शरद पवारांकडून जयंत पाटलांचा ‘करेक्ट कार्यक्रम’!

03 Dec 2024 12:45:35
Sharad Pawar

मुंबई : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसह शरद पवार ( Sharad Pawar ) गटाचा सुपडासाफ झाला. त्याचे खापर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर फोडले जात असून, त्यांचे पक्षातील महत्त्व कमी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. जितेंद्र आव्हाड यांची गटनेते पदी झालेली निवड हे त्याचेच द्योतक आहे. त्यामुळे येत्या काळात शरद पवार भाकरी फिरवणार, अशा चर्चा जोर धरू लागल्या आहेत.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड, तर मुख्य प्रतोद पदावर रोहित पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जोडीला उत्तम जानकर यांना प्रतोदपदी नेमण्यात आले आहे. वास्तविक जयंत पाटील यांची पक्षातील ज्येष्ठता आणि अनुभव लक्षात घेता त्यांना गटनेते पदी नेमले जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, रोहित पवारांसोबत सुरू असलेल्या शीतयुद्धामुळे पाटलांचा पत्ता कापला गेल्याचे बोलले जात आहे.

लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाला मिळालेल्या जागांचे श्रेय जयंत पाटील यांनी स्वतःकडे ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यावर रोहित पवारांनी नगरमधील जाहीर सभेत आक्षेप घेतल्यामुळे पाटील रागाने लालबुंद झाले. शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार व्यासपीठावर उपस्थित असताना, त्यांनी पक्षांतर्गत कुरघोडींवर जाहीर भाष्य केले. ते म्हणाले, “माझ्या प्रदेशाध्यक्षपदाचे महिने याआधी अनेकांनी मोजून झाले आहेत. आता पुढचे चार महिने मोजू नका. कारण, आता निवडणूक आहे. जाहीरपणे बोलायचे बंद करा. काही तक्रार असेल, तर शरद पवार यांना भेटा. ते आमच्या दोन कानाखाली मारतील, नाहीतर त्यांना योग्य वाटेल तो निर्णय घेतील. फक्त ट्विटरवर वगैरे बोलणे बंद करा,” असे सांगत त्यांनी रोहित पवारांच्या कुरघोडींकडे शरद पवारांसह कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले. तसेच सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

मात्र, लोकसभेत यश मिळवून दिल्याचा दावा करणार्‍या जयंत पाटलांचे विधानसभेला पितळ उघडे पडले. शरद पवार गटाची गाडी दहावर अडकली. त्यामुळे रोहित पवारांनी वचपा काढणे सहाजिक. त्यांनी आजोबांचे कान भरून जयंत पाटलांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ केला. जयंतरावांचा ज्येष्ठत्वाचा मान डावलून जितेंद्र आव्हाड यांना गटनेतेपद देण्यात आले. शिवाय नवख्या रोहित पाटील यांना केवळ आर. आर. आबांचा सुपुत्र म्हणून मुख्य प्रतोद नेमण्यात आले. ही बाब जयंतरावांच्या भलतीच जिव्हारी लागल्याने त्यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची दर्शवल्याची माहिती अंतर्गत सूत्रांनी दिली.

रोहित पवारांना गुदगुल्या

जयंत पाटील यांचे पक्षातील महत्त्व कमी करण्यास सुरुवात झाल्याने रोहित पवारांना गुदगुल्या होऊ लागल्या आहेत. यापुढे पक्षाची धुरा आपल्याकडेच येईल, या खुशीत ते आहेत. त्यामुळेच ते जाहीरपणे प्रतिक्रिया देऊ लागले आहेत. पक्ष संघटनेतील या बदलांबाबत विचारले असता ते म्हणाले की, “शंभर टक्के भाकरी फिरवण्याची वेळ आलेली आहे. शरद पवार आणि जयंत पाटील हे स्वतः त्यामध्ये लक्ष घालतील आणि संघटनेत पुढच्या काही दिवसांत मोठे बदल करतील. हे बदल झाल्यानंतर ज्या-ज्या लोकांना जबाबदारी दिली जाईल ते अजून ताकदीने येणार्‍या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्या निवडणुका ते त्या ठिकाणी मनापासून लढतील असा विश्वास माझ्या सारख्याला वाटतो,” असे रोहित यांनी सांगितले.

Powered By Sangraha 9.0