तेजस्वी व्यक्तिमत्त्व

    04-Dec-2024
Total Views |


Devendra Fadanvis
 
देवेंद्रजींच्या व्यक्तिमत्त्वाकडे पाहिल्यानंतर अगदी निश्चितपणाने लक्षात येते. एखाद्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीमध्ये त्याला मिळणारे आजूबाजूचे वातावरण, मिळणारे संस्कार, त्यातून होणारी जडणघडण आणि जीवनमूल्यांना येणारे महत्त्व, त्यातून साकारणारे आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व यातूनच देवेंद्रजी निश्चितपणाने सर्वच राजकीय नेत्यांमध्ये उजवे ठरतात.
 
आयुष्यात काही गोष्टी योगायोगाने घडत असतात. काही गोष्टींसाठी योग जुळून यावे लागतात आणि काही गोष्टी आयुष्यातील सुवर्णयोग ठरत असतात. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक तेजस्वी व्यक्तिमत्त्व असलेल्या देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळणे, हा माझ्यासाठी सुवर्णयोग ठरला. आजवरच्या राजकीय वाटचालीत माझ्यावर ज्या काही लोकांचा प्रभाव पडला आणि ज्यांच्या जीवनातील चांगले गुण अनुसरावेत असे मला वाटले, त्यापैकी एक म्हणजे देवेंद्रजी फडणवीस! त्यांच्यासमवेत काम करताना आणि त्यांना जवळून पाहत असताना ‘व्यक्तिमत्त्व घडवणे’ ही कष्टसाध्य आणि प्रयत्नांती प्राप्त होणारी बाब आहे, हे प्रकर्षाने जाणवत होते. खरोखरीच हा माणूस म्हणजे गुणांची खाण आहे. त्यातील काही गुण हे त्यांच्यात उपजत आहेत. काही संस्कार आणि जडणघडणीतून आलेले आहेत, तर काही गुण हे त्यांनी अथक परिश्रमातून व मेहनतीने व्यक्तिमत्त्वात आणले आहेत आणि एखादा शिल्पकार जसे शिल्प घडवतो, त्याप्रमाणे आपल्या आयुष्याला नियोजनबद्ध असा आकार दिला आहे. माणसे मोठी होतात ती आपोआप नाही, त्यामागे अथक प्रयत्नांची मालिका असते, हे देवेंद्रजींच्या व्यक्तिमत्त्वाकडे पाहिल्यानंतर अगदी निश्चितपणाने लक्षात येते. एखाद्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीमध्ये त्याला मिळणारे आजूबाजूचे वातावरण, मिळणारे संस्कार, त्यातून होणारी जडणघडण आणि जीवनमूल्यांना येणारे महत्त्व, त्यातून साकारणारे आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व यातूनच देवेंद्रजी निश्चितपणाने सर्वच राजकीय नेत्यांमध्ये उजवे ठरतात.
 
समाज घडत असतो तो शेवटी आपल्या समोरच्या आदर्शातून! चरित्रे वाचायची असतात ती त्यासाठीच! म्हणूनच थोरामोठ्यांची चरित्रे आपल्याला प्रेरणादायी वाटतात. साहित्य, राजकारण, समाजकारण, उद्योग, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय, प्रेरणादायी व पथदर्शी काम केलेल्या लोकांची चरित्रे वाचली जातात आणि त्यातून प्रेरणा घेऊन अनेक जण आपल्या जीवनाला दिशा देत असतात, जीवनाला आकार देत असतात. अशी चरित्रे वाचताना त्या व्यक्तिमत्त्वांची जीवनातील वाटचाल, त्यांचा संघर्ष, त्यांची प्रेरणास्थाने, त्यांना कळलेले जीवन आणि त्यांनी जीवनात जोपासलेल्या मूल्यांविषयी जाणून घ्यायला आपल्याला आवडत असते. मी जेव्हा जीवनाकडे या अंगाने पाहतो, तेव्हा असे लक्षात येते की, जवळून अनुभवलेली अनेक मोठी माणसे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर एक महत्त्वाचा प्रेरणास्रोत ठरलेली आहेत. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, सरदार वल्लभभाई पटेल, विनोबा भावे, कर्मवीर भाऊराव पाटील, राजर्षी शाहू महाराज, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अटलबिहारी वाजपेयी या महानतम नेत्यांनी केलेले काम हे अद्वितीय असेच म्हणावयास हवे. त्यांच्याकडून खूप गोष्टी शिकता येतात आणि जीवनात अनुसरता येतात. पण, आधुनिक काळात आदर्श म्हणून पाहावीत, अशी माणसे वेगाने कमी होताना दिसत आहेत. व्यक्तिशः मला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्रजी फडणवीस ही दोन्ही व्यक्तिमत्त्वे मात्र अनुकरणीय वाटतात. या दोघांनीही त्यांचे आयुष्य स्वतः घडवलेले आहे. कोणताही राजकीय गुरू नसताना, फार मोठी राजकीय पार्श्वभूमी किंवा वारसा नसताना त्यांनी ध्येयाने, जिद्दीने आणि परिश्रमाने आजवरची वाटचाल केलेली आहे. हे करताना कितीही कष्ट घ्यावे लागले, तरी बेहत्तर या भावनेने त्यांनी आपल्या जीवनाला आकार देत एक शिस्त लावलेली आहे. भारतीय राजकारणाची दिशा आणि दशा बदलण्याची क्षमता असणारी अशी ही नावे आहेत. त्यामुळे राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांचा अभ्यास करणे, त्यांना समजून घेणे आणि त्यांच्यातील चांगल्या गुणांचा मुक्त कंठाने गौरव करणे मला आवश्यक वाटते. राजकारणात येऊ इच्छिणार्‍या आणि स्वतःची कारकीर्द या क्षेत्रात घडवू पाहणार्‍या नव्या उमेदीच्या तरुणांनाही प्रेरणादायी ठरावीत, अशी ही व्यक्तिमत्त्वे आहेत.
 
