बहुआयामी नेतृत्व : देवेंद्र फडणवीस

    04-Dec-2024
Total Views |
 
fadnavis
 
देवेंद्रजी फडणवीस यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण एका चांगल्या सुसंस्कृत वातावरणात झाली आणि त्याला संघ संस्कारांची जोड मिळाली. सहवासात आलेल्या चांगल्या माणसांकडून प्रेरणा घेत त्यांनी स्वतःचे व्यक्तिमत्त्व सुंदर रितीने साकारले. घरातील संघप्रेमी वातावरणामुळे समाजकारणाची आवड वाढत गेली. घरात शिस्त होती. वडील गंगाधरराव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी. समाजकारणाचे धडे ते आपल्या घरात वडिलांकडूनच गिरवत होते. राजकीय जीवनात आपण कसे असायला हवे, याचा आदर्श त्यांच्या घरातून त्यांना दररोज पाहायला मिळत होता. परंतु, वयाच्या 17व्या वर्षी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. ऐन तारुण्यात असताना वडिलांचे छत्र हरपल्याने आपोआपच एक जबाबदारीची जाणीव आणि व्यक्तिमत्त्वात प्रगल्भता येत गेली.
 
कोणत्याही माणसाच्या जीवनाला आकार येताना काही गोष्टी महत्त्वाच्या ठरत असतात. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो, तो त्याला घरातून मिळणारे संस्कार आणि त्याच्या आजूबाजूचे भावविश्व! मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण एका चांगल्या सुसंस्कृत वातावरणात झाली आणि त्याला संघ संस्कारांची जोड मिळाली. सहवासात आलेल्या चांगल्या माणसांकडून प्रेरणा घेत त्यांनी स्वतःचे व्यक्तिमत्त्व सुंदर रितीने साकारले. घरातील संघप्रेमी वातावरणामुळे समाजकारणाची आवड वाढत गेली. घरात शिस्त होती. वडील गंगाधरराव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी. समाजकारणाचे धडे ते आपल्या घरात वडिलांकडूनच गिरवत होते. राजकीय जीवनात आपण कसे असायला हवे, याचा आदर्श त्यांच्या घरातून त्यांना दररोज पाहायला मिळत होता. परंतु, वयाच्या 17व्या वर्षी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. ऐन तारुण्यात असताना वडिलांचे छत्र हरपल्याने आपोआपच एक जबाबदारीची जाणीव आणि व्यक्तिमत्त्वात प्रगल्भता येत गेली.
 
समाजसेवा आणि पर्यायाने राष्ट्रसेवा करायची, हे बाळकडू आईकडूनच मिळालेले असल्याने त्यांनी स्वतःला पूर्णवेळ समाजकारणात आणि राजकारणात झोकून दिले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी नाळ जुळलेली असल्याने त्यांचे संस्कार आणि राष्ट्रप्रेमाचे विचार नसानसांत भिनत गेले. म्हणूनच जेव्हा देवेंद्रजी वयाच्या 21व्या वर्षात पोहोचले, तेव्हाच त्यांच्या मनामध्ये पूर्णवेळ संघाचे प्रचारक म्हणून बाहेर पडण्याचा विचार रुंजी घालू लागला. त्यांनी आपल्या मनातील हा निश्चय सर्वप्रथम आपल्या आईला बोलून दाखवला होता. घर-संसार सारे काही सोडून संघालाच आपले घर मानायचे आणि त्यासाठी घरदार सोडून प्रचारक म्हणून बाहेर पडायचे, हा धाडसी विचार होता. परंतु, समाजसेवा करायची, तर प्रत्येकाने प्रचारकच बनायला हवे असे नाही. इथे राहून, संसार सांभाळूनसुद्धा राष्ट्रसेवा, समाजसेवा निश्चितपणाने करता येऊ शकते, असे आईने त्यांना समजावले. तेव्हा त्यांचा विचार बदलला आणि त्यांनी प्रचारक म्हणून बाहेर पडण्याचा विचार बाजूला ठेवला. त्यानंतर महापालिकेची निवडणूक लढवण्याचे ठरवून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि नगरसेवक झाले. तिथपासून जो त्यांचा राजकीय जीवनाचा प्रवास सुरू झाला, तो कोणीच रोखू शकला नाही, तो अगदी आजतागायत!
 
