‘शिखा कारीगिरी’

04 Dec 2024 10:08:47
Shikha

आपली वेगळी ओळख निर्माण करण्याच्या जिद्दीतून अगदी छोट्याशा गावातून मोठ्या शहरापर्यंतचा यशस्वी प्रवास करणार्‍या शिखा अजमेरा यांच्याविषयी...

मान्य गृहिणींना केवळ घर, संसारच पाहावा किंवा मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घ्यावी, हे आजही २१व्या शतकात नकळतपणे बिंबवले जाते. मात्र, आपल्यालाही आपली अशी वेगळी ओळख निर्माण करायची आहे, ही जिद्द मनात ठेवून फार कमी महिला एका छोट्याशा गावातून मोठ्या शहरापर्यंतचा प्रवास करतात. शिखा अजमेरा या त्याच लाखो महिलांपैकी एक आहेत, ज्यांनी विदर्भाच्या एका लहानशा गावातून आपली कला थेट दिल्लीपर्यंत घेऊन गेल्या.

शिखा अजमेरा यांचे संपूर्ण बालपण विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील रिसोड या गावी गेले. पहिली ते बारावीपर्यंतचे संपूर्ण शिक्षण शिखा यांनी विदर्भातच पूर्ण केले आणि त्यानंतर सीएची परीक्षा आणि त्याची तयारी करण्यासाठी दोन पावले पुढे येत अमरावतीला जाऊन त्यांनी ‘सीए फाऊंडेशन’मध्ये पहिले वर्ष पूर्ण करुन विद्येचे माहेरघर असणारे पुणे गाठले. विदर्भ ते पुणे हा प्रवास करुन अखेर शिखा यांनी ‘सीए’ची पदवी प्राप्त केली. पुढे त्याच क्षेत्रात अधिक शिकण्याची इच्छा शिखा यांना होती. परंतु, लग्न आणि त्यानंतर अपत्य झाल्यानंतर वाढलेल्या जबाबदार्‍यांमुळे त्यांना पुढे त्याच क्षेत्रात काम करता आले नाही. त्यामुळे ‘सीए’पर्यंत शिक्षण झाले असूनही शिखा अजमेरा स्वत:ला गृहिणी म्हणूनच उद्देशतात.

स्त्री म्हटले की, कुटुंबाचा सांभाळ, मुलांचे संगोपन अशा एक ना अनेक जबाबदार्‍या खांद्यावर येतात आणि त्या सगळ्या प्रवाहात शिखा यांना लहानपणापासून असणारी कलेची आवड धुसर झाली. मुलांच्या करिअरमध्ये रममाण होत असताना, शिखा यांनी आपल्या हातातील चित्रकला हळूहळू का होईना जपली. लग्न होण्यापूर्वी ओढणी किंवा विविध कपड्यांवर फॅब्रिक पेन्टिंग करण्याची शिखा यांना आवड होती आणि तो छंद त्यांनी जपला. लग्नानंतर मुलांच्या कपड्यांवरही आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणारी काही चित्रे शिखा रंगवत होत्या आणि महत्त्वाचे म्हणजे, त्या ‘हॅन्ड पेन्टिंग’मधून अवघा भारत देश कपड्यांवर रंगवत असताना ती कला मॉडर्न पद्धतीने शिखा साकारत आहेत. कालांतराने पतीच्या सहकार्यातून त्यांची फॅब्रिकवर हॅन्ड पेन्टिंग करण्याची कला व्यवसायात रुपांतरित झाली.