fadnavis 
 
जाज्ज्वल्य राष्ट्रभक्ती, समर्पणाची भावना, जनसेवेचा निरपेक्ष भाव, निष्कलंकता आणि चारित्र्यसंपन्नता या गुणांचा समुच्चय असणारी व्यक्ती म्हणजे देवेंद्रजी फडणवीस. आजच्या घडीला त्यांच्या इतके गुण असणारी व्यक्ती अन्य कोणत्याही राजकीय पक्षाच्या अभावानेच सापडेल. त्यामुळे त्यांच्याकडून शिकण्यासारखे, प्रेरणा घेण्यासारखे खूप काही आहे, हे त्यांचे विरोधकही मान्य करतात. त्यामुळे अशा सर्वव्यापी, सर्वसमावेशक नेत्याकडून ज्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, अनुसरण्यासारख्या आहेत आणि अशा गुणांचा समावेश आपल्याही जीवनात झाला, तर आपलेही जीवन बदलून जाईल.
 
तरुणांना सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारे नेतृत्व हे नेहमीच प्रभावी ठरत असते. असे नेतृत्व सामान्यजनांनाही आपलेसे वाटत असते आणि त्याचवेळी त्या नेतृत्वाचा आधारही वाटत असतो. अशा चांगल्या नेतृत्वाच्या बळावरच राष्ट्राची प्रगती होत असते आणि उज्ज्वल भविष्याची पेरणीही होत असते. म्हणूनच देवेंद्रजींसारखे एक प्रखर राष्ट्रभक्ती अंगी बाणवलेले व्यक्तिमत्त्व त्यांच्या समग्र गुणांसह जगासमोर येणे गरजेचे आहे. देवेंद्रजींनी कायमच लोककल्याणाला, समाजहिताला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. त्यासाठी ते अखंडपणाने कार्यरत असतात. त्यांनी राज्यभरात कार्यकर्त्यांचे जाळे विणलेले आहे. समयसूचकता, प्रसंगावधान, हजरजबाबीपणा या गुणांसह अनेकानेक गुणांनी त्यांनी सगळ्यांना आपलेसे केलेले आहे. त्यामुळे त्यांच्यातील ही स्वभाववैशिष्ट्ये मला वेळोवेळी भावली आणि प्रेरणादायीही वाटली. ‘व्यवस्थापनशास्त्र’ विषयाशी संबंधित शैक्षणिक संस्था चालवण्याचा 15 वर्षांचा अनुभव गाठीशी असल्याने, व्यवस्थापकीय कौशल्याच्या बाबतीत देवेंद्रजींचे व्यक्तिमत्त्व किती विलक्षण आहे, याची प्रचिती मला वेळोवेळी येत गेली. देवेंद्रजींची निर्णयक्षमता, त्यांची चिकाटी, वेळेचे नियोजन, अभ्यासू वृत्ती, आक्रमकता अशा विविध गुणांशी सांगड घालण्याचे प्रयत्न मी नेहमी करीत असतो. राजकीय जीवनात राहूनही निष्कलंक आणि चारित्र्यसंपन्न कसे राहता येऊ शकते, याचा वस्तुपाठ त्यांनी जगासमोर घालून दिला.
 