कोणतेही राजकीय पद असो किंवा कोणतीही नवी जबाबदारी असो, ती सांभाळत असताना आपण त्या पदाचे विश्वस्त आहोत, मालक नाही, या जबाबदारीच्या आणि नम्रतेच्या भावनेने ते काम करीत असल्याने ते पद किंवा त्यामुळे येणारी प्रतिष्ठा यांनी ते हुरळून जात नाहीत. त्या पदावर राहून आपल्याला लोकसेवाच करायची आहे, ही भूमिका त्यांच्या मनात पक्की झालेली आहे, अन्यथा पद आले की, त्याबरोबर येणारी प्रतिष्ठा डोक्यात हवा भरते व त्यातून मग उद्दामपणा, अरेरावी, मनमानी कारभार अशा गोष्टी सुरू होतात. परंतु, प्रत्येक पदाकडे पाहण्याचा देवेंद्रजींचा दृष्टिकोनच वेगळा असल्याकारणाने ते सर्वांपेक्षा वेगळे ठरतात आणि एका वेगळ्याच भूमिकेतून प्रत्येक जबाबदारी निभावतात. एखादी गोष्ट माझी आहे, अशी भावना निर्माण झाली की, त्यातून अनेक चुकीच्या गोष्टी घडतात. परंतु, एखादी गोष्ट सांभाळण्यासाठी माझी जबाबदारीने नेमणूक केली गेली आहे आणि विश्वस्ताच्या भूमिकेतूनच मला काम करायचे आहे, असा दृष्टिकोन असेल, तर तो आपोआपच त्या कामातूनही प्रतिबिंबित होत असतो. त्याचप्रमाणे निष्कलंक चारित्र्यालाही तो पूरक ठरत असतो. राजकीय जीवनातही देवेंद्रजींची जी चारित्र्यसंपन्नता आणि निष्कलंकपणा दिसून येतो, त्याचे बहुधा हेच गमक असावे.
 
नागपूरातून स्थानिक पातळीवरून राजकारण सुरू करून अल्पावधीत राज्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचे केंद्र बनलेल्या देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे अद्वितीय असे संघटनकौशल्य आहे. बोलण्यातील अदब, दुसर्‍याचा आदर करण्याची वृत्ती, माणुसकीची खरी चाड, मूल्यांशी व तत्त्वांशी कोणत्याही पातळीवर तडजोड न करण्याचे खंबीर धोरण आणि अद्वितीय असे नेतृत्वगुण यामुळे लोक त्यांच्याकडे स्वाभाविकपणे आकर्षित होतात आणि ते माणसांना कायम जोडून ठेवतात. आपल्या वर्तुळापुरते मर्यादित राहणारे नेते अनेक दिसून येतात. परंतु, आपला परीघ सातत्याने विस्तारता ठेवून अधिकाधिक लोकांना त्यात सामावून घेणारा नेताच खरा संघटनकुशल असतो. देवेंद्रजींनी अवघ्या महाराष्ट्रभरात कार्यकर्त्यांचे जाळे विस्तारलेले आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात, छोट्यातील छोट्या गावांत त्यांनी दौरे केलेले आहेत. सभा घेतलेल्या आहेत. पक्षाचा विस्तार करण्यासाठी घाम गाळलेला आहे. त्यामुळे अगदी छोट्याशा गावातील कार्यकर्तासुद्धा ते लक्षात ठेवतात आणि पक्ष उभारणीच्या कामातील एक महत्त्वाचा दुवा म्हणून ते त्याच्याकडे पाहतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बाळकडू मिळालेल्या देवेंद्रजींना संघटनेचे बळ काय असते, याची पूर्णपणे कल्पना आहे. त्यामुळे पक्षाशी जोडला जाणारा प्रत्येक कार्यकर्ता हा पक्षउभारणीच्या कामातील एक महत्त्वाचे योगदान देणारा ठरू शकतो, याची त्यांना पूर्णपणे जाणीव आहे, म्हणूनच ते कार्यकर्त्यांना जपतात. त्यांचे नुसते चेहरे लक्षात ठेवतात असे नाही, तर महाराष्ट्रभरातील असंख्य कार्यकर्त्यांना ते नावासह ओळखतात. त्या त्या गावात गेल्यानंतर त्या कार्यकर्त्यांना जेव्हा ते नावाने हाक मारतात, तेव्हा इतक्या मोठ्या नेत्याने आपली ओळख ठेवली, ही जाणीवच कार्यकर्त्याला पक्षाशी घट्ट जोडते आणि तो अधिक उत्साहाने, उमेदीने पक्षासाठी काम करतो.
 
