महामुंबईतील महाप्रदूषण

04 Dec 2024 09:54:34
Mumbai Pollution

मागील काही दिवसांत मुंबईमधील वायुप्रदूषणातही वाढ नोंदवण्यात आली असून, काही भागांतील हवा ही ‘अत्यंत वाईट’ या श्रेणीत नोंदविली गेली. परिणामी, मुंबई महानगर क्षेत्रामध्ये सर्दी-खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्यानिमित्ताने मुंबईतील वायुप्रदूषणाची कारणे आणि त्यावरील उपाययोजना यांचा उहापोह करणारा हा माहितीपूर्ण लेख...

मुंबई महानगरपालिका, राज्य सरकार आणि खासगी कंपन्यांच्या यंत्रणांनी गेल्या काही काळात वाहतूक, कचरा, ऊर्जा आणि इतर विविध माध्यमातून होणार्‍या उत्सर्जनाची आकडेवारी नोंदवली आहे. त्यानुसार मुंबई महानगरात कार्बनडाय ऑक्साईडचे एकूण प्रमाण हे अंदाजे २४.३ दशलक्ष टन इतके झाले होते. २०१९ सालच्या आकडेवारीनुसार, मुंबईते दरडोई अंदाजे २.६७ टन इतका कार्बनडाय ऑक्साईडचा वाटा झाला आहे, तर देशातील हा वाटा दरडोई १.९१ टन इतका आहे. ऊर्जा क्षेत्राकडून उत्सर्जित होणारे हरितगृह वायूंचे प्रमाण हे सर्वाधिक म्हणजे ७१ टक्के, वाहतूक क्षेत्राचा वाटा २४ टक्के, घनकचर्‍याचा वाटा पाच टक्के आहे.

शहरातील हरितगृह वायूचे (ॠकॠ) ७१ टक्के उत्सर्जन हे ‘डब्ल्युआरआय’च्या अभ्यासाप्रमाणे औष्णिक ऊर्जेपासून तर २४ टक्के परिवहन क्षेत्रातील आहे. रस्त्यावरील वाहनांच्या उत्सर्जनातून ४४ टक्के, विमानांमुळे ४५ टक्के, रेल्वेमुळे नऊ टक्के व जलमार्गांमुळे दोन टक्के असे हे प्रमाण आहे. मुंबई शहर व उपनगरातून २४.३ दशलक्ष टन कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण २०१९ सालच्या ‘जीएचजी’च्या बरोबर आहे. या ७१ टक्के उत्सर्जनातले ५५ टक्के निवासी वस्तीतून, ४५ टक्के व्यापारी संकुलातून, चार टक्के औद्योगिक क्षेत्रातून आणि पाच टक्के इतर क्षेत्रातून नोंदवले गेले आहे.

वायुप्रदूषणाचे स्रोत

पक्का रस्ता न झालेल्या भागातून धुळीमुळे ४५ टक्के, रस्ता असलेल्या भागातील धुळीमुळे २५ टक्के, बांधकामामुळे आठ टक्के, कचर्‍याच्या लॅन्ड्फिलच्या आगीमुळे चार टक्के, बेकरीमुळे ३.५ टक्के, डिझेलच्या वाहनांमुळे तीन टक्के, मुंबई मेट्रोच्या धुळीमुळे तीन टक्के आणि इतर कामांमुळे ८.५ टक्के वायुप्रदूषणाची नोंद करण्यात आली आहे.

परंतु, जीवाश्म इंधनामुळे निर्माण झालेल्या प्रदूषणामुळे जगाला फार मोठी किंमत मोजावी लागणार आहे. अशा वायुप्रदूषणामुळे दररोज आठ अब्ज अमेरिकन डॉलर्सचे नुकसान होते. अशा प्रदूषणामुळे भारतातही दरवर्षी १०.७ लाख कोटी रुपयांचे नुकसान होते.

कोळसा, नैसर्गिक वायू व पेट्रोलजन्य पदार्थ आदी जीवाश्म इंधनाचे पदार्थ मानले जातात. पृथ्वीच्या पोटातील कार्बन संयुगेही जीवाश्म इंधनाची उदाहरणे आहेत. जीवाश्म इंधनाच्या प्रदूषणात अमेरिका, चीन व भारत देश आघाडीवर आहेत. या प्रदूषणामुळे या देशांना अनुक्रमे ९०० अब्ज, ६०० अब्ज व १५० अब्ज अमेरिकी डॉलर्सचे नुकसान होत आहे. या प्रकारच्या इंधनातून फेकले गेलेले प्रदूषित छोटे कण जगभरात दरवर्षी सुमारे ४५ लाख मृत्यूस (हृदयविकार, स्ट्रोक, फुफ्फुसाचा कॅन्सर, श्वसनमार्गात संसर्ग इत्यादी रोगातून) कारणीभूत ठरतात. यातील चीनमध्ये १८ लाख व भारतात दहा लाख मृत्यू होतात, असे निरीक्षण-अहवालात लिहिलेले आहे.

