भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याचे स्पष्ट होत असतानाच, गेल्या दहा-बारा वर्षांत नवे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उर्फ आपल्या देवाभाऊंनी सातत्याने केलेला संघर्ष डोळ्यासमोरुन गेला. विधिमंडळात मी पाहिलेली देवाभाऊंची तडफदार कारकीर्द आठवली. काही तासांतच महायुतीच्या विजयावर शिक्कामोर्तब होऊन नव्या इतिहासाची नोंद झाली. त्यावेळी या अतुलनीय कामगिरीबद्दल देवाभाऊंचा अभिमान वाटला.
विधानसभा निवडणुकीची मतमोजणी दि. २३ नोव्हेंबर रोजी सुरू झाल्यानंतर भाजपच्या वतीने एका दूरचित्रवाणी वाहिनीच्या कार्यालयात टॉक शोमध्ये सहभागी झालो होतो. टपाली मतदानाच्या मोजणीत काही ठिकाणी संमिश्र प्रतिसाद मिळत होता. परंतु, मतांमधील अंतर फारसे नव्हते. काही वेळातच पहिल्या फेरीची मतमोजणी सुरू झाल्यावर अर्ध्या तासात महायुतीचा निर्विवाद व ऐतिहासिक विजय होणार असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त झाला.
भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याचे स्पष्ट होत असतानाच, गेल्या दहा-बारा वर्षांत नवे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उर्फ आपल्या देवाभाऊंनी सातत्याने केलेला संघर्ष डोळ्यासमोरुन गेला. विधिमंडळात मी पाहिलेली देवाभाऊंची तडफदार कारकीर्द आठवली. काही तासांतच महायुतीच्या विजयावर शिक्कामोर्तब होऊन नव्या इतिहासाची नोंद झाली. त्यावेळी या अतुलनीय कामगिरीबद्दल देवाभाऊंचा अभिमान वाटला.
या निवडणुकीत भाजपच्या वतीने माझ्याकडे सोशल मीडिया समन्वयक म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. त्यातून राज्याच्या विविध भागातील ‘सेंटीमेंट’ कळत होत्या. त्यामुळे २०२४ सालच्या निवडणुकीवेळेच्या निकालाची पुनरावृत्ती होईल, ‘रिपीट होईल, अशी ‘गट फिलिंग’ होती. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात एकहाती सत्ता यावी आणि एक कल्याणकारी राज्य व राज्याच्या सध्या चालू असलेल्या प्रगतीला गती यावी, ही सर्व जनमानसाची भावना सोशल मीडियामधून व्यक्त होताना दिसत होती.
सत्ता असो की नसो, केवळ देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेट करण्याची महाविकास आघाडीच्या नेत्यांची रणनीती ठरलेली होती. महाविकास आघाडीचे पानिपत करण्याची क्षमता देवाभाऊंमध्ये आहे. ते लक्षात घेऊन लोकसभा निवडणुकी आधीपासून सातत्याने देवाभाऊंविरोधात खोट्या आरोपांची राळ उडविली गेली. महाविकास आघाडीच्या विविध नेत्यांकडून त्यांच्यावर हेतुपुरस्सर व निराधार टीका केली गेली. महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वप्रथम देवाभाऊंनीच मराठा आरक्षण लागू केले. मात्र, ते आरक्षण विरोधी असल्याचा आरोप सुरूच आहे. त्यातून महाराष्ट्राची प्रतिमा मलीन करण्याचा डाव आखला गेला. आपल्या सत्तेसाठी महाराष्ट्राची बदनामी करण्याचे विरोधकांचे कृत्य निंदनीय होते. लोकसभा निवडणुकीत खोट्या ‘नॅरेटिव्ह’चा आधार घेतल्यावर, विधानसभा निवडणूकही जिंकण्याचे मनोरथ आखण्यात आले. परंतु, महाविकास आघाडीचे आव्हान लिलया पेलत देवाभाऊंच्या रणनीतीने विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीने ऐतिहासिक विजयाची नोंद केली.
विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघातून २०१२ साली निवड झाल्यापासून देवेंद्र फडणवीस यांची अभ्यासू भाषणे ऐकत आहे. त्यांची अभ्यासू वृत्ती असून, सामान्यांविषयीची तळमळ आणि महाराष्ट्राच्या विकासाचे व्हिजन आहे. 2014 सालच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना मुख्यमंत्रिपदावर संधी मिळाल्यावर त्यांचा झंझावात राज्याने अनुभवला. भाजप-शिवसेना युती सरकारच्या विविध निर्णयांतून भविष्यातील विकसित महाराष्ट्र घडविण्याची पायाभरणी झाली. त्यांच्या कारकिर्दीत मुंबई, ठाण्यासह विविध शहरांमध्ये मेट्रोच्या पाऊलखुणा उमटल्या. वाहतुककोंडीत अडकलेल्या नागरिकांना स्वप्नवत मेट्रो प्रवासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी हिरीरीने पुढाकार घेतला. नवे प्रकल्प अडकू नयेत, यासाठी ते कटाक्षाने प्रकल्पांच्या आराखड्यात लक्ष घालत होते. महाराष्ट्राच्या विकासाची ही तडफ मनाला भावत होती. त्यातून त्यांच्या नेतृत्वाखाली मी 2018 साली विधान परिषदेची निवडणूक लढविली. तसेच, त्यांच्या रणनीतीने भारतीय जनता पक्षामधून विजय नोंदविला.
कायम पारंपरिक पद्धतीऐवजी नव्या शैली व तंत्रज्ञानाचा वापर ही देवाभाऊंची खासियत आहे. या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राला वेग प्राप्त करुन दिला. २०१४ ते २०१९च्या काळात मुख्यमंत्रिपद भूषवित असताना त्यांच्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयांमध्ये भविष्याची गरज लक्षात घेतली गेली. राज्याच्या ग्रामीण विकासासाठी ‘जलयुक्त शिवार अभियान’, मुंबई शहराला जागतिक स्तरावर नवी ओळख देण्यासाठी ‘मुंबई नेक्स्ट’, महाराष्ट्रातील काही अविकसित जिल्हे मुंबईला जोडणारा समृद्धी महामार्ग, पोलीस खात्याचे डिजिटायलझेशन, सायबर लॅब, सरकारी नोकर्यांमध्ये अनाथांसाठी एक टक्के आरक्षण, ‘मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प’, मागेल त्याला ‘शेततळे योजना’ आदी योजना साकारतानाच ‘आत्मनिर्भर महाराष्ट्र’ घडविण्याचा ध्यास घेतला. त्यांनी प्रशासनाबरोबर समन्वय ठेवून विकासकामाला वेग दिला अन् त्यातूनच समृद्ध महाराष्ट्राची जडणघडण झाली. मराठा समाजाला प्रथमच आरक्षणाचा हक्क मिळवून दिला. परंतु, तो निर्णय न्यायालयात टिकविण्यात महाविकास आघाडीला अपयश आले.
भाजप-शिवसेना युतीच्या सरकारने २०१४ साली केलेल्या विकासकामांच्या जोरावर युतीने एकत्रितरित्या २०१९ सालामधील विधानसभा निवडणूक लढविली होती. केंद्रीय नेतृत्वाबरोबरच भाजपच्या लाखो कार्यकर्त्यांना देवेंद्र फडणवीस यांचीच निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदी निवड होईल, असा विश्वास होता. त्याला महाराष्ट्रातील जनतेनेही साथ देत भाजप-शिवसेना युतीला महाराष्ट्राने बहुमताने निवडून दिले. भाजपला १०५ व उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या. पण, युतीचे सरकार स्थापन होण्याऐवजी उद्धव ठाकरे यांनी युती तोडून महाविकास आघाडीबरोबर जाणे पसंत केले. महाराष्ट्राच्या जनतेचा हा विश्वासघात होता. महाराष्ट्रातील जनतेने भाजप व शिवसेनेला एकसंधपणे मते दिली. मात्र, मतदारांच्या इच्छेबरोबर प्रतारणा करुन उद्धव ठाकरे बाहेर पडले अन् महाराष्ट्र काही वर्ष मागे पडला.
