देवेंद्र फडणवीस : विकासाचा महामेरू

    04-Dec-2024
Total Views |

inframan devendra fadnavis
 
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आज शपथ घेत आहेत. त्यामुळे राज्यात पुनश्च विकासपर्व सुरू होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ मध्ये आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात राज्यात सर्वांगीण विकासाची पायाभरणी केल्यामुळे, आज महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात रस्ते, रेल्वे आणि मेट्रोचे जाळे विस्तारते आहे. देवेंद्र फडणवीसांसारखे दूरदृष्टी लाभलेले नेतृत्व विकसित महाराष्ट्राला आर्थिक, सामाजिक आणि औद्योगिक क्षेत्रात नव्या उंचीवर घेऊन जाईल, यात शंका नाही.
 
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आज शपथ घेत आहेत. त्यामुळे राज्यात पुनश्च विकासपर्व सुरू होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी 2014 मध्ये आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात राज्यात सर्वांगीण विकासाची पायाभरणी केल्यामुळे, आज महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात रस्ते, रेल्वे आणि मेट्रोचे जाळे विस्तारते आहे. देवेंद्र फडणवीसांसारखे दूरदृष्टी लाभलेले नेतृत्व विकसित महाराष्ट्राला आर्थिक, सामाजिक आणि औद्योगिक क्षेत्रात नव्या उंचीवर घेऊन जाईल, यात शंका नाही.
 
जपानमधील कोयासन विद्यापीठाने दि. २६ डिसेंबर २०२३ रोजी पायाभूत सुविधा प्रकल्पात अभूतपूर्व कामगिरीसाठी देवेंद्र फडणवीस यांना ‘मानद डॉक्टरेट’ प्रदान केली. विद्यापीठाच्या १२० वर्षांच्या इतिहासातील हा पहिला पुरस्कार होता, जो महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या विकासात देवेंद्र फडणवीस यांच्या गेल्या काही वर्षांमध्ये दिलेल्या योगदानाची पोचपावती ठरला. २०१४ साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या वाहतूक आणि आर्थिक लॅण्डस्केपवर मेट्रो नेटवर्कचा संभाव्य परिणाम जाणून घेत, मुंबईत मेट्रोचे जाळे विस्तारण्याचा भविष्यकालीन ३३७ किमीचा मास्टरप्लॅन आखला. हा प्लॅन तयार करून त्यातील काही फेजमधील मेट्रो लाईन सुरूदेखील केल्या. सर्वात जलदगतीने मेट्रोची कामे मार्गी लावून त्या नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्याचा विश्वविक्रम फडणवीस सरकारने केला. २०१९ पर्यंत मुंबई मेट्रो प्रकल्पाबरोबरच फडणवीसांनी नागपूर मेट्रोचे ४८.२९ किमी आणि पुणे मेट्रोचे ५८.९६ किमीचे काम मार्गी लावले. मुंबईचे मेट्रो प्रकल्प निधीअभावी रखडू नये, यासाठी राज्याचे प्रमुख या नात्याने, निधी उभारणीसाठी त्यांनी विविध कंपन्यांच्या प्रमुख अधिकार्‍यांच्या गाठीभेटी घेतल्या. जून २०१८ मध्ये ‘एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक’च्या मुंबईत झालेल्या वार्षिक बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी शाश्वत विकासावर प्रेझेंटेशन देत, मुंबई मेट्रो प्रकल्पासह राज्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये ५१ टक्के एफडीआय गुंतवणूक आणली. त्यामुळे निधीच्या कमतरतेशिवाय कोणतेही मेट्रो प्रकल्पांचे काम रखडले नाही. मुंबईत आज ‘मेट्रो २ अ’, ‘७’ आणि भूमिगत ‘मेट्रो ३’हे प्रकल्प मुंबईकरांच्या पसंतीस उतरले आहेत. थोडक्यात, पायाभूत सुविधांच्या विकासात महाराष्ट्राच्या पुनरुत्थानासाठी देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. ‘जायका’सोबतची महाराष्ट्राची भागीदारी आपल्या राज्याची जपानसोबतचे सहकार्य, राज्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे जागतिक महत्त्व अधोरेखित करतात.
 
सुधारित कनेक्टिव्हिटी आणि शाश्वत आर्थिक वाढीसह महाराष्ट्र पुढे जात असताना, या परिवर्तनाच्या युगाचे प्रमुख शिल्पकार म्हणून देवेंद्र फडणवीस आपला वारसा मजबूत करत आहेत. मुंबईत मेट्रोमुळे नागरिकांचे खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होईल, असा त्यांचा विश्वास होता. इतकेच नाही, तर पायाभूत सुविधांचा विकास साधल्यामुळे जगभरातील नोकर्‍यांचा ओघ सामावून घेण्यासाठी मुंबई आणि उपनगरांमध्ये व्यावसायिक जागांची मागणी वाढेल. या पायाभूत सुविधांमुळेच मुंबई महानगर निःसंशयपणे जागतिक आर्थिक केंद्र होईल, हा देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास आज सार्थ होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. जेव्हा मुंबईतील या सर्व मेट्रो मार्गिका सुरु होतील, तेव्हा मुंबईकरांचा प्रवास खरंच सुखकर होणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या मेट्रोमुळे मुंबईतील प्रदूषणदेखील मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
 