एकीकडे राजधानी दिल्लीतील वायुप्रदूषणाबद्दल चिंता व्यक्त होत असताना, दुसरीकडे मुंबईमधील प्रदूषणात वाढ होऊ लागली आहे. मागील अनेक दिवस मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली आहे. काही दिवसापूर्वी संपूर्ण मुंबईतील हवेची वाईट श्रेणीत नोंद झाली आहे. यामुळे नागरिकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे.

मुंबईतील हवेची गुणवत्ता शहरातील वाईट स्थितीमध्ये आढळली आहे.

(दहा ठिकाणी हवा दर्जा निर्देशांक २०० पेक्षा अधिक २०१ ते ३००) आणि तीन ठिकाणी समाधानकारक नाही, निर्देशांक २००च्या खाली १०१ ते २००)

२० मोजणी केंद्रांपैकी दहा ठिकाणी बीकेसी, बोरिवली पूर्व, भायखळा, चेंबूर, घाटकोपर, मालाड पश्चिम, माजगाव, नेव्हीनगर कुलाबा, शिवडी, सिद्धार्थनगर वरळी (हवेचा दर्जा निर्देशांक २०० हून अधिक) तीन ठिकाणी पवई, माईन्ड स्पेस मालाड, वसई पश्चिम येथे समाधानकारक आढळला नाही. (हवेचा दर्जा निर्देशांक २००च्या खाली) सरासरी दर्जा निर्देशांक १९५.१
हवा निरीक्षणावरून तापमान खाली आले आहे व वार्‍याचा वेग मंदावला आहे. हवेत वाहनांच्या व औद्योगिक ठिकाणे व बांधकामामुळे सोडलेल्या उत्सर्जनाबरोबर धूळ व बाष्प हवेत आढळले आहेत.

वाईट हवेच्या दर्जामुळे नागरिकांना श्वास घेताना त्रास वाटायला लागले आहे. तसेच घसा खवखवणे, सर्दी, ताप ही लक्षणे पण जाणवत आहेत.

पुनश्च प्रदूषण नियंत्रण!

मुंबई महापालिकेतील कर्मचारीवर्ग महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या कामात व्यस्त असल्याने प्रदूषण नियंत्रण व प्रदूषणविरोधी कारवाईचे काम थंडावलेले होते. निवडणुका संपताच महापालिका पुन्हा जोमाने कामाला लागली असून, सर्व बांधकाम व विकासकामांच्या ठिकाणी पाहणी करण्याच्या सूचना पर्यावरण खात्यातील उपअभियंत्यांना देण्यात आल्या आहेत. याअंतर्गत मुंबईतील पाच ते साडेपाच हजार कामांची पाहणी करून नियमभंग करणार्‍यांना नोटिसा बजावण्यात येणार आहेत.
याआधी पर्यावरण खात्यातील वरिष्ठ अधिकारी व उपअभियंते यांची यासंदर्भात एक बैठक पार पडली. त्यावेळी पाहणी दरम्यान प्रदूषण नियंत्रणासाठी असलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न झाल्याचे आढळताच अंमलबजावणी न केल्यास उपअभियंत्यांकडून वॉर्ड अधिकार्‍यामार्फत विकासक वा कंत्राटदारांना कारणे दाखवा आणि काम थांबवण्याची नोटीस बजावून कठोर कारवाई केली जाणार आहे.

मुंबईतील हवेची गुणवत्ता २०२३ सालापासून सातत्याने खालावत असल्याने, धूळ प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने विविध उपाययोजना करण्यास सुरुवात केली. या अंतर्गत ऑक्टोबर २०२३ साली एक परिपत्रक जारी करून मुंबईतील बांधकाम ठिकाणांवर प्रदूषण नियंत्रण उपायांची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. यामध्ये २९ मार्गदर्शक तत्त्वांचा उल्लेख करण्यात आला होता.

