रामाला राज्याभिषेक होण्याच्या काही तास आधीच अनपेक्षितपणे वनवासाची वाट धरावी लागली, तसेच काहीसे देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतही पाच वर्षांपूर्वी घडले होते. पण, जनतेच्या सामूहिक शहाणपणावर आणि आपल्या कर्तृत्त्वावर अढळ विश्वास असलेल्या फडणवीस यांनी नव्या जोमाने विरोधी पक्षनेत्याच्या कार्याला झोकून दिले आणि केवळ अडीच वर्षांत आपल्यावरील डाव उलटून दाखविला. तेव्हाही सत्तेचा मुकुट आपल्या शिरावर न घेता, तो एकनाथ शिंदे यांच्या डोक्यावर घातला आणि भरताप्रमाणे राज्याची देखभाल केली. असा निष्काम कर्मयोगी नेता भाग्यवान जनतेलाच मिळतो.
रामाला राज्याभिषेक होण्याच्या काही तास आधीच अनपेक्षितपणे वनवासाची वाट धरावी लागली, तसेच काहीसे देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतही पाच वर्षांपूर्वी घडले होते. पण, जनतेच्या सामूहिक शहाणपणावर आणि आपल्या कर्तृत्त्वावर अढळ विश्वास असलेल्या फडणवीस यांनी नव्या जोमाने विरोधी पक्षनेत्याच्या कार्याला झोकून दिले आणि केवळ अडीच वर्षांत आपल्यावरील डाव उलटून दाखविला. तेव्हाही सत्तेचा मुकुट आपल्या शिरावर न घेता, तो एकनाथ शिंदे यांच्या डोक्यावर घातला आणि भरताप्रमाणे राज्याची देखभाल केली. असा निष्काम कर्मयोगी नेता भाग्यवान जनतेलाच मिळतो.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती झाल्यामुळे राज्यातील जनतेने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर दहा दिवस सुरू असलेल्या राजकीय मानापमानाच्या नाट्याने जनतेच्या मनात संभ्रम उत्पन्न झाला होता. इतका मोठा आणि स्पष्ट विजय मिळविल्यावर सरकार स्थापन होण्यास दहा दिवसांपेक्षा अधिक काळ लागेल, अशी अपेक्षाही कुणी केली नव्हती. अखेरीस आज ठरल्याप्रमाणे फडणवीस यांचा तिसर्यांदा शपथविधी होत आहे.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने मोठ्या प्रमाणावर सहभागी होऊन भाजप आणि महायुतीच्या पारड्यात भरभरून मते टाकली होती. आधुनिक काळात राज्याच्या विधानसभेत इतके मोठे बहुमत क्वचितच कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला मिळाले आहे. हा निकाल म्हणजे राज्यातील जनतेने भाजप आणि त्यातही देवेंद्र फडणवीस यांच्यावर टाकलेल्या विश्वासाचे निदर्शक आहे. याचे कारण फडणवीस यांचा चोख, स्वच्छ आणि विकासाभिमुख कारभार. आजच्या काळात राजकीय क्षेत्रात कदाचित या गोष्टी गुणांऐवजी अवगुणांमध्ये मोडत असतील. कारण, सत्तेचा दुरुपयोग करून आपले खिसे भरणे हीच सध्याच्या काळात राजकीय नेता होण्यामागील खरी प्रेरणा असते. पण, भाजप, त्यातही रा. स्व. संघासारख्या संघटनेचे संस्कार झालेल्या नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या नेत्यांची घडणच वेगळी असते.