आज मुंबई महानगराचा विस्तार वेगाने होत आहे. आज नवी मुंबईची सीमा ओलांडून ‘तिसरी मुंबई’ आकार घेत आहे. ‘तिसर्‍या मुंबई’च्या निर्मितीमध्ये, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा - अटल सागरी सेतू हे दोन प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे! २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर आम्ही कित्येक वर्षे केवळ चर्चा ऐकत होतो, अशा प्रकल्पाचे भूमिपूजन झाले आणि पुढील पाच वर्षांतच सागरी सेतूसाठी लागणार्‍या खांबांची उभारणीही पूर्ण झाली. दि. १२ जानेवारी २०२५ रोजी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते या सेतूचे राष्ट्रार्पणही झाले. आज या सेतूवरून नयनरम्य दृश्यांसह प्रवास करताना, आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्रकल्प आपल्या महाराष्ट्रात आहे, याचा अत्यंत अभिमान वाटतो. लवकरच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळही सुरु होईल. २०१७ मध्ये देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रकल्पाला गती देण्याचा निर्णय घेण्यात आला. नवी मुंबई विमानतळामुळे उरण, पनवेल हे ‘एरोसिटी’ म्हणून उदयास येतील, असा विश्वास देवेंद्रजींना होता. इतकेच नाही, तर विमानतळाच्या विकासातून महाराष्ट्राची कार्गो क्षमता 40 टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे ध्येय त्यांनी ठेवले होते. आता मुख्यमंत्रिपदी विराजमान होताच, देवेंद्रजी आपले हे ध्येय अधिक विस्ताराने आणि जलदगतीने पुढे नेतील, यात कोणतीही शंका नाही.
 
inframan devendra fadnavis
 
देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात महाराष्ट्राला मिळालेला मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडोर हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प. या प्रकल्पाच्या बाबतीतही पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्यासाठी, देवेंद्र फडणवीस यांची वचनबद्धता उपमुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळातही प्रकर्षाने दिसली. महाराष्ट्र सरकारने जपानला जलद-ट्रॅकिंग उपक्रमांचे आश्वासन देत, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी रखडलेल्या सर्व मंजुरी दिल्या गेल्या. या मंजुरींमुळे उपमुख्यमंत्री होताच, या प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेला गती देत, या प्रकल्पाच्या पूर्ततेच्या दिशेने पाऊल टाकले. मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्प 508 किमी लांबीचा आहे आणि हा भारतातील पहिला हायस्पीड रेल्वे कॉरिडोर आहे. हा कॉरिडोर मुंबई या आर्थिक राजधानीच्या शहरातील बीकेसी या व्यवसायकेंद्राला गुजरात राज्यातील अहमदाबादला जोडणारा आहे.
 
आज मुंबई महानगराचा विस्तार पालघरपर्यंत होतो आहे. याचे श्रेयही देवेंद्र फडणवीस यांचेच! नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हस्ते वाढवण बंदर प्रकल्पाचे उद्घाटन झाले. हा प्रकल्प केंद्र सरकारच्या अखत्यारीतील असला, तरी राज्य सरकार म्हणून लागणार्‍या सर्व परवानग्या मिळण्यासाठी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने वेगाने दिल्या. इतकेच नाही, तर या बंदराचे काम पूर्ण होईपर्यंत पालघरमध्ये नवे विमानतळ आणि रस्ते प्रकल्पांची उभारणीही जलद गतीने पूर्ण करण्यात येईल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. फडणवीस यांनी जपान भेटीदरम्यान वर्सोवा-विरार सी लिंक प्रकल्पासाठी जपान सरकार आणि ‘जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी’कडून आर्थिक पाठबळ मिळवले. या प्रस्तावित ४३ किमी उन्नत रस्त्याचे उद्दिष्ट वर्सोवाला विरारच्या वाढत्या निवासी हबशी जोडण्याचे आहे. सी लिंकच्या पलीकडे, या प्रकल्पात सुमारे ६० किमीचे लांबीचे उपनगरी रस्ते समाविष्ट आहेत, जे प्रमुख मार्गांवरील वाहतूककोंडी कमी करण्याचे आणि शहराच्या प्रदेशातील आर्थिक विकासाला चालना देण्याचे वचन देतात. हाच मार्ग पुढे उत्तन आणि पालघरपर्यंत विस्तारेल. डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होत हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेशात कनेक्टिव्हिटीचे नवे आयाम आखेल. पालघरमध्ये होणारे जगातील दहाव्या क्रमांकाचे सर्वात मोठे बंदर, आंतरराष्ट्रीय दर्जाचे नवे विमानतळ, मुंबईतून थेट पालघरला जोडणारा सागरी मार्ग हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महत्वाकांक्षी प्रकल्प येत्या पाच वर्षांत वेगाने पूर्ण होत असताना आपल्याला दिसून येतील.
 