अडीअडचणीच्या काळात मदत करणारा, संकटकाळात धावून येणारा, चांगली संधी मिळवून देणारा नेता असे स्थान त्यांनी कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण केले आहे. अधिकाधिक चांगले युवक पक्षाशी जोडले जावे आणि नवी युवा पिढीसुद्धा उभी राहावी, यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याचेही आढळून येते. त्यामुळेच त्यांनी युवा वर्गाला अधिकाधिक संधी देऊन त्यांच्यासाठी नव्या वाटा खुल्या केल्याचे दिसते. संघटना वाढली तर पक्षही वाढतो, हे सूत्र लक्षात घेऊन त्यांनी संघटन मजबूत करण्यावर विशेषत्वाने भर दिलेला आहे. आपल्यावर जी जबाबदारी पडेल, त्याला संपूर्णपणे न्याय देताना अधिकाधिक नव्या चेहर्‍यांना वाव आणि जुन्या जाणत्यांना विकासाची संधी अशा दुहेरी पातळीवर काम करून त्यांनी आपले संघटन कौशल्य कायमच पणाला लावले आहे आणि पक्षाला मजबूत करण्यासाठी खूप मोलाचे योगदान दिलेले आहे. केवळ स्वतःसाठी न जगता समाजासाठी जगून त्यांनी स्वार्थी व संकुचित जीवन त्यागले आहे आणि उदात्त व आदर्श जीवनाचा स्वीकार केला आहे. त्यामुळेच आनंदी वृत्तीने काम करताना त्यांच्यातील कार्यकर्ता आणि नेता एकाचवेळी जागा असतो आणि समाजहितासाठी तो कायम दक्ष राहून कार्य करीत असतो, हेच वेळोवेळी दिसून आले आहे.
 
शाश्वत विकास घडवून आणण्यासाठी नेत्याकडे समग्र दूरदृष्टी असणे आवश्यक असते. देवेंद्रजींनी आजवर घेतलेल्या निर्णयांचा अभ्यास करता, त्यांनी राबवलेल्या विकासकामांमधील दूरदृष्टीच्या जाणिवेची कितीतरी उदाहरणे देता येऊ शकतील. जो नेता काळाच्या पुढे पाहू शकतो आणि भविष्याचा वेध घेऊ शकतो, तोच नेता दूरदृष्टीने पाऊले टाकीत जातो. देवेंद्रजी हेसुद्धा असेच दूरदृष्टीने विचार करणारे व्यक्तिमत्त्व आणि नेतृत्व आहे. मराठवाड्यातील पाण्याच्या समस्येची सोडवणूक करण्यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार हे त्यांच्या दूरदृष्टीच्या अनेकानेक उदाहरणांपैकी एक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतानादेखील त्यांची महाराष्ट्राच्या विकासाविषयीची आणि प्रगतीविषयीची दूरदृष्टी दिसून आली होती. ज्या प्रलंबित प्रश्नांना हात लावायला पूर्वीची सरकारे धजावत नव्हती, असेही विषय त्यांनी मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला आणि त्यासाठी आवश्यक तो पुढाकारही घेतला. कोणताही प्रश्न चिघळू न देता, संवादाच्या पातळीवर सोडवता येऊ शकतो, याचे नेमके भान त्यांना असल्याने त्यांनी त्या प्रश्नांची तत्काळ सोडवणूक करण्यावर भर दिला. ऑनलाईन सातबारा उतारे, महा ई-सेवा केंद्र अशा अनेकानेक प्रभावी योजनांच्या माध्यमातून दूरगामी बदल करण्यावर त्यांनी सातत्याने भर दिला. अनेक महत्त्वाकांक्षी योजनांच्या माध्यमातून नवी रोजगारनिर्मिती, औद्योगिक विकास आणि आत्मनिर्भरता निर्माण करण्यासाठी भरीव योगदान देण्याचे काम केले.
 
