सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आनंद हरवत चाललेला आहे. अशा वेळी आपल्या जीवनात ध्यानाचा ठाव घेण्यासाठी आणि आनंद व शांततेच्या दिशेने एक पाऊल टाकण्यासाठी ‘तेजज्ञान’ संस्था कार्यरत आहे. त्यांच्या कार्यावर टाकलेला प्रकाश...
'तेजज्ञान’ संस्थेची स्थापना १९९९ मध्ये झाली. या संस्थेला ‘हॅप्पी थॉट्स’ या नावाने ओळखली जाते. समाजात सकारात्मक विचारांचे बीज रोवण्याचे कार्य ‘तेजज्ञान फाऊंडेशन’ गेली २५ वर्षे निरंतरपणे करीत आहे. उच्चतम विकसित समाज निर्माण करणे हे संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे. ‘हॅपी थॉट्स’ हे ‘तेजज्ञान फाऊंडेशन’चे ब्रीदवाक्य असून ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर चालवली जाणारी एक सेवाभावी संस्था आहे. १९९९ सालापासून सर्वोच्च विकसित समाजाच्या निर्मितीसाठी ही संस्था कटिबद्ध आहे. शारीरिक आरोग्य, मानसिक स्वास्थ्य, सामाजिक सौहार्द, आर्थिक स्वातंत्र्य आणि अध्यात्मिक विकास या पाचही स्तरांवर ही संस्था कार्य करीत आहे. ‘हॅपी थॉट्स’ या ब्रीदवाक्याद्वारे समाजातील प्रत्येकाला संतुलित आणि शांततापूर्ण जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन मिळावे, यासाठी फाऊंडेशन प्रयत्न करते. फाऊंडेशनचे दहा हजारांपेक्षा जास्त स्वयंसेवक देश-परदेशांत (अमेरिका, ऑस्ट्रेलिया, युके, सिंगापूर) आदी ४५० शहरांतून कार्यरत आहेत.
‘तेजज्ञान फाऊंडेशन’ आत्मविकासातून आत्मसाक्षात्कार प्राप्त करण्याचा एक मार्ग आहे. यासाठी सरश्रींद्वारा एक अनोखी बोधप्रणाली निर्माण झाली आहे. या प्रणालीला आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्राद्वारे ‘आयएसओ ९००१:२०१५’च्या आवश्यकतेनुसार आणि निकष पडताळून सरळ, व्यावहारिक आणि प्रभावी बनवले गेले आहे. या संस्थेच्या प्रबोधनपद्धतीच्या भिन्न पैलूंना (शिक्षण, निरीक्षण आणि गुणवत्ता) स्वतंत्र गुणवत्ता परीक्षकांद्वारे क्रमबद्ध पद्धतीने पडताळले गेले. त्यानंतर या पैलूंना ‘आयएसओ ९००१:२०१५’साठी पात्र समजून या बोधपद्धतीला हे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या फाऊंडेशनचे लक्ष्य नकारात्मक विचारांकडून सकारात्मक विचारांकडे वाटचाल हे आहे. सकारात्मक विचारांकडून शुभ विचारांकडे म्हणजे ‘हॅपी थॉट्स’कडे प्रगती. शुभ विचारांकडून निर्विचार अवस्थेकडे मार्गक्रमण आणि निर्विचार अवस्थेच्या अंती आत्मसाक्षात्कार प्राप्ती. मी सर्व विचारांपासून मुक्त व्हावे, हा विचार म्हणजे शुभ विचार (हॅपी थॉट्स) होय. मी प्रत्येक इच्छेपासून मुक्त व्हावे, अशी इच्छा म्हणजे शुभ इच्छा. आपल्याला असे ज्ञान हवे आहे की ते सामान्य ज्ञानापलीकडे आहे, जे प्रत्येक समस्येवरील उत्तर आहे, जे प्रत्येक समजुतीपासून, गृहीत धारणांपासून आपल्याला मुक्त करते, ईश्वरी साक्षात्कार घडविते. आता शाब्दिक, सामान्य ज्ञानातून बाहेर येऊन ‘तेजज्ञाना’चा अनुभव घेण्याची वेळ आली आहे.
तुम्हाला सर्वोच्च आनंद हवाय? असा आनंद जो कोणत्याही बाह्य कारणावर अवलंबून नाही, जो प्रत्येक क्षणी वृद्धिंगत होतो. या जीवनात तुम्हाला प्रेम, विश्वास, शांती, समृद्धी आणि परमसंतुष्टी हवी आहे का? शारीरिक, मानसिक, सामाजिक, आर्थिक आणि अध्यात्मिक अशा आयुष्याच्या सर्व स्तरांवर यशस्वी होण्याची तुमची इच्छा आहे का? मी कोण आहे, हे तुम्हाला अनुभवाने जाणावेसे वाटते का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणण्याची इच्छा आणि अंतिम सत्य प्राप्त करण्याची तृष्णा असेल, तर ‘तेजज्ञान फाऊंडेशन’तर्फे महाआसमानी शिबिराचे आयोजन केले जाते.
