देवाभाऊ... मनातला मुख्यमंत्री

04 Dec 2024 23:39:56
 
devendra fadnavis 
 
‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ या काव्यपंक्ती २०१९ सालच्या राज्य निवडणुकांच्या आधीच्या अधिवेशनात विधानभवनात, आपल्या २०१४ ते २०१९ या मुख्यमंत्रिपदाच्या कालखंडातील अखेरच्या भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी उच्चारल्या. त्या दिवसानंतर आजपर्यंत या काव्यपंक्ती वर्तमानपत्रांतून, विविध वृत्तवाहिन्यांतून, अनेक राजकीय नेत्यांच्या भाषणांतून, इतकंच नव्हे, तर ‘चला हवा येऊ द्या’ किंवा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ यांसारख्या विनोदी मालिकांतील प्रसंगांमधून आपल्यावर आदळत राहिल्या. कधी त्या काव्यपंक्तीचा संदर्भ घेऊन देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या विरोधकांची यथेच्छ टवाळी केली, तर कधी अशा विरोधकांना देवेंद्रजींच्या समर्थकांनी उत्तरादाखल याच काव्यपंक्तींचा वापर केलेला आढळतो. थोडक्यात, देवेंद्रजींचा ‘मी पुन्हा येईन’ हा डायलॉग ‘शोले’ या अतिशय गाजलेल्या सिनेमातील ‘अरे ओ सांभा’ किंवा ‘कितने आदमी थे’ या गाजलेल्या डायलॉग्जसारखाच गेली पाच-सहा वर्षे महाराष्ट्रातील राजकारणात गाजत आहे. आज दि. ५ डिसेंबरला महाराष्ट्राचे २१वे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रातील लाखो मतदारांच्या मनातील मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस शपथ घेणार आहेत.
 
देवेंद्र फडणवीस यांविषयी मनातल्या भावना प्रकट करण्यासाठी लेख लिहीत असताना त्यांचा नामोल्लेख हा ‘देवेंद्रजी’ किंवा ‘श्री देवेंद्र फडणवीस’ वा ‘फडणवीस साहेब’ असा औपचारिक न करता, ‘देवाभाऊ’ असा एकदम घरगुती, ‘आपल्या’ माणसासारखा अनौपचारिक करणं, मला जास्त आवडेल. तसा देवाभाऊंचा आणि माझा थेट वैयक्तिक असा परिचय नाही. ते पूर्ण वेळ राजकारणी, तर मी पूर्णवेळ रंगकर्मी, नाटक-चित्रपट हे माझं क्षेत्र. फार पूर्वी देवाभाऊंनी मॉडेलिंग वगैरे करायचा प्रयत्न केला होता, असं त्यांच्याच मुलाखतीतून ऐकलं होतं आणि यावेळच्या निवडणुकीतील विमर्शांच्या लढाईत ‘प्रबोधन मंचा’च्या व्यासपीठावरून मीही भाषणं करून खारीचा वाटा उचलला होता. एवढाच आमच्या दोघांचा एकमेकांच्या क्षेत्राशी संबंध! तरीपण आम्ही एका परिवारातले सभासद आहोत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार हेच आमच्या दोघांमधील नातं आणि हाच परिचय.
 
दुसरा थेट परिचय झालेला प्रसंग या लेखात उद्धृत करणं मला महत्त्वाचं वाटतं. २०१९ साली आपल्या नेहमीच्या सवयीने राहुल गांधी यांनी दिल्लीतील जाहीर सभेत स्वा. सावरकरांची बदनामी केली. त्यांच्या नावाची थट्टा केली आणि त्याला प्रत्युत्तर देण्याचं माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राखत मी एक व्हिडिओ प्रसारित केला. त्यावेळी नुकत्याच सत्तेत आलेल्या आघाडी सरकारमधील घटकपक्ष असलेल्या काँग्रेसने मला माझ्या पदावरून बडतर्फ करण्याचा घाट घातला. त्या संघर्षात समग्र सावरकरप्रेमी परिवार तर माझ्यासोबत उभा राहिलाच, पण त्याबरोबरच त्यावेळी विरोधी पक्षनेतेपदी असलेल्या देवाभाऊंनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना माझ्या बडतर्फीसंदर्भात ठाम भूमिका घेऊन पत्र लिहून निषेध व्यक्त केला होता. हा म्हटलं तर आमचा परिचय!
 