देवेंद्र फडणवीसांच्या कार्यकाळात पूर्ण झालेला आणि महाराष्ट्राला समृद्ध करणारा ’हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग.’ महाराष्ट्राच्या कृषिसंपन्न जिल्ह्यातून जाणारा हा महामार्ग खर्‍या अर्थाने मराठवाडा आणि विदर्भाच्या समृद्धीची रेषा ठरला आहे. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच वर्षभराच्या आतच देवेंद्रजींनी दि. ३१ जुलै २०१५ रोजी विधानसभेत सर्वप्रथम नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेस-वे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा केली. आज मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग हा राज्यातील दळणवळणाच्या दृष्टीने एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरत आहे. आता हा महामार्ग नागपूरच्या पुढे चंद्रपूर, भंडारा आणि गोंदियापर्यंत विस्तारत आहे. हे देवेंद्र फडणवीस यांची दूरदृष्टी आणि सतत नवनिर्मितीच्या ध्यासातूनच! 701 किमी लांबी असलेला समृद्धी महामार्ग राज्यातील १५ जिल्हे आणि हजारो गावांना परस्परांशी आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबईशी जोडतो.
 
मुंबईच्या सौंदर्यात भर टाकणारा आणि दक्षिण मुंबईतून पश्चिम उपनगरांकडे सुसाट वेगाने नेणारा अभियांत्रिकी अविष्कार म्हणजे ’मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्प.’ २०१५ साली राज्यात ’देवेंद्र’ आणि केंद्रात ’नरेंद्र’ या जोडीमुळे मुंबईकरांना हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्रकल्प मिळाला. ‘मुंबई कोस्टल रोड’ प्रकल्पाचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दि. ११ मार्च रोजी झाले. मुंबईच्या नरिमन पॉईंट येथून केवळ 20 मिनिटांत समुद्र किनार्‍याखालून जाणार्‍या या बोगद्यांतून तुमचा विनासिग्नल, विना वाहतुककोंडी वेगवान प्रवास शक्य होतो. फडणवीसांनी 2014 मध्ये राज्याचा कारभार स्वीकारताच, हा प्रस्तावित प्रलंबित प्रकल्प फास्ट ट्रॅकवर नेला आणि आपल्याच उपमुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात पूर्णदेखील करून दाखवला.
 
मुंबई-पुणे प्रवास वेगवान करण्याच्यादृष्टीने ६ हजार, ६९५ कोटी रुपयांच्या मिसिंग लिंक प्रकल्प २०१७ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वात प्रस्तावित करण्यात आला. हा प्रकल्प आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. दि. १३ जून २०१७ रोजी झालेल्या बैठकीत पायाभूत सुविधांच्या मंत्रिमंडळ उपसमितीने या प्रकल्पाच्या कामांना मंजुरी दिल्या. सद्यस्थितीत या प्रकल्पातील केबल-स्टेड ब्रिजचे काम प्रगतिपथावर आहे. यात लोणावळा तलावाच्या तळाखाली जवळपास ५०० ते ६०० फूट अंतरावर बोगदा बांधण्यात येत आहे. या बोगद्याची लांबी आठ किमी असून बोगद्याची रुंदी २३.७५ मीटर आहे. देशातीलच नव्हे, तर जगातील सर्वाधिक रुंदीचा हा बोगदा आहे. मिसिंग लिंक प्रकल्पामुळे मुंबई-पुणे अंतर अर्ध्या तासाने कमी होणार आहे. बोगद्यामुळे घाटाचा भाग पूर्णतः टाळला जाऊन अपघातसंख्येतही मोठी घट होईल. त्यामुळे मुंबई-पुणे प्रवासाला गती मिळून या दोन्ही शहरांतील दळणवळणाला चालना मिळेल. यासोबतच सध्या विरार-अलिबाग, पुणे रिंगरोड, जालना-नांदेड द्रुतगती मार्ग या मार्गांची कामे प्रगतीपपथावर आहेत. येत्या काही काळात कोकण एक्सप्रेस-वे, कोकण कोस्टल रोड, शक्तिपीठ महामार्ग, भक्तिपीठ महामार्ग हे देवेंद्र फडणवीसांचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्यातील रस्त्यांचे जाळे अधिक विस्तीर्ण करतील.
 
अशा रितीने गेल्या १५ वर्षांत देवेंद्र फडणवीसांच्या दूरदृष्टीने महाराष्ट्राने पायाभूत सुविधांच्या उभारणीत नवे विक्रम रचले. आता पुन्हा एकदा नव्या ध्यासाने, नव्या व्हिजनसह देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेत आहे. यानिमित्ताने महाराष्ट्रात पुहा एकदा त्यांच्या देवेंद्ररुपी विकासपर्वाची नांदीचे सूर घुमू लागतील, यात शंका नाही. मुख्यमंत्रिपदी विराजमान होत असलेल्या देवेंद्र फडणवीस यांचे पुन्हा मनस्वी अभिनंदन!
 
 
आशिष चौहान,
एमडी आणि सीइओ, नॅशनल स्टॉक एक्सचेंज