भारतीय रिझर्व्ह बँकेने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार भारतात घरगुती कर्जदारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. जून २०२४ पर्यंत हे प्रमाण जीडीपीच्या चालू बाजारमूल्याच्या तब्बल ४२ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. याच अहवालात असेही सांगितले आहे की भारतात घरगुती कर्जदारांचे प्रमाण जरी ९१ टक्क्यांवर पोहोचले असले तरी कर्जबाजारीपणात मात्र घट झाली आहे.
आपल्याकडील जुनी - जाणती माणसे आपल्याला कायमच एक सल्ला द्यायची. आयुष्यात थोडी प्रगती कमी झाली तरी चालेल पण आयुष्यात अऋणी रहा. म्हणजे आयुष्यात कधीही कर्ज घेऊ नकोस. कर्ज घेणे हे कायमच कमी प्रतिष्ठेचे मानले जाई. कर्ज घेणाऱ्याला वाईट वागणुक देत असतो, असे समज आपल्याकडे खुप घट्ट मूळ धरून होते. परंतु भारतीयांची हीच सवय पूर्णपणे बदलताना आता दिसत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार भारतात घरगुती कर्जदारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. जून २०२४ पर्यंत हे प्रमाण जीडीपीच्या चालू बाजारमूल्याच्या तब्बल ४२ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. याच अहवालात असेही सांगितले आहे की भारतात घरगुती कर्जदारांचे प्रमाण जरी ९१ टक्क्यांवर पोहोचले असले तरी कर्जबाजारीपणात मात्र घट झाली आहे. यावरूनच भारतातील स्थिती ही बाकीच्या विकसनशील अर्थव्यवस्थांच्या तुलनेत खूपच चांगली असल्याचा निष्कर्ष या अहवालात मांडण्यात आला आहे.
या अहवालात सांगितल्या प्रमाणे भारतात प्रामुख्याने तीन कारणांसाठी घरगुती कर्जे घेतली जात आहेत. पहिले म्हणजे उपभोग्य वस्तुंसाठी म्हणजे वैयक्तिक कर्ज, क्रेडिट कार्ड्सची बिलं आणि इतर घरगुती गोष्टींसाठी घेतली जाणारी छोटी -मोठी कर्ज यांचा समावेश होतो. दुसऱ्या स्तरात वस्तु गहाण ठेवून काढलेली कर्जे, दुचाकी -चारचाकी यांच्यासाठी काढलेली कर्जे आणि तिसऱ्या स्तरात गुंतवणुक किंवा अॅसेट्स तयार करण्यासाठी काढलेल्या कर्जांचा समावेश होतो, जसे की गृह कर्ज, शेतजमीन घेण्यासाठी, व्यवसाय करण्यासाठी, शैक्षणिक कर्जे यांसारख्या कर्जांचा समावेश होतो. यांमधील जवळपास दोन तृतीयांश कर्जे ही उच्च क्रेडिट क्षमतेची कर्जे आहेत. या कर्जदारांमध्ये असंही दिसून आलं आहे की उच्च क्रेडिट क्षमतेची कर्जे अॅसेट्ससाठी तर मध्यम क्षमतेची कर्जे ही घरगुती वापरासाठी काढली गेली आहेत.
यामध्ये असेट्स तयार करण्यासाठी काढल्या गेलेल्या दरडोई कर्जांमध्ये सातत्याने वाढ होत असली तरी बाकीच्या कर्जांचे प्रमाण स्थिर आहे. याचाच अर्थ भारतीयांचा कल हा किरकोळ गोष्टींपेक्षा ज्या गोष्टींमधून भविष्यात मोठे फायदे होऊ शकतात अशा गोष्टी निर्माण करण्याकडे वाढतो आहे.
भारतात यापूर्वीही कर्जाच्या वाढत्या प्रमाणाबद्दल चिंता व्यक्त केली गेली होती. गुंतवणुक व्यवस्थापन क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या मोतीलाल ओसवालने एप्रिल २०२४ मध्ये प्रकाशित केलेल्या अहवालात या कर्जांचे प्रमाण ४० टक्क्यांवर पोहोचल्या बद्दल चिंता व्यक्त केली होती. परंतु सरकारने यावर प्रतिक्रिया देताना हे मत खोडून काढताना भारतीयांचे नुसत्या किरकोळ गोष्टींसाठी कर्ज काढण्यापेक्षा काहीतरी वास्तव मालमत्ता खरेदी करण्यासाठी कर्ज काढत आहेत ही फार चांगली गोष्ट आहे असे मत नोंदवले होते. रिझर्व्ह बँकेनेही याबद्दल अनुकुल मत नोंदवताना कर्जांच्या वाढत्या प्रमाणाकडे सकारात्मक पध्दतीने बघण्याची गरज आहे असे सांगितले आहे. उच्च क्रेडिट क्षमता असलेल्या वर्गाकडून घेतली जाणारी कर्जे ही प्रामुख्याने मालमत्ता खरेदी सारख्या मोठ्या गुंतवणुकींसाठी वापरली जात आहे. हे अर्थव्यवस्थेसाठी खरोखरच एक सुचिन्ह असून यातून मोठ्या रोजगार तसेच गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध होतील असे मत रिझर्व्ह बँकेकडून व्यक्त करण्यात आले आहे.
सध्या तरी याकर्जांचे प्रमाण वाढत असले यातून कर्ज बुडित खाती जाण्याचे प्रमाण नगण्य आहे. तरीही यातून भारतीयांचा कर्ज आणि भविष्यातील गुंतवणुक यांकडे बघण्याचा कल दिसून येतोय आणि त्याकडे गांभीर्याने बघण्याची गरज निर्माण झाली आहे हे निश्चित.