fadnavis 
 
देवेंद्रजींचे दैनंदिन वेळापत्रक पाहिले तरीसुद्धा हा माणूस एका दिवसात किती प्रकारचे काम करतो, हे पाहून थक्क व्हायला होईल आणि तेवढे एखादा दुसरा करू गेल्यास त्याची मती गुंग होईल. दिवसभराचे कार्यालयीन काम हातावेगळे करणे, विविध प्रकारच्या फायलींचा निपटारा करणे हे तसे वेळखाऊ काम असते. परंतु, वेळेचे अचूक नियोजन केलेले असले तर त्यात अधिक वेळ जात नाही. उलट चांगल्या रितीने त्या त्या दिवसाचे विषय मार्गी लागतात. त्या त्या दिवसाचे विषय त्या त्या दिवशीच मार्गी लावायचे आणि ‘पेंडिंग फाईल’ हा विषय ठेवायचा नाही, हा त्यांचा दंडक असल्याने ते बारकाईने पाहून अनेक विषय वेगाने हातावेगळे करतात. कायद्याचा सूक्ष्म आणि सखोल अभ्यास असल्याने गुंतागुंतीच्या विषयांचेही इतरांपेक्षा त्यांना वेगाने आकलन होते. त्यामुळे ते विषय हातावेगळे करणे आणि महत्त्वाच्या विषयांवर टिप्पणी करून ते पुढे कसे जातील हे पाहणे, हा प्रशासकीय कौशल्याचा भाग त्यांच्या अंगवळणी पडलेला आहे.
 
हे सारे करीत असताना अनेक शिष्टम मान्यवर, ओळखी अंगवळाचे लोक, राजकीय नेते, अडीअडचणीत असलेले लोक असे सारे भेटीला येत असतात. त्यांच्याही भेटीचे यथायोग्य नियोजन करून त्यांनाही पुरेसा व समाधानकारक वेळ देतात. ज्यावेळी ज्या विषयात असू त्यावेळी त्याच विषयात लक्ष घालायचे, ही एक चांगली सवय त्यांनी लावून घेतलेली असल्याने कामांचा गोंधळ उडत नाही. समोरच्यालाही आपले नीटपणाने ऐकून घेतले आणि यथायोग्य मार्गदर्शन केले, याचे समाधान मिळते. त्यांच्या या नियोजनबद्ध कामाच्या पद्धतीमुळे अनेक प्रलंबित असणारे विषयही लवकर मार्गी लागल्याचे लोक आवर्जून सांगतात. हे सारे करीत असताना पक्षाचा राज्यातील प्रमुख चेहरा या नात्याने त्यांना विविध सभा, समारंभ, संमेलने आणि कार्यक्रम यांना उपस्थित राहावे लागते. तिथेसुद्धा आपण वेळेत उपस्थित राहू, असा त्यांचा कटाक्ष असतो. दिवसभराचे काटेकोर नियोजन असल्याने त्यामध्ये कार्यक्रम व सभांचे नियोजन अगदी योग्य रितीने केलेले असते, कोणत्याही जाहीर कार्यक्रमात अथवा समारंभात त्यांचा उत्साह तसूभरही कमी नसतो. कार्यक्रमाचे स्वरुप लक्षात घेऊन ते तितक्याच प्रभावीपणाने तिथे आपली छाप सोडून जातात. राज्यात घडणार्‍या प्रत्येक घडामोडीकडे त्यांचे अतिशय बारीक लक्ष असते. त्यामुळे त्या संदर्भातील आवश्यक ती माहिती घेणे, त्या घटनांचा अन्वयार्थ लावणे आणि त्याचे विश्लेषण करणे, याही बाबतीत ते अतिशय चाणाक्ष आहेत. सरकारी लवाजमा हाताशी असला म्हणून निवांतपणा आहे, असे त्यांच्याबाबतीत कधीच पाहिले नाही. जबाबदारी कोणतीही असो, पूर्ण क्षमतेने आणि ताकदीनेच ती निभावायची, हा त्यांचाशिरस्ता राहिलेला आहे.
 
