मुंबई : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळविण्यात येत असून चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने १८४ धावांनी भारताचा पराभव केला. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी अंतर्गत खेळविल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाला ३४० धावांचे लक्ष्य देण्यात आले. मेलर्बन येथे झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला गोलंदाजीचे निमंत्रण दिले. पहिल्या डावात यजमान संघाने सर्वबाद ४७४ धावा केल्या तर टीम इंडियाने पहिल्या डावात सर्वबाद ३६९ धावा केल्या. परंतु, यजमान संघाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना दुसऱ्या डावात भारताला १५५ धावाच करता आल्या. सलामीवीर यशस्वी जयस्वाल २०८ चेंडूत ८४ धावा करत एकाकी झुंज दिली. जयस्वालच्या विकेटमुळे मोठा वाद होण्याची शक्यता असून त्याला बाद ठरविल्यानंतर टीम इंडियाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, टीम इंडियाची तीन बाद ३३ धावा अशी डळमळीत स्थिती असताना यशस्वी जयस्वाल-रिषभ पंत यांच्यात चौथ्या विकेटसाठी ८८ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करण्यात आली. पंतने ३० धावा करत भागीदारी योगदान दिले. त्याचबरोबर, ऑस्ट्रेलियन गोलंदाजांकडून पॅट कमिंस, स्कॉट बोलंड यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. पार्ट टाईमर ट्रॅव्हिस हेडने रिषभ पंतची बहुमुल्य विकेट घेत टीम इंडियाची भागीदारी मोडण्यात यश मिळविले. ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लाबुशेन याने पहिल्या डावात ७२ धावा तर दुसऱ्या डावात ७० धावा करत संघाच्या विजयात खारीचा वाटा उचलला.
त्याचबरोबर, टीम इंडियाचा युवा खेळाडू नितीश कुमार रेड्डी याने कसोटी कारकिर्दीतले पहिले शतक झळकावले. पहिल्या डावातील ११४ धावांच्या खेळीमुळे भारतावरील फॉलोऑनचे संकट टळले. टेस्ट वर्ल्ड चॅम्पियनशीपमधील भारताचे आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. उभय संघांमध्ये सुरू असलेल्या कसोटी मालिकेत २-१ ने ऑस्ट्रेलियन संघ आघाडीवर आहे. अंतिम सामना जिंकून टीम इंडियाला मालिका बरोबरीने संपवते का, हे पाहणे औत्सुक्याचे असेल. तुर्तास, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील अंतिम सामना नववर्षात ०३ ते ०७ जानेवारी दरम्यान सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळविला जाणार आहे.