जगासाठी दिग्गज राजकीय व्यक्तिमत्त्व, पण आमच्यासाठी ‘लाडका मामा!’

04 Dec 2024 23:13:01

fadnavis
 
देवेंद्र फडणवीस.... बस नाम ही काफी हैं। आजच्या राजकीय परिस्थितीत हे वाक्य किती चपखल बसते नाही का? जगासाठी देवेंद्र फडणवीस हे नाव गेल्या दहा वर्षांत खूप मोठे झाले आहे. अगदी कोवळ्या वयात राजकारणात उतरलेला एक तरूण, भारतातील दुसरे तरुण महापौर, ते महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याचे मुख्यमंत्रिपद पाच वर्षे यशस्वीरित्या भूषवणारे आणि आता पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची कमान यशस्वीरित्या सांभाळणारे राजकीय व्यक्तिमत्त्व म्हणजे देवेंद्र फडणवीस.
 
देवेंद्र फडणवीस.... बस नाम ही काफी हैं। आजच्या राजकीय परिस्थितीत हे वाक्य किती चपखल बसते नाही का? जगासाठी देवेंद्र फडणवीस हे नाव गेल्या दहा वर्षांत खूप मोठे झाले आहे. अगदी कोवळ्या वयात राजकारणात उतरलेला एक तरूण, भारतातील दुसरे तरुण महापौर, ते महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याचे मुख्यमंत्रिपद पाच वर्षे यशस्वीरित्या भूषवणारे आणि आता पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची कमान यशस्वीरित्या सांभाळणारे राजकीय व्यक्तिमत्त्व म्हणजे देवेंद्र फडणवीस. मात्र, ही ओळख जगासाठी आहे. आमच्यासाठी त्यांची ओळख म्हणजे लहानपणीपासून आमचे भरपूर लाड करणारा देवेन मामा.
 
मला आठवते तेव्हापासून नागपूर म्हणजे धरमपेठेचे घर, सरिता आजीच्या हातचा चिवडा आणि देवेन मामा, आशिष मामा यांच्या भेटीसाठी उत्साहित झालेली आम्ही बच्चा कंपनी. तसे तर देवेन मामा म्हणजे माझ्या आईचा सख्खा चुलत भाऊ. मात्र, ही सगळी भावंड एकत्र वाढली. दर सण एकत्र साजरा करत एकत्र कुटुंबात वाढलो असल्यामुळे आमचे नातेदेखील यांच्या प्रत्येकाशी अगदी सख्खेच आहे. आजही मला ‘तुला मामा किती’ हे विचारल्यानंतर उत्तर ‘1’ असे देता येत नाही. कारण, हे सर्वच माझ्यासाठी तितकेच सख्खे आहेत. त्यातून देवेन मामा आणि माझ्या वडिलांची विशेष गट्टी. ते ‘जीजा-साला’ कमी आणि मित्रच जास्त. त्यामुळे आमच्या घरातील प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी देवेन मामा, आईबाबा आणि आमच्यासाठी नेहमी हजर असे. माझ्या जन्मानंतर मला पाहणारी दुसरी व्यक्ती म्हणजे देवेन मामा आणि मी लहान असल्यापासून मला अनेक गमतीजमती शिकवणारी, गाणी शिकवणारी आणि आमच्या सोबत दंगा करणारी व्यक्ती म्हणजेदेखील देवेन मामा!
 
fadnavis
 
‘लाडकी बहीण योजना’ तर आता लोकांसमोर आली आहे. पण, देवेन मामाचे त्याच्या सर्वच बहिणींवर मनापासून प्रेम सुरुवातीपासून आहे आणि तो वेळोवेळी त्यांच्यासाठी एक भाऊ म्हणून उभा राहिला आहे. म्हणायला त्याला सख्खी बहीण नाही. मात्र, एकत्र कुटुंबामुळे त्याच्या सर्वच बहिणी सख्ख्या आहेत. हे भाचे कंपनी म्हणून आम्ही वेळोवेळी अनुभवले आहे. आमच्या कुटुंबासाठी तो अत्यंत महत्त्वपूर्ण व्यक्ती आहे आणि नेहमीच राहील.
 
