विकासाची कास धरणारा नेता...

04 Dec 2024 23:28:04

fadnavis 
 
शहरांच्या विकासाची दूरदृष्टी आणि योग्य निर्णय घेण्याची धडाडी असली, की प्रगतीच्या दिशेने झपाट्याने वाटचाल कशी होते, हे देवेंद्र फडणवीस यांच्याइतके व्यवस्थित महाराष्ट्रात कोणालाच माहिती नाही. ‘रेंगाळणारे विकास प्रकल्प धडाक्याने मार्गी लावणारा नेता’ ही देवेंद्रजींची प्रतिमा प्रत्यक्ष कृतीमुळे अधोरेखित झाली, हे मी गेली दहा वर्षे अनुभवत आहे.
 
गेल्या काही दशकांत वाढत असणारे नागरीकरण आणि त्यावरील दीर्घकालीन उपाययोजना, हा देवेंद्रजींच्या अभ्यासाचा आणि आवडीचा विषय आहे. देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना शहरांच्या हिताचे मोठे निर्णय घेतले. शहर विस्तारत असताना सर्वांगीण विकासासाठी भागीदार तयार होणे आवश्यक असते. हे प्रत्यक्षात आणण्यासाठी देवेंद्रजींनी कायम कृतिशील भूमिका घेतली. पुण्याच्या तब्बल १८ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ‘पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण’ अर्थात ‘पीएमआरडीए’च्या स्थापनेस देवेंद्रजींनी २०१५ मध्ये संमती दिली. २००८ मध्ये मेट्रोची चर्चा सुरू झाली होती, पण प्रत्यक्षात कामास सुरुवात झाली, देवेंद्रजींच्या काळात! ही त्यांच्या कृतिशीलतेची ठळक उदाहरणे.
 
कोणतेही विकास प्रकल्प राबवताना दीर्घकालीन विचार करून नियोजन करण्यात आले नाही, तर त्याच्या झळा शहराला सोसाव्या लागतात, असे त्यांचे ठाम मत आहे. शहराच्या सर्व भागांतील नागरिकांना पिण्याचे समसमान व शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याच्यादृष्टीने देवेंद्रजींच्या सूचनेनुसार पुण्यात २०१७ पासून ‘२४ तास समान पाणीपुरवठा योजने’वर काम सुरू झाले. या योजनेसाठी लागणारा निधी उभा करण्याकरिता देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली मुंबई शेअर बाजारात पुणे महापालिकेतर्फे देशातील पहिल्या म्युनिसिपल बाँड्सची नोंद करण्यात आली. प्रकल्प पुढे नेण्यासाठी लागणार्‍या कल्पकतेचे हे उदाहरण आहे.
 
मुळा-मुठा या पुण्यातील जीवनदायिनींचा पुनरुज्जीवन प्रकल्पही देवेंद्रजींच्या काळातच मंजूर झाला. या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रकल्पामुळे नदीसंवर्धन होत पुण्याचे रुप पालटून जाणार आहे. नदीमध्ये सोडले जाणारे सांडपाणी प्रक्रिया करूनच सोडले जावे, ही या प्रकल्पाच्या यशाची पूर्वअट होती. त्याकरिता ११ नवे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणे गरजेचे होते. महापालिकेसाठीही आर्थिक बोजा परवडणारा नव्हता. ही बाब लक्षात येताच अशा प्रकारच्या सहयोगासाठी प्रसिद्ध असलेल्या ‘जायका’ अर्थात ‘जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी’च्या माध्यमातून एक हजार कोटी रुपयांचे अनुदान पुणे महापालिकेस मिळविण्यात देवेंद्रजींनी महत्त्वाची भूमिका निभावली. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यायची असेल, तर सांडपाण्यावर शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रक्रिया करून त्यानंतरच हे पाणी नदीच्या प्रवाहात सोडले जावे. याबाबत कसलीही तडजोड स्वीकारली जाणार नाही, हे त्यांनी पहिल्यापासूनच स्पष्ट केले होते.
 
devendra fadnavis 
 
पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था शाश्वत व्हावी, यासाठी देवेंद्रजींनी वेळेवेळी महत्त्वपूर्ण सूचना केल्या, याचा मी साक्षीदार आहे. शहरातील प्रदूषणाच्या पातळीचा विचार करता, डिझेलच्या बसगाड्या घेऊ नका, त्याऐवजी इलेक्ट्रिक व सीएनजीवर चालणार्‍या बसेसना प्राधान्य द्या, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली. त्यातूनच सार्वजनिक वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक बस वापरणार्‍या देशातील पहिल्या महापालिकेचा मान पुण्याला मिळाला. गेल्या काही वर्षांत १ हजार, ५०० हून अधिक पर्यावरणपूरक बस ‘पीएमपीएमएल’च्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत.
 
पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यासाठी प्रवासी, चालक, वाहक यांच्याकडून सूचना मागवाव्या, असे देवेंद्रजींनी सांगितल्यानंतर त्यावर काम सुरू केले गेले. त्यातून आलेल्या सूचना व तिकीटविक्रीच्या सखोल विश्लेषणातून कमी अंतराच्या मार्गासाठी ‘अटल बससेवा’, दहा रुपयांत एसी प्रवासासाठी ‘पुण्यदशम बससेवा’ आकारास आल्या. या सर्व सेवांना प्रवाशांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
 
पक्षाचा कार्यकर्ता नेता झाला पाहिजे, तो दीर्घकालीन हिताची दृष्टी असलेला पाहिजे, यावर देवेंद्रजींचा कटाक्ष असतो. कोणत्या कार्यकर्त्याच्या अंगी कोणते गुण आहेत आणि त्याचा वापर पक्षासाठी कसा करून घ्यायचा, हे त्यांना व्यवस्थित समजते. त्यामुळे देवेंद्रजी तुम्हाला योग्य वेळी योग्य संधी देणारच, हा विश्वास महाराष्ट्र भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात आहे. याचा व्यक्तिगत अनुभव मी घेतलाच आहे, पण अनेकांनाही याचा प्रत्यय आला आहे. महाराष्ट्रासाठी अत्यंत योग्य मुख्यमंत्री आपल्याला देवेंद्रजींच्या रुपाने पुन्हा लाभला आहे, त्यांच्या नव्या इनिंगला शुभेच्छा!
 
सिद्धार्थ शिरोळे, आमदार, भाजप
 
Powered By Sangraha 9.0