शिखा यांचे पती सरकारी नोकरी करत असल्यामुळे कामानिमित्त त्यांची बदली होते. याच प्रवासात शिखा दिल्लीला आल्या आणि सुदैवाने बराच काळ तिथे राहू लागल्या. दिल्लीत ‘हॅन्ड पेन्टिंग’ या कला विभागाला विशेष मागणी असल्यामुळे व्यवसाय करत असताना आपल्या भारतीय संस्कृतीचे दर्शन लोकांच्या पेहरावात कसे आणता येईल, याचा विचार करत असता शिखा यांनी राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश अशा विविध भागांतून कारागिरांना एकत्रित केले आणि त्यांच्या हातातील विविध कलांना स्वत:च्या ‘मॉडर्न आर्ट’ची जोड देत ‘शिखा कारीगिरी’ हा ब्रॅण्ड तयार केला आणि त्याअंतर्गत देशातील कानाकोपर्‍यातील कलाकरांना व्यासपीठ देण्याचे काम शिखा यांनी सुरु केले. दिल्लीत वास्तव्यास असल्याकारणामुळे दिल्ली हाट किंवा अन्य प्रदर्शनांमध्ये त्यांनी सुरुवातीला स्वत: हाताने रंगवलेल्या साड्या विकण्यास सुरुवात केली आणि त्याच प्रदर्शनामध्ये त्यांची देशाच्या कानाकोपर्‍यात आलेल्या इतर उत्तम चित्रकार, कलाकारांशी ओळख झाली. ओडिशामधील पट्टचित्रकाराला ‘शिखा कारीगिरी’ या व्यासपीठाअंतर्गच शिखा यांनी काम करण्याची संधी दिली आणि भारतीय संस्कृतीला कलेची मॉडर्न झालर लावण्यास सुरुवात केली.

शिखा यांच्याकडे सध्या बिहारमधील ‘मधुबनी’, मध्य प्रदेशमधील ‘गोंदा’, झारखंडमधील ‘सोरय्या’, राजस्थानमधील ‘पिछवाई’, आदिवासी पाड्यातील चित्रांच्या कलेचे विविध प्रकार साकारणारे बरेच कलाकार काम करत आहेत. शिखा यांनी केवळ आपली ‘हॅन्ड पेन्टिंग’ची कलाच जपली नाही, तर देशातील अशा अनेक कलाकारांना ओळख आणि त्यातून अर्थार्जनाचा मार्ग ‘शिखा कारीगिरी’ मार्फत देऊ केला. मुळात आदिवासी कला ही लोकांपर्यंत पोहोचवण्याची सध्या गरज आहे, हे गमक ओळखून शिखा यांनी कलेची विविध रुपे चित्रांच्या माध्यमातून कपड्यांवर उमटवली आणि प्रसिद्धीची दारे दुर्मीळ कलाकारांसाठी खुली केली.
‘शिखा कारीगिरी’ हा त्यांचा ब्रॅण्ड केवळ देशातील विविध भागातून आलेल्या कलाकरांना व्यासपीठच देत नाहीत, तर त्यांना फॅब्रिक, रंग, जागा या सर्व गोष्टींचा पुरवठा केला जातो आणि त्यातून त्यांनी चित्र काढून तयार केलेले प्रत्येक फॅब्रिक प्रदर्शनात किंवा ऑनलाईन विक्री करुन त्यातून त्या कलाकारांना योग्य मानधन देण्याचे कामदेखील शिखा करत आहेत.

मुळात स्वत: उच्चशिक्षित असूनही शिखा एक उत्तम गृहिणीदेखील आहेत आणि त्यामुळे जबाबदारीने कलेचा छंद हा व्यवसायात रुपांतरित करण्याची संधी स्वत:सोबतच देशातील दर्जेदार आणि त्यासोबतच दुर्मीळ होत चाललेल्या कलाकारांना ओळख आणि आधुनिक मशिन्सच्या जगतात हाताची कला हा आदिवासींच्या उदरनिर्वाहाचा मार्ग कसा होऊ शकतो, याचा विचार करुन शिखा यांनी त्यांचा हा विशेष ब्रॅण्ड तयार केला आहे. तसेच स्त्री, आई, पत्नी अशा विविध भूमिका एकाचवेळी साकारताना गृहिणी ते व्यवसायिका या प्रवासात त्यांना त्यांच्या पतीची साथ लाभली. शिखा अजमेरा यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे त्यांची कला अशीच अविरतपणे जोपासण्यासाठी शुभेच्छा!
Powered By Sangraha 9.0