मला अजून आठवते, मी लहान असताना जबलपूरला ‘मकर संक्रमण व्याख्यानमाला’ या एका प्रतिष्ठित व्याख्यानमालेत देवेन मामाला व्याख्यानासाठी बोलवण्यात आले होते. तो केवळ एका दिवसासाठी जबलपूरला आला होता. त्यातून त्याला भेटायला येणारी लोकसुद्धा खूप. आपल्याला त्याचा वेळ मिळणारच नाही, या भावनेने खट्टू होऊन मी त्याला एक पत्र लिहिले आणि त्याच्या उशाशी ठेवले. त्याने ते कधी वाचले कल्पना नाही. मात्र, रात्री 11 वाजता मला आणि दादाला, गाडीने चक्कर मारायला आणि आईस्क्रीम खायला घेऊन गेलेला देवेन मामा आणि त्याचे मित्र मला अजूनही आठवतात. घरातील सर्व बच्चेकंपनीसोबत तो असाच असतो, अगदी आजही.
 
माझ्या आईकडून त्यांच्या गावाकडच्या म्हणजे चंद्रपूर येथील मूलकडच्या दिवाळीचे अनेक किस्से आम्ही ऐकले आहेत. देवेन मामाचे वडील म्हणजेच आमचे गंगाधर आजोबा आणि त्यांची काकू म्हणजे शोभाताई फडणवीस आपात्काळ लागला असताना ते 19 महिने जेलमध्ये होते. त्यावेळी सगळी भावंडे एकत्र होतो. त्यावेळी सगळे एकत्र घडले, असे आई म्हणते.
 
आम्ही सगळेच त्याच्याकडून भरपूर काही शिकलो. सगळ्यात मोठी शिकवण म्हणजे सच्चेपणा, आपल्या देशासाठी असलेल्या आपल्या कर्तव्याची जाणीव आणि समाजभान. हा त्याच्याकडून आमच्या परिवारातील पुढील पिढीला मिळालेला अमूल्य ठेवा आहे. इतक्या मोठ्या पदावर पोहोचूनसुद्धा देवेन मामाचे वागणे घरातील मंडळींसोबत, आमच्यासोबत तिळमात्रही बदलले नाही. आजही आमच्या प्रत्येक एसएमएसला त्याचे उत्तर हे येतेच!
 
गेल्या पाच वर्षांत त्याच्या राजकीय आयुष्यात घडलेल्या घडामोडी, विरोधकांच्या स्वार्थामुळे त्याला घ्यावी लागलेली माघार आणि एकूणच त्याच्यासमोर आलेली आव्हाने एक कुटुंब म्हणून आम्ही खूप जवळून बघितली आहेत. मात्र, या सगळ्या परिस्थितीत चेहर्‍यावरचे स्मित हास्य न ढळू देता, खरेपणाच्या आधारे पुन्हा एकदा त्याने विश्व उभे केले. महाराष्ट्रात खूप मेहनत करून पुन्हा एकदा सत्ता आणली आणि आता मुख्यमंत्रिपदाची कमान सांभाळायला तो सज्ज आहे आणि हे सगळेच त्याच्याकडून शिकण्यासारखे आहे. कधी कधी वाटते, आपल्या आयुष्यातील कष्ट, आव्हाने फार मोठी आहेत. मात्र, त्याच्याकडे बघून वाटते, त्याच्या वाट्याला जो काटेरी मुकुट आले आहे, तो पेलणे तर सगळ्यात कठीण आहे. त्यांनी आम्हाला धैर्य, खरेपणा, शांत राहून काम करणे आणि आत्मविश्वास शिकवला आहे.
 
2017 साली माझे लग्न ठरले. मी सर्वप्रथम ज्या दोन-तीन लोकांना ही बातमी दिली, त्यातील देवेन मामा एक होता. त्याचे लगेच उत्तर आले आणि दुसर्‍या दिवशी फोनदेखील आला. ‘साखरपुडा दि. 9 - दि. 10 डिसेंबर रोजी ठेवा म्हणजे मला येता येईल. असे त्याने सांगितल्यावर आम्ही तारखा ठरवण्याचा काही प्रश्नच नव्हता. कारण, माझा साखरपुडा त्याच्या शिवाय कसा होणार? प्रॉमिस केल्याप्रमाणे देवेन मामा दि. 9 डिसेंबर रोजी दिविजा आणि मामीसह मला आशीर्वाद देण्यासाठी हजर होता.
 
