नाशिक : कार्यकर्त्यांच्या अथक मेहनत व परिश्रमामुळेच महायुतीचा महाविजय झाला असल्याचे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे ( Bawankule ) यांनी केले. भारतीय जनता पक्ष वसंतस्मृती कार्यालय, नाशिक येथे नुकत्याच आयोजित कार्यकर्ता संवाद मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ते आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, “विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय अध्यक्ष जयप्रकाश नड्डा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह केंद्रातील नेत्यांच्या झंझावाती सभा व संवाद मेळावे कार्यकर्त्यांबरोबर संपूर्ण महाराष्ट्रात संपन्न झाले. या सभा व संमेलनातून कार्यकर्त्यांना मिळालेला संदेश घराघरापर्यंत पोहचविण्यात आला व त्याचीच परिनिती महायुतीच्या महाविजयात झाली. म्हणूनच भारतीय जनता पक्षाने महाविजय २०२४ संकल्प असा दिलेला नारा कार्यकर्त्यांच्या बळावर सार्थ ठरवला. या विजयाचे खरे श्रेय कार्यकर्त्यांचेच आहे.”
“न भूतो न भविष्यति’ असा विजय मिळवून देत जनतेने विधानसभेवर एकहाती सत्ता मिळवून दिली. लोकसभेत विरोधकांनी कांदा प्रश्न, संविधानाबाबत खोटी विधाने, आदिवासी व दलित बांधवांसह सर्व मागासवर्गीयांची दिशाभूल, महिलांना 8 हजार, ५०० रुपये खटाखट देण्याचे खोटे आश्वासन अशाप्रकारे खोट्या अफवा पसरवून विजय मिळवला. तथापि एका बुथवर त्यावेळी किमान २० मते वाढवली असती, तरी सुद्धा भाजप महायुतीचे ४२ खासदार निवडून आले असते. तो धडा घेऊन आपण सर्वजण विधानसभेत ताकदीने लढलो व ऐतिहासिक विजय मिळविला,” असेही यावेळी बावनकुळे यांनी आपल्या मार्गदर्शनात म्हटले.
आमदार राहुल ढिकले व सीमा हिरे यांच्या विजयाबद्दल त्यांचा सत्कार आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नाशिक महानगराध्यक्ष प्रशांत जाधव यांनी आपल्या भाषणातून लोकसभा निवडणुकीनंतरच्या कालावधीत अहोरात्र महाराष्ट्रभर दौरे करून बुथ कार्यकर्ते संवाद, पदाधिकारी संवाद, सभा, संमेलने या माध्यमातून कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. या मेहनतीचे रुपांतर महाविजयात झाल्याचे प्रशांत जाधव यांनी सांगितले. त्यांनी बावनकुळे यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व नाशिक युवा मोर्चाच्यावतीने त्यांचा गदा देऊन सत्कार केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल केदार यांनी केले, तर आभारप्रदर्शन काशिनाथ शिलेदार यांनी केले. याप्रसंगी भाजप नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव, ग्रामीण जिल्हा अध्यक्ष सुनील बच्छाव, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, आमदार अॅड. राहुल ढिकले, आमदार सीमा हिरे, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, गोविंद बोरसे, माजी आमदार बाळासाहेब सानप, सरचिटणीस सुनील केदार, काशिनाथ शिलेदार, अॅड. शाम बडोदे, युवा मोर्चा अध्यक्ष सागर शेलार, महिला मोर्चा अध्यक्ष सोनाली ठाकरे, अमृता पवार, डॉ. प्रशांत पाटील, पवन भगुरकर, महेश हिरे, सचिन हांडगे, अनिल भालेराव, राजेश दराडे, गणेश ठाकूर, निखील पवार, राहुल कुलकर्णी, सुयोग वाडेकर, शरद कासार व्यासपीठावर उपस्थित होते.त्याचप्रमाणे, चंद्रशेखर पंचाक्षरी, ज्ञानेश्वर काकड, शांताराम घंटे, वसंत उशीर, सुनिल देसाई, भगवान काकड, रविंद्र पाटील, अविनाश पाटील यांसह विविध मोर्चा, आघाड्या, प्रकोष्ठ, बुथ प्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख आदींसह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्तेदेखील यावेळी उपस्थित होते.
मनपातही प्रचंड बहुमताने विजय मिळविणार
“जिल्हाध्यक्षांचा कार्यकाळ हा तीन वर्षांचाच असून येत्या महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका सध्याच्या विद्यमान जिल्हाध्यक्षांसह नाशिक महानगराध्यक्ष प्रशांत जाधव यांच्या नेतृत्वाखालीच होतील,” असे सुतोवाच प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. विधानसभेप्रमाणेच प्रचंड बहुमताने महापालिका व ‘स्थानिक स्वराज्य संस्था’ निवडणुकांमध्ये यश मिळविणार असल्याचेही बावनकुळे यावेळी म्हणाले.
बावनकुळे म्हणाले..!
महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक बुथवर लक्ष केंद्रित करून मतदानात वाढ केली व म्हणूनच राज्यात भाजप महायुतीचा विजय अतिशय सुकर झाला. आगामी निवडणुकांसाठीही आम्ही सज्ज आहोत.
गुरूवार, दि. ५ डिसेंबर रोजी ५ वाजता मुंबईत आझाद मैदानावर जल्लोषात भाजप महायुतीचा मुख्यमंत्री शपथ घेणार आहे. त्याकरिता राज्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी व लोकप्रतिनिधींना शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रित केले आहे.
लाडक्या बहिणी, शेतकरी, युवा वर्ग, व्यापारी, उद्योजक सर्वांनीच महायुतीला भरभरून मते दिल्याबद्दल राज्यातील जनतेचे आभार.
आगामी मनपा, जिल्हा परिषद, पंचायत समिती इ. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकविण्यासाठी तयार राहा.
आगामी काळात मंडल स्तर ते केंद्र अशा पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका होणार असून, प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान ५० हजार प्राथमिक सदस्य नोंदणी केली पाहिजे.
नाशिक जिल्ह्यातील १५ पैकी १४ विधानसभा मतदारसंघात महायुतीने विजय मिळविल्याबद्दल सर्वांचे मनापासून अभिनंदन. महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहणारे सर्वच्या सर्व रथी महारथी पराभूत झाले आहेत.