आदिवासी शेतकर्‍यांसाठी स्ट्रॉबेरी ठरतेय वरदान

30 Dec 2024 13:41:53
Strawberry

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील स्ट्रॉबेरीचे माहेरघर म्हणून नावारुपाला येत असलेल्या सुरगाणा आणि कळवण तालुक्यातील शेती चांगलीच बहरली आहे. आंबट गोड चवीची फळे काढणी योग्य झाली असून, त्यांच्या रंगाने संपूर्ण परिसर गुलाबी आणि लालेलाल झाल्याचे नजरेस पडत आहे. वाढत्या थंडीबरोबर जिल्ह्यातील स्ट्रॉबेरीचा हंगाम चांगलाच बहरला आहे. शरीरासाठी आरोग्यदायक लालचुटूक स्ट्रॉबेरीची सप्तशृंगगड, वणी आणि सापुतार्‍याच्या रस्त्यांवर ठिकठिकाणी शेतकर्‍यांकडून विक्री केली जात आहे. दुर्गम भाग असलेल्या सुरगाणा आणि कळवण तालुक्याच्या घाटमाथ्यावरील लाल मातीत मागील काही वर्षांपासून या भागातील शेतकर्‍यांचे ( Farmers ) प्रमुख पिक स्ट्रॉबेरी झाले आहे. स्ट्रॉबेरीच्या शेतीमधून इथला शेतकरी चांगलाच सधन झाला आहे. स्ट्रॉबेरी उत्पादनात अग्रेसर असलेल्या महाबळेश्वर नंतर नाशिक जिल्ह्यात निर्यातक्षम लालभडक, लहान मोठी स्ट्रॉबेरीची फळे स्थानिक ठिकाणाबरोबरच इतर राज्यांबरोबरच विदेशात निर्यातही केली जाते. तसेच सप्तशृंगगड आणि सापुतारा येथे जाणार्‍या भाविक व पर्यटकांना स्ट्रॉबेरी आकर्षित करत आहे.

प्रामुख्याने कळवण तालुक्याच्या पश्चिम भागातील पळसदरचे खोरे, सुकापूर, देवळी कराड, खेकुडे, बोरदैवत, वडापाडा तर सुरगाणा तालुक्याच्या घाटमाथ्यावरील पळसन, घोडांबे, सराड, बोरगाव, हतगड, घागबारी, लिंगामा, नागशेवडी, पोहाळी, चिखली शिंदे, ठाणापाडा आदी गाव आणि पाड्यांवर स्ट्रॉबेरीची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. याआधी येथील शेतकरी वर्गाकडून हंगामी शेती केली जात असे. आपल्या शेतामध्ये भात, नागली आणि उडीद अशी पारंपरिक पिके घातली जात होती. त्यात आता बदल झाला असून १२ महिने शेती केली जाते. आता या भागामध्ये ऊस, मका, भुईमूग, कुळीथ, दादर ज्वारी, गहू या पिकांसह शास्त्रशुद्ध पद्धतीने स्ट्रॉबेरीची लागवड केली जाते.

पोषक वातावरण आणि हवामान

सुरगाणा आणि कळवण तालुक्यातील रहिवासी अर्थार्जनासाठी दिंडोरी, निफाड, चांदवड या तालुक्यांमध्ये मजुरीसाठी येत. याभागात पावसाचे प्रमाण अधिक असले, तरी तरी जानेवारी महिन्यापासून पाण्याची समस्या निर्माण व्हायची. त्यात आता सुधारणा झाली असून, शेतील प्राधान्य दिले जात आहे. स्ट्रॉबेरीच्या पिकासाठी आवश्यक असलेले पोषक वातावरण व उत्तम जमिनीची पोत यामुळे मागील सात ते आठ वर्षांपासून स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग चांगलाच यशस्वी होत आहे. त्यामुळे येथे प्रत्येक वर्षी स्ट्रॉबेरी लागवडीखालील क्षेत्र वाढत आहे. आता येथील शेतकर्‍यांचे प्रमुख पीक म्हणून स्ट्रॉबेरीकडे बघितले जाते.

...या वाणांची होते लागवड

स्ट्रॉबेरी पिकाचे अनेक वाण असले, तरी काही प्रमुख वाणांची नाशिक जिल्ह्यात लागवड होते. यामध्ये प्रामुख्याने सेल्वा, राणी, इंटर डाऊन, राणी, कामारोजा, नाभीया या वाणांची लागवड केली जाते. या वाणांची फळे कमी दिवसांत लालभडक आणि टपोरे होतात. या वाणांची रोपे विशेषकरुन महाबळेश्वर येथून मागविली जातात. त्यांचा दर सरासरी १५ ते २५ रुपये असतो. खर्चाच्या तुलनेत अधिक उत्पन्न होत असल्याने शेतकरी वर्ग चांगलाच सुखावला आहे.

...अशी होते विक्री

काही शेतकर्‍यांकडून एक आणि दोन किलोचे खोके भरून मुंबई, सुरत, नवसारी, बिल्लीमोरा, वघई, भरूच, वाजदा येथील घाऊक बाजारात पाठवले जातात. दोन किलोच्या या खोक्याचा दर २०० ते २५० रुपये असल्याचे सांगितले जाते. तर काही शेतकर्‍यांकडून शेतातच व्यापार्‍यांना विक्री केली जाते. याचा दर ७० ते ८० रुपये किलो असतो. तर गुजरातमधील भाविक शिर्डी, सप्तशृंगगड, सापुतारा आणि त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी येत असतात. या मार्गावर बहुतांश शेतकरी ठिकठिकाणी स्टॉलची उभारणी करून स्ट्रॉबेरीची विक्री करतात. तसेच, किरकोळ व्यापार्‍यांकडूनही विक्री केली जाते. ज्यामुळे अनेकांना रोजगाराची संधीदेखील प्राप्त होत आहे.

चांगल्या टिकवण क्षमतेमुळे आर्थिक तोटा कमी

दोन ते तीन महिन्यांमध्ये स्ट्रॉबेरीचा हंगाम संपतो. स्थानिक बाजाराबरोबरच परराज्यात विक्री करताना विशेष अडचण येत नाही. तोडणी केल्यानंतर पाच ते सहा दिवस फळ चांगल्या स्थितीत राहते. स्ट्रॉबेरीची टिकवण क्षमता चांगली असल्याने माल खराब होऊन आर्थिक तोटा होण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे व्यापारी वर्ग काही वेळेला चढ्या दराने खरेदीला प्राधान्य देतो.

अतुल जाधव, व्यापारी


Powered By Sangraha 9.0