शिवजन्मभूमीने अपक्ष उमेदवाराला कौल का दिला?

03 Dec 2024 12:17:50
 
junnar sharad sonawane
 
 
मुंबई : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारल्याने अनेकांनी अपक्ष अर्ज दाखल करून निवडणूक लढवली. परंतु, या अपक्ष उमेदवारांमधून केवळ दोघांनाच निवडणूक जिंकून आमदार होण्याचा मान मिळवता आला. यातील एक नाव म्हणजे जुन्नर मतदारसंघाचे विजयी उमेदवार शरद सोनवणे. विद्यमान आमदाराची थेट तिसर्‍या क्रमांकावर रवानगी करणारे, तसेच साखर कारखान्याच्या संचालकाला धूळ चारत विजयी मताधिक्य मिळवणारे शरद सोनवणे नक्की आहेत तरी कोण? त्यांच्या विजयाची कारणं काय आहेत? याबाबतच्या विश्लेषणात्मक सविस्तर माहितीचा आढावा.
 
जुन्नर तालुका अर्थात श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी. त्यामुळे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून जुन्नरकडे पाहिले जाते. जुन्नर हा शिरूर लोकसभा मतदारसंघात मोडणारा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात अन्य अनेक मतदारसंघांप्रमाणेच महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होती. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अतुल वल्लभ बेनके आणि श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर हे शरद पवार गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र, अपक्ष उमेदवार शरद सोनवणे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांना चीत करून पुन्हा आमदारकी मिळवली.
 
शरद सोनवणे यांच्याविषयी...
 
‘शिवजन्मभूमीच्या प्रगतीचा खरा शिल्पकार’, ‘आपला माणूस’ अशी शरद सोनवणे यांची जनमानसांत ओळख आहे. वाशी (एपीएमसी) नवी मुंबई मार्केट येथे वडिलोपार्जित व्यवसाय असतानादेखील समाजसेवेची प्रबळ इच्छा, बाळासाहेबांच्या ज्वलंत आणि हिंदुत्ववादी विचारांनी प्रभावित होऊन ते लोकसेवेत उतरले. २००६-०७ साली ‘स्वाभिमान संघटने’च्या माध्यमातून त्यांनी जुन्नर तालुक्यातील गावनगाव पिंजून काढला. लहान-मोठ्या वस्त्यांमधील लोकांशी आपुलकीचे नाते जोडले.
 
२००९ साली आमदारकीचे तिकीट जवळपास निश्चित असताना शेवटच्या क्षणी त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. २०१४ साली पुन्हा तेच घडले. पुन्हा आमदारकीचे तिकीट कापल्यानंतर मात्र त्यांनी राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला आणि ते आमदार म्हणून निवडून आले. त्यामुळे जुन्नरची राजकीय समीकरणे बदलली. पाच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी तालुक्यासाठी मोठा निधी आणला. पण, २०१९ सालच्या निवडणुकीत शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. शिवसेनेतील फुटीनंतर ते एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभे राहिले. त्यामुळे त्यांना यंदा शिवसेनेकडून तिकीट मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, महायुतीच्या जागावाटपात ही जागा अजित पवारांच्या वाट्याला आली.
 
विद्यमान आमदार अतुल बेनके सुरुवातीला अजित पवारांसोबत होते. पण, मधल्या काळात त्यांची शरद पवारांशी जवळीक वाढल्याने, ते नक्की कोणाचे उमेदवार असतील, अशी शंका व्यक्त केली जात होती. त्यांनी अजित पवारांचा पर्याय निवडला. त्यानंतर शरद पवार यांनी अतुल बेनके यांच्याविरोधात श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक सत्यशील शेरकर यांना उमेदवारी दिली. त्यात शरद सोनवणे यांनी अपक्ष अर्ज दाखल करत या दोघांनाही पराभूत केले.
 
दोन राष्ट्रवादी आमनेसामने असल्यामुळे त्यांच्या उमेदवारांचाच बोलबाला होता. परंतु, त्यांच्यावर मात करत अपक्ष उमेदवार शरद सोनवणे यांनी बाजी मारली. सोनवणे यांनी ७३ हजार, ३५५ मते मिळवत विजय मिळवला, तर सत्यशील शेरकर यांना ६६ हजार, ६९१, तर अतुल बेनके यांना ४८ हजार, १०० मते मिळाली आहेत. तसेच, अपक्ष असलेल्या आशा बुचके यांना ९ हजार, ४३५, तर वंचित बहुजन आघाडीचे देवराम लांडे यांना २२ हजार, ४०१ मते मिळाली. जुन्नर विधानसभेच्या इतिहासात अपक्ष उमेदवाराने विजय मिळविण्याची ही पहिलीच वेळ आहे.
 
शरद सोनवणेंच्या विजयाची कारणे
 
शरद सोनवणेंच्या विजयाचे प्रमुख कारण म्हणजे स्थानिक ओळख आणि जनसंपर्क. सोनवणे हे स्थानिक असून समाजातील सर्व घटकांशी असणार्‍या संपर्कामुळे मतदारांना त्यांच्याविषयी आपुलकी आहे. रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण आणि रोजगारसंधी अशा विविध समस्या सोडवण्यासाठी ते कायम तत्पर राहिल्याचे यापूर्वी पहायला मिळाले आहे. महत्त्वाचे कारण म्हणजे, त्यांना असणारा शेतकरीवर्गाचा पाठिंबा. मतदारसंघातील स्थानिक शेतकर्‍यांसाठी सरकारी योजनांची अंमलबजावणी, सिंचनाच्या सुविधा आणि कर्जमाफीसाठी सोनावणे सातत्यपूर्ण पाठपुरावा करीत असतात. एकंदरीत, सर्वच राजकीय पक्षाशी चांगले संबंध. शांत आणि संयमी स्वभावामुळे शरद सोनावणे यांनी राष्ट्रवादीच्या दोन्ही प्रस्थापितांना विधानसभा निवडणुकीत धूळ चारली.
 
 
 
अनिशा डुंबरे
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0