भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 'भीमराया तुझ्यामुळे' गाण्याद्वारे अभिवादन
04-Dec-2024
Total Views |
मुंबई : भारतीय संविधानाचे निर्माते, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे सर्वसामान्यांना हक्क, अधिकार मिळाले. या अधिकार, हक्कांनी कित्येकांचे आयुष्य बदलले. ही माणूस म्हणून घडण्याची गोष्ट भीमराया तुझ्यामुळे या व्हिडिओतून अनोख्या आणि भावस्पर्शी पद्धतीने मांडण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे, या म्युझिक व्हिडिओतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाला अभिवादन करण्यात आलं आहे.
पूर्वीच्या काळी समाजरचनेमध्ये भेदभावाची, उच्च-कनिष्ठता मानण्याची अनिष्ट प्रथा होती. मात्र, आता मोठा सरकारी अधिकारी झालेला तरूण आपल्या गावी येतो. कष्ट करणारी आई, कष्टातून घेतलेलं शिक्षण, गावात अनुभवलेला भेदभाव या सगळ्या गोष्टी त्याला आठवतात. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेला संघर्ष, देशाचं केलेलं संविधान यामुळे त्या मुलाला त्याचा शिक्षणाचा, जगण्याचा हक्क मिळून त्याचं आयुष्य कसं बदलतं याची गोष्ट या म्युझिक व्हिडिओतून उलगडण्यात आली आहे.
अमित बाईंग, सचिन जाधव, प्रदीप जाधव यांनी या म्युझिक व्हिडिओची निर्मिती केली आहे. अमित बाईंग यांनी दिग्दर्शनाचीही जबाबदारी निभावली आहे. श्रेयश राज अंगाणे यांनी संगीत दिग्दर्शन, गीतलेखन, पटकथा लेखन, संवाद लेखन, निखिल चंद्रकांत पाटील यांनी कथालेखन, हरेश सावंत यांनी छायांकन केलं आहे.प्रसिद्ध गायक मनीष राजगिरेच्या आवाजात हे गीत स्वरबद्ध करण्यात आले आहे.म्युझिक व्हिडिओमध्ये अभिनेत्री मेघा घाडगे यांच्यासह नितेश कांबळे, मानस तोंडवळकर, नरेंद्र केरेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.