मुख्यमंत्री असताना असा वेळ काढणे किती कठीण असते, हे आम्हाला माहीत आहे. तरी त्याने त्याच्या परिवारासाठी तो वेळ काढला ही किती मोठी बाब. त्यानंतर लगेचच एप्रिलमध्ये माझ्या सख्ख्या भावाचा साखरपुडा मुंबईत होता. त्यालाही तो हजर आणि त्यानंतर डिसेंबर 2018 साली माझे आणि माझ्या भावाचे एकत्र लग्न झाले, ते जबलपूरला पार पडले. या दोन्ही लग्नांना मुख्यमंत्री असूनसुद्धा देवेन मामा पूर्ण अडीच दिवस हजर होता. अगदी संपूर्ण वेळ काढून! माझ्यासाठी मला मांडवात नेताना माझे सगळे मामा हजर होते आणि माझ्या पाठीशी देवेन मामासुद्धा. त्याच्या अतिशय व्यस्त आयुष्यातून माझ्यासाठी वेळ काढून हजर होता, याहून मोठे काही असूच शकत नाही. त्यानंतर जानेवारीमध्ये दादाच्या मुंबई येथील रिसेप्शनलादेखील त्याने हजेरी लावली होती. आमच्या घरच्या प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी मग ती घराची वास्तू, दादाची मुंज, आमचे साखरपुडे किंवा लग्न अगदी काहीही असू देत, मामा नेहमी हजर होता आणि हे आमच्यासाठी खूप मोलाचे आहे. त्याची सगळ्यात मोठी खासियत हीच आहे. परिवारासाठी तो सदैव हजर असतो. एकवेळ आनंदाच्या प्रसंगी कदाचित तो वेळ काढू नाही शकला, तरी दु:खाच्या प्रसंगी धीर देण्यासाठी परिवाराच्या पाठीशी तो नेहमी उभा असतो.
 
माझे वडील प्रशांत पोळ आणि देवेन मामा यांची गट्टी वेगळीच आहे. देवेन मामा राजकारणातल्या सुरुवातीच्या काळात कुठल्या ट्रेनिंगसाठी जर्मनीला गेला होता आणि बाबांचीदेखील त्याचवेळी जर्मनीला एक कॉन्फरन्स होती. तेव्हा एका रविवारी ते दोघे भेटले आणि बॅचलर्ससारखा संपूर्ण दिवस घालवला. त्या वेळचे फोटो पाहून एक निखळ आणि आनंदी देवेंद्र फडणवीस दिसतात. आजही बाबा आणि देवेन मामाच्या भेटी आणि गप्पा खासच असतात.
 
देवेंद्र फडणवीस हे व्यक्तिमत्त्व अतिशय सुसंस्कृत आणि कुटुंबवत्सल असल्याचे वेळोवेळी जाणवते. त्यासाठी कारण आहे, त्यांना मिळालेला परिवार. सर्व काका-काकूंसोबत असलेले, आपल्या भावंडांसोबत असलेले त्याचे घट्ट नाते. ज्यापद्धतीने देवेन मामा आपल्या कुटुंबाची काळजी घेतो, त्याचपद्धतीने तो महाराष्ट्राच्या जनतेचीदेखील काळजी घेतो.
 
त्याचे आणि माझे नाते किंवा त्याच्या सर्वच भाचे, पुतणे कंपनीसोबत त्याचे नाते खूप प्रेमाचे, काळजीचे आणि लाडाचे आहे आणि आमच्यासाठी हे नाते खूपच मौल्यवान आहे. जगासाठी ‘देवेंद्र फडणवीस’ हे नाव एका मातब्बर नेत्याचे नाव आहे. पण, आमच्यासाठी तो काल, आज आणि उद्या सदैव आमचा लाडका मामा/काका असाच राहणार!
 
 
 निहारिका पोळ सर्वटे
 
Powered By Sangraha 9.0