एक एकर व त्याहून अधिक क्षेत्रात बांधकाम असल्यास जागेच्या अवतीभोवती किमान ३५ फूट आणि एक एकरापेक्षा कमी भूखंडावर बांधकाम असल्यास किमान २५ फूट उंचीचे लोखंडी पत्र्याचे किंवा कापडाचे आच्छादन असावे, प्रत्येक बांधकामाच्या ठिकाणी तुषार फवारणी (ीिीळपज्ञश्रशी) यंत्रणा, धूळ उडू नये यासाठी किमान चार ते पाच वेळेला पाण्याची फवारणी करावी, प्रत्येक बांधकामाठिकाणी पुढील १५ दिवसात धूळ प्रतिबंधक यंत्र (अ‍ॅन्टी स्मॉग मशीन) बसवावे. इत्यादी मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश करण्यात आला आहे. बांधकामाच्या ठिकाणी कामगार वा कोणीही जेवणासाठी लाकडाचा वापर जाळून धूर करणारा असेल, तर तो थांबवून त्याजागी इलेक्ट्रिक शेगडी उपलब्ध करावी. या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचा त्यात समावेश करण्यात आला आहे. महापालिकेच्या पर्यावरण खात्यातील २० उपअभियंत्यांकडे प्रदूषण नियंत्रणाची जबाबदारी दिली आहे.

धुळीचे प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना
एअर प्युरीफायर

धुळीमुळे प्रदूषणात वाढ होत असल्याने त्याला अटकाव करणे आणि त्याचे निरीक्षण करून हवा शुद्ध करण्यासाठी महापालिकेनी जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड, दहिसर चेक नाका, बीकेसी, छेडानगर चेंबूर, मुलुंड पश्चिम चेकनाका या पाच ठिकाणी दहा मशिन्स (एअर प्युरीफायरच्या यंत्रणा बसविल्या आहेत.) मुंबईतील आणखी काही महत्त्वाच्या ठिकाणी पण, अशा यंत्रणा बसविण्याचा महापालिकेचा विचार आहे. त्यासाठी सर्वेक्षण सुरू आहे.

वायुप्रदूषणावर एअरशेडचाचा उपाय

मुंबईतील वायुप्रदूषणाच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी स्थानिक पातळीवरील स्रोतांवर नियंत्रण करण्यात येते. मात्र, शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी या उपाययोजना पुरेशा नाहीत. विशेषत: हिवाळ्यात अंतर्गत व बाह्य कारणांमुळे प्रदूषण वाढते. तेव्हा या उपाययोजना प्रभावी ठरत नाहीत. त्यासाठी प्रादेशिक एअरशेड हा उपाय अवलंबण्याची गरज असल्याचे नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका अभ्यासातून निष्पन्न झाले आहे.

हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी ‘एअरशेड’ या शास्त्रीय संज्ञेचा अवलंब करण्यात येतो. एखाद्या ठिकाणी हवा प्रदूषण होत असल्यास तेथील प्रदूषणाची तीव्रता मोजणे आणि त्यावर ठोस उपाययोजनादेखील करणे म्हणजे ‘एअरशेड.’ ‘एअरशेड’ संज्ञेत हवा गुणवत्ता व्यवस्थापन केवळ एका शहरापुरते मर्यादित न राहता, सर्व संबंधित भौगोलिक क्षेत्राचा व संबंधित घटकांचा विचार केला जातो.

दरम्यान, ‘एमडीपीआय’च्या ‘एअर जर्नल’मध्ये प्रकाशित झालेल्या ‘डिझायनिंग एअरशेड्स इन इंडिया फॉर अर्बन अ‍ॅन्ड रिजनल एअर क्वालिटी मॅनेजमेंट’ या अभ्यासात भारताची १५ प्रादेशिक ‘एअरशेड’मध्ये विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक ‘एअरशेड’ची मांडणी त्या क्षेत्रातील विशिष्ट हवामान आणि प्रदूषण पद्धतीनुसार तयार केली जाते. या दृष्टिकोनामुळे शहरातील व शहराबाहेरील प्रदूषणाची समस्या हाताळून मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारता येईल, असे या अभ्यासात नमूद करण्यात आलेले आहे.

लगतच्या शहरामध्येही उपाययोजना करणे शक्य

‘एअरशेड’मध्ये मुंबई सागरी किनारपट्टीचा भाग विचारात घ्यावा. त्यामुळे मुंबई व लगतच्या सर्व शहरांमधील उत्सर्जन स्रोतासंदर्भात प्रभावी उपाययोजना करणे शक्य होईल, असे या अभ्यासात दाखविण्यात आले आहे. त्याचबरोबर प्रादेशिक ‘एअरशेड’च्या दृष्टिकोनामुळे प्रशासकीय यंत्रणांमधील सहकार्याला चालना मिळेल. सरकारने व महापालिकेने मुंबईतील वाईट हवा शास्त्रीय पद्धतीने प्रदूषण नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करावा.
Powered By Sangraha 9.0