संजय राठोड साधणार बंजारा तांड्यातील कारभार्‍यांशी संवाद

03 Dec 2024 12:58:42
Sanjay Rathod

मुंबई : बंजारा समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महायुतीने गेल्या काही वर्षांत विशेष प्रयत्न केले. आता त्यांच्या उर्वरित मागण्यांची पूर्तता करण्यासाठी शिवसेना आमदार संजय राठोड यांनी बंजारा ( Banjara ) तांडा भेटीसाठी राज्यव्यापी दौर्‍याचे आयोजन केले आहे. तांड्यावरील कारभारी आणि नाईक यांच्याशी संवाद साधून समाजाच्या २१ मागण्यांपैकी उर्वरित मागण्या नव्या सरकारात मार्गी लागाव्यात यासाठी ते प्रयत्न करणार आहेत.

यासंदर्भात संजय राठोड म्हणाले की, “राज्यात बंजारा समाजाचे पाच हजार तांडे आहेत. तांड्याचे कारभारी व नाईक यांच्याकडून हजारो भेटीची निमंत्रणे आली आहेत. बंजारा समाजाचे उर्वरित प्रश्न नव्या राज्य सरकारात मार्गी लागावेत अशी समाजाच्या नेत्यांची आग्रही मागणी आहे. समाजाचा कल, त्यांचे म्हणणे ऐकण्यासाठी तसेच उर्वरित मागण्या नव्या सरकारामध्ये मार्गी कशा लावता येतील, असा माझा प्रयत्न असणार आहे. त्यासाठी मी बंजारा तांडा भेटीचा राज्यव्यापी दौरा करणार आहे.”

राज्यात दीड कोटी बंजारा लोकसंख्या असून, या समाजाला राजकारणात महत्त्व आहे. हजारो तांड्यामध्ये राहणार्‍या बंजारा समाजाने राज्याला आजपर्यंत दोन मुख्यमंत्री दिलेले आहेत. बंजारा समाजाच्या वर्षानुवर्षे २१ मागण्या होत्या. त्यापैकी ‘गोर बंजारा साहित्य अकादमी’, ‘वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था’ (वनार्टी), मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह, ‘स्वाधार योजने’च्या धर्तीवर ‘आधार योजना’, तांड्यासाठी ग्रामपंचायत, ‘संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजना’, ‘मोदी आवास योजने’त बंजारा समाजाचा समावेश, ‘यशवंतराव मुक्त वसाहत योजने’साठी भरीव तरतूद, ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी वसतिगृह, ऊसतोड कामगारांना विमा, मुंबई तेथे बंजारा भवन तसेच, वनजमिनीचे पट्टे व मालकी हक्क मिळवणे आदी १८ मागण्या मार्गी महायुती सरकारच्या काळात मार्गी लागल्या आहेत.

बंजारा समाजाचे आराध्य दैवत असलेल्या तीर्थक्षेत्र पोहारादेवीच्या विकासासाठी संजय राठोड यांचे प्रयत्न गेले अनेक वर्षे सुरु आहेत. येथील ‘बणजारा विरासत नंगारा म्युझियम’ आणि ‘सेवाध्वजाची स्थापना’ तसेच संत सेवालाल महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण महायुती सरकारमध्ये पार पडले होते.

Powered By Sangraha 9.0