घरात तर वडिलांमुळे समाजकारण व राजकारण सातत्याने सुरू होतेच. त्यामुळे त्याचाही एक मोठा संस्कार निश्चितपणाने घडत होता. ज्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी, अशी उत्तमोत्तम कर्तृत्वसंपन्न माणसे नियमितपणे घरी येत असल्याने त्यांच्याकडून जगण्याची, विचारांची आणि व्यक्तिमत्त्वाची प्रेरणा मिळत होती. ज्यांना भेटण्याची अनिवार इच्छा किंवा ओढ माणसांना असू शकते, अशी माणसे घरात प्रत्यक्ष जवळून पाहायला मिळण्याचे भाग्यच देवेंद्रजींना लाभले होते. त्यामुळे अटलबिहारी वाजपेयी, प्रमोदजी महाजन हे जेव्हा त्यांच्या घरी येत असत, तेव्हा त्यांची देहबोली, त्यांचे वागणे-बोलणे, त्यांचे विचार हे सारे देवेंद्रजी जवळून पाहत असत आणि अभ्यासत असत. ही दोन व्यक्तिमत्त्वे म्हणजे त्यांच्यासाठी खूप मोठी प्रेरणास्थाने ठरली आहेत. अटलजींची ओघवती भाषाशैली, त्यांचे भाषेवरचे अमोघ प्रभुत्व, त्यांच्या देशप्रेमाने ओतप्रोत भरलेल्या कविता, जनसामान्यांची पकड घेणारी त्यांची भाषणे, लोकसभेत मंत्रमुग्ध करणारी व विरोधकांनाही शांतपणे ऐकायला लावण्याची प्रचंड क्षमता असणारी त्यांची ऐतिहासिक भाषणे या सगळ्यांचा देवेंद्रजींनी खूप बारकाईने अभ्यास केला होता. त्याचप्रमाणे, त्याकाळातील असंख्य तरुणांचा आदर्श असणारे प्रमोद महाजन यांच्या राजकीय व्यक्तिमत्त्वाची प्रेरणा देवेंद्रजींनी घेतली. त्यांचे कार्यकर्त्यांशी संवाद साधणे, विविध सभा गाजवणे, अतिशय मुद्देसूद मांडणी करणे, स्थानिक व राष्ट्रीय प्रश्नांची नेमकेपणाने जाण असणे अशा अनेक गोष्टी त्यांनी प्रमोद महाजनांकडून आत्मसात केल्या. त्यामुळे देशाच्या राजकारणातील या दोन उत्तुंग व्यक्तिमत्त्वांचा प्रभाव त्यांच्यावर पडलेला दिसून येतो. याशिवाय, त्यांच्या आयुष्यात त्यांना प्रेरणा देणारी इतरही अनेक मंडळी आहेत. त्यामध्ये लालकृष्णजी अडवाणी, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, नितीनजी गडकरी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ही त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाची अशी प्रेरणास्थाने आहेत. एका पक्षात इतकी उत्तुंग प्रतिभेची आणि कर्तृत्वाची माणसे भेटणे यालाही भाग्य लागते.
 
राष्ट्रभक्ती नसानसांत असलेल्या देवेंद्रजींच्या आदर्शस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आहेत. आज पंतप्रधानांनी आपल्या नेतृत्व कौशल्याने नव्या भारताच्या निर्मितीचा संकल्प केलेला आहे. त्यामुळे आधुनिक भारताच्या इतिहासातील सर्वांत प्रभावी पंतप्रधान म्हणून त्यांच्याकडे देश अतिशय आदराने पाहतो. अत्यंत प्रभावी प्रशासन कौशल्य, निष्कलंक चारित्र्य आणि स्वच्छ प्रतिमा ही गुणवैशिष्ट्ये, जी श्रद्धेय नरेंद्र मोदींजीच्या ठायी आहेत, त्याच गुणांचा समुच्चय देवेंद्रजींच्या व्यक्तिमत्त्वातही झालेला आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी स्वच्छ आणि समाजाभिमुख प्रशासनाचे एक पर्वच देशात सुरू केले आहे आणि त्यांच्या या ध्येयाला अगदी मनापासून साथ देणारे देवेंद्रजी आहेत. ते पंतप्रधानांचे सच्चे अनुयायी आणि प्रिय शिष्य आहेत. ‘केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र’ ही लोकांनी दिलेली घोषणा प्रसिद्ध झाली ती यामुळेच! जसे मोदीजी हे देवेंद्रजींचे आदर्श आहेत, त्याचप्रमाणे स्व. अरुणजी जेटली हेदेखील त्यांचे आदर्श आहेत. ‘तत्त्वांशी कधीही तडजोड न करणारी व्यक्ती’ म्हणून ते जेटलीजी यांच्याकडे पाहतात आणि त्याच गुणांचे ते स्वतःदेखील पुरेपूर अनुकरण करतात.
 
एखादी व्यक्ती कोणाला आदर्शस्थानी मानते, यावर त्या व्यक्तीची जडणघडण कोणत्या संस्कारातून झालेली आहे, हे लक्षात येते. देवेंद्रजींच्या आयुष्यातील आदराची आणि आदर्शाची स्थाने लक्षात घेतली, तर त्यांच्याही जीवनाची दिशा राष्ट्रभक्तीने ओतप्रोत भरलेली आहे, हे लक्षात येते. नागपूरातील जडणघडणीतून आणि संघर्षमय वाटचालीतून आज देवेंद्र फडणवीस हे प्रभावी नेतृत्व साकारलेले आहे. त्यांनी आपल्या जीवनातील ध्येय निश्चित करून जीवनाला जो आकार दिलेला आहे, तो निश्चितच अनुकरणीय असाच आहे, तितकाच प्रेरणादायीदेखील!
 
अमित गोरखे, आमदार, भाजप