मुंबई : 'मातोश्री' म्हणजे लाखो शिवसैनिकांचे श्रद्धास्थान. बाळासाहेब ठाकरे यांच्या एका हाकेवर राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक मातोश्रीबाहेर ( Matoshree ) जमायचे. पण, बाळासाहेबांच्या पश्चात 'मातोश्री'चा रुतबा कमी झाला. 'मातोश्री'वरील राजकीय दरबाराची जागा 'किचन कॅबिनेट'ने घेतली. त्यांचेचे निर्णय पक्षात अंतिम ठरू लागले. संघटनात्मक पातळीवर कर्तृत्वशून्य असलेल्या शिलेदारांचा भरणा त्यात असल्यामुळे अधोगतीशिवाय काहीच हाती लागले नाही. विधानसभा निवडणूक हे त्याचे ताजे उदाहरण. परंतु, विधानसभेत सपाटून मार खाल्ल्यानंतरही मातोश्रीचे 'किचन कॅबिनेट'वरील प्रेम कमी झालेले नाही.
दुधाने तोंड पोळले, तर ताक देखील फुंकून प्यावे, असे म्हणतात. महाविकास आघाडीत अनेकवेळा तोंड पोळल्यानंतरही उद्धव ठाकरेंच्या वर्तनात सुधारणा झालेली नाही. त्याचा फटका विधानसभा निवडणुकीत सहन करावा लागला. भाजपसोबत असताना, ठाकरेंच्या ६० हून अधिक जागा निवडून यायच्या. आता ती संख्या २० पर्यंत खाली आहे. 'किचन कॅबिनेट'च्या भरवशावर निवडणुका लढवल्या गेल्याने ही वेळ ओढवली. त्यामुळे पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी उद्धव ठाकरे पालिका निवडणुकीची धुरा स्वतःच्या हाती घेतील, अशी अपेक्षा होती. मात्र, नेहमीप्रमाणे त्यांनी 'किचन कॅबिनेट'वर जबाबदारी ढकलली आणि स्वतः नामानिराळे राहिले.
मंगळवार, दि. ३ डिसेंबर रोजी मातोश्री निवासस्थानी मुंबईतील उबाठा गटाच्या माजी नगरसेवकांची बैठक आयोजित करण्यात आली. मविआतून बाहेर पडून स्वबळाची चाचपणी करण्याची करण्याची विनंती अनेकांनी व्यक्त केली. मात्र, त्यांच्या विनंतीला उद्धव ठाकरे यांनी केराची टोपली दाखवली. उलट उपऱ्यांचा भरणा असलेल्या 'किचन कॅबिनेट'कडे पालिका जिंकण्याची जबाबदारी देण्यात आली. यात विनायक राऊत, अनिल परब, मिलिंद नार्वेकर, वरुण सरदेसाई, सुनील राऊत, बाळा नर, सुनील शिंदे, अमोल कीर्तिकर यांच्यासह एकूण १८ जणांचा समावेश आहे. प्रत्येकी दोन विधानसभेतील १२ प्रभागांचा आढावा ते घेतील. आठवडाभरात अहवाल तयार करून उद्धव ठाकरेंना सादर करतील. या अहवालाच्या आधारावर महापालिकेच्या जागांची वर्गवारी करुन ठाकरे गटाकडून पुढील आराखडा निश्चित केला जाणार आहे.
पालिका निवडणुकीची जबाबदारी कुणाकडे?
विनायक राऊत - कुर्ला आणि विक्रोळी, अनिल परब - मलबार हिल आणि कुलाबा, मिलिंद नार्वेकर - माहिम आणि शिवडी, वरुण सरदेसाई - कलिना आणि वांद्रे पश्चिम, विश्वनाथ नेरुरकर - विलेपार्ले आणि चांदिवली, रवींद्र मिर्लेकर - वांद्रे पूर्व आणि वरळी, अमोल कीर्तिकर - दहिसर आणि मागठाणे, दत्ता दळवी - जोगेश्वरी पूर्व आणि दिंडोशी, सुनिल राऊत - वडाळा आणि भायखळा, सुनील शिंदे - मुलुंड आणि भांडुप पश्चिम, बाळा नर - चारकोप आणि मालाड पश्चिम, बबनराव थोरात - अंधेरी पूर्व आणि अंधेरी पश्चिम, शैलेश परब - बोरीवली आणि कांदिवली पूर्व, उद्धव कदम - धारावी आणि सायन कोळीवाडा, विलास पोतनीस - वर्सोवा आणि गोरेगाव, सुहास वाडकर - घाटकोपर पश्चिम आणि घाटकोपर पूर्व, शैलेश फणसे - मानखुर्द शिवाजीनगर आणि मुंबादेवी, संजय घाडी - अणुशक्ती नगर आणि चेंबूर