मुंबई : “प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत महापालिका शाळेत शिक्षण घेऊन उल्लेखनीय कामगिरी करणार्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे,” असे मत माजी मंत्री विजय (भाई) गिरकर ( Bhai Girkar ) यांनी गुणवंत विद्यार्थी कौतुक समारंभ कार्यक्रमात व्यक्त केले. ‘समता परिषद’ मुंबईच्या वतीने महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळांमधून दहावीच्या परिक्षेत ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक समारंभ दादर येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात एकूण ६० विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, यामध्ये ९७.४० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या आयुष जाधव याचा समावेश होता.
यावेळी बोलताना समता परिषदेचे अध्यक्ष भाई गिरकर म्हणाले की, “समता परिषद’ मागील ४५ वर्षांपासून अशा विद्यार्थ्यांचा गुणगौरव करीत आहे. मुंबईच्या चाळींमध्ये राहणारे हे विद्यार्थी दहा बाय दहाच्या खोलीत राहून शिक्षण घेत असतात आणि उत्तम गुण मिळवून उल्लेखनीय कामगिरी करतात. यामुळेच आम्ही त्यांना प्रोत्साहित करून त्यांच्यात नवी उमेद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतो. यावेळी विद्यार्थ्यांनीदेखील त्यांच्या कार्याची दखल घेतल्याबद्दल ‘समता परिषदे’चे आभार व्यक्त केले. यावेळी ‘समता परिषद’ मुंबईचे कार्याध्यक्ष अशोक कांबळे, सरचिटणीस संजय अढांगळे, महिला प्रमुख योजना ठोकळे, शिक्षण विभाग प्रमुख विजय (भाऊ) पवार, उदय पडेलकर, सुभाष कांबळे, देवदत्त तांबे व इतर पदाधिकारी तसेच गुणवंत विद्यार्थी-पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.