हे शिबीर सरश्रींच्या मार्गदर्शनावर आधारित आहे. विश्वातील प्रत्येक मनुष्याने ‘मी कोण आहे’ या प्रश्नाचे उत्तर जाणून तो सर्वोच्च आनंदाच्या अवस्थेत स्थापित व्हावा, हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे. प्रत्येकाला असे ज्ञान प्राप्त व्हावे जेणेकरून त्याने प्रत्येक क्षणी वर्तमानात जगण्याची कला आत्मसात करावी. तो भूतकाळाच ओझे आणि भविष्याची चिंता यातून मुक्त व्हावा. प्रत्येकाच्या आयुष्यात कधीही न संपणारा आनंद आणि योग्य समज यावी. शिवाय, प्रत्येकाने समस्या विलीन करण्याची कला आत्मसात करावी. मनुष्यजन्माचा उद्देश सफल व्हावा. मी कोण आहे? मी येथे का आहे? मोक्ष म्हणजे काय? या जन्मातच मोक्षप्राप्ती शक्य आहे का? असे प्रश्न जर तुमच्या मनात असतील, तर त्यांच्यावरील उत्तरे महाआसमानी परमज्ञान शिबिरात मिळतात.
‘तेजज्ञान’ या अध्यात्मिक सेवाभावी संस्थेला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मुलुंड पश्चिम येथे रजत जयंती ध्यान महोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन सुप्रसिद्ध मराठी अभिनेता अविनाश नारकर, विजय पाटकर आणि सुप्रसिद्ध गुजराती अभिनेत्री नेहा मेहता यांच्या हस्ते पार पडले. यानिमित्ताने मेडिटेशन रॅलीही आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाला ५०० हून अधिक साधक तसेच नागरिक उपस्थित होते. या ध्यान महोत्सवाची सांगता दि. २४ नोव्हेंबर रोजी झाली. यानिमित्त फाऊंडेशनच्या महाराष्ट्रासह देशभरातील विविध केंद्रांवर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
रजत जयंती ध्यान महोत्सव
फाऊंडेशनतर्फे दि. १ डिसेंबर रोजी रजत जयंती ध्यान महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन सुप्रसिद्ध टेलिव्हिजन व चित्रपट अभिनेते राम अवाना, बालरोग विशेषज्ञ डॉ. उल्हास कोल्हटकर, प्राचार्य डॉ. विनय भोळे यांच्या शुभ हस्ते करण्यात येणार आहे. हा महोत्सव ध्यानाच्या माध्यमातून जगभर शांतता आणि आनंद पसरवण्याच्या उद्दिष्टाला एक नवीन दिशा देईल. आपल्या जीवनात ध्यानाचा ठाव घेण्यासाठी आणि आनंद व शांततेच्या दिशेने एक पाऊल टाकण्यासाठी या महोत्सवाचा एक भाग व्हा, असे आयोजकांनी सांगितले.
सरश्रीचा अल्पपरिचय
सरश्रीचा अध्यात्मिक शोधाचा प्रवास त्यांच्या लहानपणापासूनच सुरू झाला होता. हा शोध सुरू असतानाच त्यांनी अनेक प्रकारच्या पुस्तकांचे अध्ययन केले. त्याचबरोबर, या शोधकाळात त्यांनी अनेक ध्यानपद्धतींचा अभ्यासही केला. त्यांच्यातील या जिज्ञासेने त्यांना अनेक वैचारिक आणि शैक्षणिक संस्थांमध्ये जाण्यासाठी प्रेरित केले. जीवनाचे रहस्य समजण्यासाठी त्यांनी प्रदीर्घ काळ मनन करून आपले शोधकार्य सातत्याने सुरू ठेवले. या शोधातूनच त्यांना आत्मबोध प्राप्त झाला. आत्मसाक्षात्कारानंतर त्यांना जाणवले की, अध्यात्माचा प्रत्येक मार्ग ज्या शृंखलेने जोडलेला आहे, तो म्हणजे समज. आत्मबोध प्राप्तीनंतर त्यांनी अध्यापनाचे कार्य थांबवले आणि जवळ जवळ दोन दशकांहून ही अधिक काळ आपले समस्त जीवन मानवजातीच्या कल्याणासाठी आणि अध्यात्मिक विकासासाठी अर्पण केले. विश्वाच्या प्रत्येक कानाकोपर्यातील लोक आज ‘तेजज्ञान’च्या अनोख्या ज्ञानप्रणालीचा लाभ घेत आहेत. याच व्यवस्थेचा आणखी एक महत्त्वपूर्ण भाग म्हणजे दररोज सकाळी आणि रात्री ९.०९ वाजता लाखो लोक विश्वशांतीसाठी प्रार्थना करत आहेत.