अगदी लहान वयापासूनच देवेंद्र फडणवीस यांनी देशाविषयी असलेली आपली राष्ट्रवादी समज दाखवून दिली होती. ते बाळकडू त्यांना घरीच मिळाले होते. त्यांचे वडील गंगाधरराव हे संघाचे कार्यकर्ते होते. तसेच त्यांच्या काकू शोभाताई फडणवीस या भाजपच्या आमदारही होत्या. आणीबाणीच्या काळात आपल्या वडिलांना तुरुंगात टाकल्याबद्दल इंदिरा गांधी यांच्यावर संतापलेल्या शाळकरी वयाच्या देवेंद्रने आपल्या ‘इंदिरा कॉन्व्हेंट’ नावाच्या शाळेत जाण्यास नकार दिला होता. पुढे केवळ 22व्या वर्षी नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या फडणवीस यांनी नंतरच्या काळात आपल्या उपजत नेतृत्वगुणांनी विविध पदे भूषवत राज्यातील प्रमुख भाजप नेते अशी आपली ओळख तयार केली. संपूर्ण राज्याच्या सामाजिक स्थितीची अचूक जाण असलेले फडणवीस हे कधी ‘विदर्भाचे नेते’ म्हणून ओळखले गेले नाहीत, ते पहिल्यापासूनच राज्यव्यापी नेते राहिले. गेल्या काही दिवसांत तर त्यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष करणार अशा प्रकारची चर्चाही सुरू झाली होती. अशा अफवा राजकारणात नेहमीच उडत असल्या, तरी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या संभाव्य उमेदवारांमध्ये देवेंद्र यांचे नाव यावे, हे त्यांच्या व्यापक दूरदृष्टीचे आणि उपजत नेतृत्वगुणाचे द्योतकच म्हणावे लागते.
अगदी तरुण वयात महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद मिळाल्यावर फडणवीस यांनी एखाद्या मुरब्बी नेत्याप्रमाणे राज्यकारभार केला. राज्यातील शेतकर्याच्या मूलभूत समस्यांवर उपाय मिळेल, अशा ‘जलयुक्त शिवार’ आणि ‘शेततळे’ यांसारख्या योजना त्यांनी धडाक्याने राबविल्या. परिणामी, मराठवाड्यासारख्या सदैव दुष्काळी भागातही शेतकर्यांना उन्हाळ्यात शेतीसाठी पाणी उपलब्ध झाले होते. शहरी जनतेच्या समस्यांसाठीही त्यांनी वांद्रे-वरळी सी लिंक, भुयारी मेट्रो रेल्वे यांसारख्या प्रकल्पांना चालना दिली आणि त्यासाठी जपानकडून नगण्य दराने कर्जही मिळविले. नवी मुंबईतील नव्या विमानतळाच्या कामालाही त्यांनी वेग दिला. आता पुढील वर्षी हा विमानतळ कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.
संकटातच नेत्याची खरी कसोटी लागते, या वचनाचे प्रमाण दाखवायचे झाल्यास फडणवीस यांच्याकडेच बोट दाखवावे लागते. २०१९ मध्ये सलग दुसर्यांदा विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजप-शिवसेना युतीला बहुमत मिळवून दिले होते. यावेळी भाजपने १०५ जागांवर विजय मिळविला होता आणि मोदी यांच्या पुण्याईने शिवसेनेचेही ५७ आमदार निवडून आले होते. पण, सरकार स्थापन करण्यासाठी भाजपकडे पुरेशी संख्या नसली, तरी निवडणूकपूर्व युती असल्याने शिवसेना व भाजप यांचे पुन्हा एकदा संयुक्त सरकार स्थापन होईल आणि मोदी यांनी जाहीर केल्याप्रमाणे फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, हे स्पष्ट दिसत होते. कारण, जनादेशच तसा होता. पण, त्याचवेळी अगदी अनपेक्षित घटना घडल्या.
शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा तेव्हा उफाळली आणि तिने ही ३५ वर्षांची युती पाहता पाहता विरून गेली. आपल्या पक्षाला सर्व पर्याय खुले आहेत, या उद्धव ठाकरे यांच्या वाक्याने राज्यातील या सर्वात जुन्या युतीला हादरा दिला. आपल्या पक्षाला महत्त्वाची आणि जास्त खाती मिळावी, यासाठी उद्धव ठाकरे हे दबाव टाकीत आहेत, अशी सुरुवातीला समजूत झाली. पण, लवकरच हे प्रकरण वेगळे असल्याचे स्पष्ट झाले. मतदारांच्या जनादेशाला कचर्याच्या टोपलीत टाकण्यात आले. ज्यांच्याविरोधात नुकतीच पार पडलेली निवडणूक लढलो होतो, तेच नव्हे, तर गेली तीन दशके ज्या नेत्यांवर व पक्षांवर कठोर टीका केली, त्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांच्याच मदतीने उद्धव ठाकरे यांनी आपले मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पूर्ण केले. आपल्या मतांवर दिवसाढवळ्या पडलेला हा दरोडा असाहाय्यपणे पाहण्याखेरीज जनतेच्या हाती काहीच उरले नव्हते.
