मुंबई : कान्स फिल्म फेस्टिवल गाजवणाऱ्या ‘ऑल वी इमॅजिन अॅज लाईट’ या चित्रपटाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. दिग्दर्शक पायल कपाडिया यांच्या ‘ऑल वी इमॅजिन अॅज लाईट’ या चित्रपटाला न्यूयॉर्क फिल्म क्रिटिक्स सर्कलमध्ये सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. अभिनेत्री छाया कदम यांची महत्त्वाची भूमिका असणाऱ्या या चित्रपटाला कान्स’ फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘ग्रँड प्रिक्स’ हा पुरस्कार मिळाला होता.
आनंदाची बाब म्हणजे ‘ऑल वी इमॅजिन अॅज लाईट’ हा कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘ग्रँड प्रिक्स’ पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला होता. आणि आता या चित्रपटाला अमेरिकेत दोन मानाचे पुरस्कार मिळाल्यामुळे कलाकारांना अधिक हुरुप आला आहे. तसेच, विशेष म्हणजे, ‘ऑल वी इमॅजिन अॅज लाईट’ला याआधी सोमवारी न्यूयॉर्कमध्ये झालेल्या गॉथम फिल्म अवॉर्ड्स २०२४ मध्येही सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा (फिचर ट्रॉफी) सन्मान मिळाला होता.
‘ऑल वी इमॅजिन अॅज लाईट’मध्ये कानू कुसरुती, दिव्या प्रभा आणि छाया कदम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती फ्रान्समधील ‘पेटीट काओस’ आणि भारतातील ‘चॉक अँड चीज’ आणि ‘अनदर बर्थ’ यांनी केली आहे.