त्यामुळे मुख्यमंत्रिपदाची धुरा खांद्यावर घेण्याआधीसुद्धा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून किंवा विरोधी पक्षनेते म्हणून जबाबदारी असतानादेखील ते त्याच तडफेने सातत्याने कार्यरत असल्याचे दिसून आलेले आहे. प्रत्येक जबाबदारीला पूर्णपणे न्याय द्यायचा आणि त्या कर्तव्याशी प्रामाणिक राहायचे, हा त्यांचा स्थायीभाव आहे. पक्षाशी न्याय दाय आणि निष्ठा असल्याकारणाने पक्ष जी जबाबदारी सोपवेल, ती त्याच निष्ठेने आणि परिणामकारक पद्धतीने करणे, हा देवेंद्रजींच्या कार्याचा विशेष आहे. संपूर्ण जीवन राष्ट्राला समर्पित या भूमिकेतून झोकून देऊन काम करीत असल्याने पद, प्रतिष्ठा, मानमरातब यापेक्षाही चांगले काम उभे करणे, यावर त्यांचा अधिकतर भर दिसून येतो. जिथे ज्या भूमिकेत असू तिथून चांगले राष्ट्रहिताचे व समाजबांधणीचे काम करीत राहायचे, या समर्पित वृत्तीने देवेंद्रजींसारखे असंख्य निष्ठावान कार्यकर्ते काम करतात. देवेंद्रजींनीदेखील हाच मूलमंत्र अंगी बाणवलेला असल्याकारणाने कोणत्याही परिस्थितीमध्ये ते अतिशय सक्रिय पद्धतीने कार्यरत असल्याचेच दिसून येते. त्यामुळे कोल्हापूरात आलेला पूर व पुराने उडवलेल्या हाहाकाराची परिस्थिती असो किंवा मग ‘कोरोना’सारखी महामारीची स्थिती असो, देवेंद्रजी हे कायम ’ऑनफिल्ड’ राहून काम करताना दिसतात. ‘लोकांमध्ये मिसळणारा जननेता’ ही त्यांची ओळख त्यांनी अगदी सुरुवातीपासून जपली आहे. लोकांमध्ये गेल्याशिवाय लोकांचे प्रश्न समजत नाहीत, याचे नेमके भान त्यांना आहे. कोणतीही आपत्ती आल्यानंतर तातडीने घटनास्थळी धाव घेऊन लोकांच्या समस्या ते कायमच जाणून घेतात. जनतेला आधार देतात. लोकांना तातडीने मदत मिळण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला गतिमान करून संबंधित अधिकार्‍यांना समाजाच्या मदतीसाठी कार्यप्रवण करण्यात ते कायमच आघाडीवर असतात. अशा या बहुआयामी नेतृत्वाकडे महाराष्ट्राची सूत्रे गेल्यामुळे राज्याचा भविष्यकाळ उज्ज्वल होईल, यात शंका नाही.
 
 
 
अ‍ॅड. मंगल प्रभात लोढा, आमदार, भाजप