मुंबई : “मराठी ( Marathi ) भाषा ही महाराष्ट्राची मातृभाषा आहे, आपली अस्मिता आहे. त्यामुळे इथे मराठीत न बोलता एका ठराविक भाषेत बोला, अशी सक्ती कोणी करत असेल, तर ते चुकीचे आहे. मराठी भाषेचा अवमान कदापी सहन करणार नाही,” अशी प्रतिक्रिया मलबार हिल मतदारसंघाचे आमदार मंगल प्रभात लोढा यांनी मंगळवार, दि. ३ डिसेंबर रोजी दिली.
गिरगावातील खेतवाडीमध्ये एक मराठी महिला दुकानात गेली असता, त्या दुकानदाराने तिला मराठीत का बोलली, याचा जाब विचारला. ‘बीजेपी आया है, मारवाडी में बात करनेका। मुंबई बीजेपी का, मुंबई मारवाडी का,’ अशी अरेरावी दुकानदाराने केल्याचा आरोप संबंधित महिलेने केला. त्यानंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. आमदार लोढा यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला.
आमदार लोढा म्हणाले की, “भाजपचे नाव घेऊन, असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. मुंबई सर्वांची आहे. परंतु, ती सर्वात आधी मराठी माणसाची आहे. त्यामुळे असा भाषिक द्वेष पसरवणार्या व्यक्तीवर कारवाई व्हावी, अशी आमची इच्छा आहे,” असे लोढा यांनी सांगितले.