उत्पादन क्षेत्राचा अर्थव्यवस्थेतील वाटा ५०टक्क्यांनी वाढणार

31 Dec 2024 16:45:03
 
 
manufacture
 
 
 
नवी दिल्ली : देशातील उत्पादन क्षेत्राचा अर्थव्यवस्थेतील वाटा पुढील १० वर्षात तब्बल ५० टक्क्यांनी वाढणार आहे. २०३२ पर्यंत या क्षेत्राचा अर्थव्यवस्थेतील वाटा १४ टक्क्यांवरून २१ टक्क्यांवर जाणार आहे. अर्थव्यवस्थापन क्षेत्रातील प्रमुख कंपनी शेअरखान या कंपनीकडून देशातील उत्पादन क्षेत्राचा अहवाल प्रकाशित झाला आहे.
 
 
या अहवालानुसार उत्पादन क्षेत्रात सातत्याने केल्या जाणाऱ्या खासगी आणि सरकारी क्षेत्रातील गुंतवणुकीमुळे भारतात हे क्षेत्र विस्तारत आहे. या क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी सरकारकडून पीआयएल योजना राबवली जाते. या योजनेतून बंदरे. विमानतळ, रस्ते बांधणी यांसारखे पायाभूत सुविधांचे मोठे प्रकल्प राबवले जातात. यामुळे मोठ्या प्रमाणावर गुंतवणुक होऊन रोजगार निर्मिती होते.
 
 
ऑगस्ट २०२४ पर्यंत या क्षेत्रात १ लाख ४६ हजार कोटींची गुंतवणुक झाली असून त्यामार्फत एकूण ९ लाख ५० हजार प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगारांची निर्मिती झाली आहे. २०३४ पर्यंत १० ट्रिलीयन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याचे धेय्य आहे. हे लक्ष्य साध्य करण्यात उत्पादन क्षेत्राचा मोलाचा वाटा असणार आहे. त्यादृष्टीने उत्पादन क्षेत्राची आगेकूच सुरू आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0