विधानसभेच्या २०१९ सालच्या निवडणुकीपूर्वी देवाभाऊंचे ‘मी पुन्हा येईन,’ हे वाक्य गाजले होते. भाजप-शिवसेना व मित्रपक्षांनी आत्मविश्वासाने लढविलेल्या विधानसभा निवडणुकीत युतीलाच बहुमत मिळाले. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या सत्तालालसेपोटी भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्रिपद हुकले. समस्त महाराष्ट्राचे संवेदनशील मन हळहळले. भाजपकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद सोपविण्यासाठी आपण दिलेले मत वाया गेल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त झाली होती. विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी अवघा महाराष्ट्र पिंजून काढला. विधानसभा निवडणुकीनंतर चार-पाच महिन्यांत ‘कोविड’ची जीवघेणी साथ आल्यानंतर ते सामान्य रुग्णांना वैद्यकीय सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहिले. ‘कोविड’ हॉस्पिटलला भेट देऊन तेथील परिस्थितीचा बैठक घेऊन आढावा घेण्यास सुरुवात केली. त्यातही महाविकास आघाडी सरकारने अडथळे टाकून राज्य सरकारच्या वरिष्ठ अधिकार्यांना बैठकांना उपस्थित राहण्यास मनाई केली.
ठाणे येथील दौर्यात देवेंद्र फडणवीस यांनी ‘कोविड’ हॉस्पिटलला भेट देऊन स्वत: विलगीकरण कक्षाची पाहणी केली. तसेच, डॉक्टरांकडून व्यवस्थेचा आढावा घेऊन वैद्यकीय कर्मचार्यांना प्रोत्साहन दिले. स्वत: ‘कोविड’चा संसर्ग झाल्यानंतर कोणत्याही बड्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल न होता सरकारी सेंट जॉर्जमध्ये दाखल होऊन उपचार घेतले. त्यातून शासकीय सेवेतील डॉक्टरांवरील विश्वास व्यक्त झाला.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात महसूल मिळविण्यासाठी मदिरालये उघडून मंदिरे बंद ठेवली गेली. या हिंदूविरोधी निर्णयाविरोधात तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यभर संघर्ष पुकारला गेला. मेट्रोच्या आरे कारशेड कामाला स्थगिती देऊन महाविकास आघाडी सरकार मुंबईकरांचे हजारो कोटींचे नुकसान करीत असल्यावरुन तीव्र आंदोलन उभारले. व्यापारी मनसुख हिरेनच्या हत्या प्रकरणानंतर महाविकास आघाडी सरकारच्या वसूली कारभाराची लक्तरेच टांगली गेली. पालघरमध्ये साधूंचे हत्याकांड झाल्यानंतर महाविकास आघाडी मूग गिळून गप्प बसली होती.
गेल्या अडीच वर्षांच्या काळात महायुती सरकारच्या ‘लाडकी बहीण योजना’, दरवर्षी मोफत तीन गॅस सिलिंडर, ‘युवा कार्य प्रशिक्षण योजना’, शेतकर्यांना मोफत वीज, ‘वयोश्री योजना’, मुलींना मोफत उच्च शिक्षण, ‘मोफत देवदर्शन योजना’, ‘घरगुती सौर ऊर्जा योजना’ आदींसारख्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी देवाभाऊ अथक प्रयत्नशील होते. या योजनेला नागरिकांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला. अनेक कुटुंबांचे जीवनमान बदलले गेले. यापुढील काळात या योजनांबरोबरच समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी ते प्रयत्नशील आहेत. महायुतीच्या सरकारने अनेक कल्याणकारी योजना राबवून सामान्यांचे हित जोपासण्याबरोबरच परदेशी गुंतवणूक आणून राज्याला प्रथम क्रमांकावर पोहोचविले.
