मुंबई : कॉमेडियन सुनील पाल यांनी आपल्या विनोदी अभिनय शैलीने सगळ्यांनाच खळखळून हसवले होते. अनेक हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी कामं केली आहेत. मात्र, सध्या सुनील पाल त्यांच्या कामामुळे नव्हे तर वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आले आहेत. सुनील पाल यांच्या पत्नीने त्यांच्या बेपत्ता होण्याची ३ डिसेंबर २०२४ रोजी तक्रार केली होती. मात्र आता या घटनेसंबंधित मोठी अपडेट समोर आली आहे. बेपत्ता झालेले सुनील पाल २४ तासांमध्ये सापडले असून त्यांचे पोलिसांशी बोलणे झाल्याची माहिती देखील पाल यांच्या पत्नीने दिली आहे.
सुनील पाल बेपत्ता झाल्याची तक्रार पत्नी सरिता पालने मुंबईतल्या सांताक्रुझ पोलीस ठाण्यात दिली होती. सरिता पाल यांनी केलेल्या तक्रारीत असे म्हटले होते की, "सुनील पाल आज घरी आले नाही. त्यांचा फोन देखील स्विच ऑफ लागत आहे. त्यांच्याशी कोणताच संपर्क होत नसल्यामुळे मी पोलीसांत तक्रार करत आहे."
दरम्यान, या घटनेसंबंधित सरिता पाल यांनी मोठी अपडेट दिली असून मिळालेल्या माहितीनुसार,"सरिता पाल यांचा सुनील पाल यांच्यासोबत संपर्क झाला असून त्याबद्दल पोलिसांनाही माहिती देण्यात आली आहे”. तसेच, टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सरिता पाल म्हणाल्या की सुनील यांचे अपहरण झाले होते आणि अपहरणकर्त्यांबद्दल सुनील यांनी पोलिसांना माहिती देखील दिली आहे. सध्या या प्रकरणाबद्दल पोलिस अधिक तपास करत आहेत.