटी आणि संयमामुळे ते आज इथे आहेत," असे त्या म्हणाल्या.
हे वाचलंत का? - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत दाखल!
लाडक्या बहिणी पाठीशी!
त्या पुढे म्हणाल्या की, "लाडकी बहिण योजना खूप महत्वाची आहे. या योजनेमुळे सर्वच बहिणी महायुतीसोबत जुळल्या. तसेच संसदेत महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले आहे आणि येत्या काही काळात त्याची अंमलबजावणीसुद्धा होईल. ज्यावेळी आपल्याला एखादी गोष्ट मिळवायची असते त्यावेळी आपल्यासमोर अर्जुनासारखे फक्त आपले लक्ष्य असायला हवे. देवेंद्रजींना पुन्हा खुर्चीसाठी यायचे नव्हते तर महाराष्ट्रासाठी ते जे करू शकतात ते इतर कुणीही करू शकत नाही, असा लोकांना विश्वास होता. लोकांच्या विश्वासामुळे ते पुन्हा आले आहेत. त्यांनी आपल्या कामाचे चीज करून दाखवले. मी प्रचार करत असताना लाडक्या बहिणी इतक्या मोठ्या प्रमाणात पाठीशी आहेत, हे लक्षात येत होते. लोकसभेत खोटे नरेटिव्ह पसरवले गेल्यानंतरही लोकांनी महायुतीला पुर्णपणे साथ दिली, याचा आनंद आहे," असेही त्या म्हणाल्या.