रामाला राज्याभिषेक होण्याच्या काही तास आधीच वनवासाची वाट धरावी लागली, तसेच फडणवीस यांच्याबाबत घडले. एखादा सामान्य नेता या घटनेने खचून गेला असता. पण, आपल्या कर्तृत्वावर अढळ विश्वास असलेल्या फडणवीस यांनी विरोधी नेत्याच्या कामाला तितक्याच जोमाने प्रारंभ केला. केवळ अडीच वर्षांत फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या काळातील इतके भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार उघडकीस आणले की ते सरकार जेरीस आले. फडणवीस यांच्यासह काही भाजप नेत्यांना खोट्या प्रकरणांमध्ये अडकवून तुरुंगात घालण्याची तयारीही तत्कालीन सरकारने केली होती. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राज्याच्या मुख्यमंत्र्यांपेक्षा केवळ फडणवीस यांच्यावरच विरोधकांच्या टीकेचा सारा रोख का होता, ते त्यामुळे स्पष्ट होईल. कारण, एकटे फडणवीसच त्या तीन पक्षांच्या सरकारला भारी पडले होते. सुदैवाने तेव्हा पुन्हा एकदा काळाचे चक्र फिरले आणि आपल्यावरील डाव उलथून टाकण्यात फडणवीस यांना यश आले. ‘अकेला देवेंद्र क्या करेगा?’ हा उन्मत्त प्रश्न विचारणार्या पवारपुत्रीला आपली ही दगाबाजीने मिळविलेली सत्ता कधी हातातून निसटून गेली, ते कळलेदेखील नाही. अर्थात, मुख्यमंत्रिपदावर बसलेल्या नेत्यालाच त्याची गंधवार्ताही लागली नव्हती, तिथे सुप्रिया सुळे यांना ते कळले नाही, त्यात नवल ते काय!
देवेंद्र फडणवीस यांच्या नावाबरोबरच जनतेच्या मनात एक आश्वासक भावना निर्माण होते. अशी भावना ही फक्त नरेंद्र मोदी यांच्या नावाबाबतच निर्माण होते. कारण, स्वत:पेक्षा आधी देशाची, मग पक्षाची आणि सर्वात शेवटी आपली काळजी घेणार्या आणि देशाच्या उन्नतीसाठी वाहून घेतलेल्या मोजक्या नेत्यांमध्ये मोदी यांच्याप्रमाणेच फडणवीस यांचाही समावेश होतो. हा नेता आपल्या समस्या नक्की सोडवेल, असा विश्वास फडणवीस यांच्याबाबत वाटतो. ‘कोविड’सारख्या भयंकर साथीतही फडणवीस यांनी आपल्या तब्येतीची फिकीर न करता, जनसेवेसाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला होता. परिणामी, त्यांना दोनदा ‘कोविड’चा संसर्गही झाला. पण, त्यातून बाहेर पडल्यावर केवळ कोमट पाणी पीत घरात न बसता त्यांनी स्वतःला पुन्हा जनसेवेला वाहून घेतले. म्हणूनच काल फडणवीस यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाल्यावर राज्यातील जनतेने सुटकेचा निश्वास सोडला होता. असा निष्काम कर्मयोगी नेता भाग्यवान जनतेलाच मिळतो.
फडणवीस हे आजघडीला केवळ महाराष्ट्रातील सर्वोच्च नेते नसून, ते देशपातळीवरीलही एक शक्तिशाली नेते म्हणून उदयाला आले आहेत. हे स्थान त्यांनी एखाद्या सत्तापदाच्या जोरावर मिळविलेले नाही किंवा दुसर्या नेत्याचे अहित साधणारे आपले उपद्रवमूल्य वाढवून मिळविलेले नाही. सकारात्मक आणि प्रामाणिक निष्ठेने काम करून त्यांनी जनतेचे प्रेम, आदर आणि विश्वास प्राप्त केल्यानेच त्यांना हे स्थान मिळाले आहे. येत्या पाच वर्षांत ते आपल्यावरील ही जबाबदारी तितक्याच निष्ठेने पार पाडतील, यात शंका नाही!