लोकसभा निवडणुकीला सामोरे जात असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी व राज्यातील महायुतीच्या सरकारविरोधात प्रचाराचा काहीही मुद्दा महाविकास आघाडीकडे नव्हता. त्यामुळे त्यांनी खोटे ‘नॅरेटिव्ह’ प्रस्थापित करुन महायुतीविरोधात प्रचार केला. मुस्लीम धर्मीयांच्या मतांचे ध्रुवीकरण करुन संविधान बदलणार असल्याची धादांत खोटी अफवा पसरवली. ओबीसी, एससी, एसटी समाजाची दिशाभूल करीत जाती-जाती धर्मामध्ये वाद निर्माण करून भाजपविरोधात मतदान करण्यास मतदारांना प्रवृत्त केले गेले होते.
लोकसभा निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडीत मतांचा फरक केवळ ०.३ टक्के होता. परंतु, महायुतीच्या पारड्यात जागा कमी पडल्या. या पिछेहाटीची नैतिक जबाबदारी देवाभाऊंनी स्वीकारुन उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. देवाभाऊंच्या राजीनाम्याने कार्यकर्त्यांचे मनोबल ढासळू शकते, ही भावना नेते व कार्यकर्त्यांकडून मांडली गेली. त्यांनी राजीनामा मागे घ्यावा, यासाठी आग्रह धरला गेला. अखेर सर्वांच्या आग्रहामुळे ते पदावर कायम राहिले. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या कामगिरीबाबत उत्सुकता व्यक्त होत होती. या परिस्थितीतून देवाभाऊंकडून नक्की मार्ग काढला जाईल, असा कार्यकर्त्यांना विश्वास होता.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती लढवित असलेल्या प्रत्येक मतदारसंघात विजयासाठी देवाभाऊंनी रणनीती आखली. शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा पवार यांना साथीला घेऊन नियोजन केले गेले. राज्याच्या कानाकोपर्यात 13 दिवसांत 64 सभा-रॅलींना उपस्थित राहून मतदारांबरोबर संवाद साधला अन् महायुतीचा २३५ मतदारसंघांत विजय झाला. भाजपने राज्याच्या इतिहासात प्रथमच १३२जागांचा विक्रम नोंदविला आहे. त्यात नक्कीच संघाचा सिंहाचा वाटा आहे. हा जनाधार हिंदुत्वाला, विचारांना आणि महाराष्ट्राच्या प्रगतीला आहे. तसेच या प्रगतीला चालना देणारे ‘व्हिजनरी नेतृत्व’ देवाभाऊंना आहे.
फिनिक्स पक्षी हा राखेतून पुन्हा उभा राहतो. त्याचप्रमाणे देवाभाऊ हे पुन्हा संघर्ष करीत मुख्यमंत्रिपदावर विराजमान होत आहेत. राज्यातील सुमारे अडीच कोटी बहिणींचे लाडके देवाभाऊ यांची मुख्यमंत्रिपदावरील इनिंग आता सुरू होत आहे. त्यांच्या कारकिर्दीत महाराष्ट्र हे प्रथम क्रमांकाचे व एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था असलेले वेगाने प्रगती करणारे राज्य हा नावलौकिक प्रस्थापित करेल, हा माझ्यासह भाजपच्या महाराष्ट्रातील असंख्य कार्यकर्त्यांना विश्वास आहे.
नवनियुक्त मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना ‘विकसित महाराष्ट्र’ घडविण्यासाठी शुभेच्छा!
निरंजन वसंत डावखरे, आमदार, भाजप, कोकण पदवीधर मतदारसंघ