देवाभाऊंना मी खरं जे ओळखतो आणि जाणतो, ते म्हणजे अखंडपणे कधीही विचलित न होता, आपल्याला मनोमन पटणार्‍या विचारधारेवर आधारित दिशेने मार्गक्रमण करत राहणे, संघर्ष करत राहणे. राजकारण हे केवळ निवडणुका जिंकण्याचे सत्ताप्राप्तीचे साधन नसून, राजकारण म्हणजे ज्या विचारधारेचे आपल्यावर संस्कार झाले आहेत, ती विचारधारा समाजामध्ये, लोकांमध्ये रुजवण्याचे एक व्यासपीठ आहे, या विश्वासाने राजकारण करणारा एक स्वयंसेवक, कार्यकर्ता, राज्यकर्ता अशी विविधांगी ओळख देवाभाऊंनी आपल्या व्यक्तिमत्त्वातून अनेकदा करून दिल्याचं आपल्याला दिसून येतं.
 
जेव्हा केव्हा देवाभाऊंच्या विविध वृत्तवाहिन्यांवरील मुलाखती ऐकतो, त्यांची भाषणं ऐकतो, त्यावेळी असं जाणवतं की, महाराष्ट्राच्या विकासाचं इतकं स्पष्ट चित्र डोळ्यांसमोर असलेला दुसरा कुणी राजकारणी देवाभाऊंच्या आसपासही दिसत नाही. महाराष्ट्राच्या विकासाच्या प्रत्येक टप्प्याचा म्हणजे, पाच वर्षांपासून ते पुढील २५ वर्षांपर्यंतचा रोडमॅप तयार असलेले देवाभाऊ एकमेव म्हटले पाहिजेत. ‘जलयुक्त शिवार’ ते वाढवण बंदराचा विकास एवढ्या मोठ्या पटलावर महाराष्ट्राच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक विकासाचं स्वप्न देवाभाऊंनी पाहिलं आणि स्वतः बघितलेलं आणि जनतेला दाखवलेलं स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपल्या सर्व ताकदीनिशी श्रमणारा हा राजकारणी गेली दहा वर्षे आपण बघत आहोत.
 
देवाभाऊ मला माझ्या मनातले मुख्यमंत्री वाटण्याचं महत्त्वाचं कारण, देवाभाऊंनी गेल्या दहा वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवी राजकारणी प्रणाली रुजवायला सुरुवात केली. वर्षांनुवर्षे या महाराष्ट्राच्या मातीत खोलवर रुजलेल्या एका राजकारणप्रणालीला उखडून एक नवीन अतिशय सकारात्मक, विकासाधिष्ठित, सर्वसामान्यांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करणारी एक राजकीय प्रणाली महाराष्ट्रात कार्यरत केली. देवाभाऊंचं स्वतःचं राजकारणही व्यक्तिकेंद्रित वा परिवारकेंद्रित न राहता, समष्टीत सामावलेलं आहे, अस मला वाटतं. म्हणूनच मी असं म्हणतो की, देवाभाऊ हा कोणा एकाचा चेहरा नसून राजकारण, समाजकारणात नव्यानं काही करू इच्छिणार्‍या अनेकांचं प्रतिनिधित्व करणारी सिस्टीम आहे.
 
देवाभाऊंचं व्यक्तिमत्त्व भावण्याचं आणखीन एक महत्त्वाचं कारण म्हणजे, २०२४ सालच्या विधानसभेच्या प्रचारदौर्‍यांमधून त्यांनी घेतलेली हिंदुत्वाबाबतची स्पष्ट आणि ठाम भूमिका. आपल्या जाहीर सभांमधून ‘जागो हिंदू जागो जागो रे..’ हे पद्य म्हणत अत्यंत प्रखरपणे देवाभाऊंनी हिंदुत्व मांडलं.
 
‘बटेंगे तो कटेंगे’ किंवा ‘एक हैं तो सेफ हैं’ या घोषणांमागचा हिंदुत्वाचा खरा अर्थ लोकांना पटवून देण्याचं महत्त्वाचं काम देवाभाऊंनी २०२४ सालच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान केलं. स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिप्रेत असलेले ‘हिंदुत्व म्हणजेच राष्ट्रीयत्व’ हा विचार देवाभाऊंनी निडरपणे राजकीय व्यासपीठावर मांडला आणि जनतेने त्यांना मतदानातून भरभरून प्रतिसादही दिला.
 
एव्हाना आमच्या मनातला मुख्यमंत्री न थांबता, न थकता महाराष्ट्राच्या भल्यासाठी, विकासासाठी येणारा प्रत्येक अडथळा पार करून कामाला लागलासुद्धा असेल. देवाभाऊंना, त्यांच्या भूमिकेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
 
योगेश सोमण, ज्येष्ठ अभिनेते
Powered By Sangraha 9.0