शिवशाही धावणारच ! एसटी महामंडळाचा खुलासा

03 Dec 2024 12:33:20

shivshahi
मुंबई, दि.३ : प्रतिनिधी वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर एसटी प्रशासनाने शिवशाही बसची सेवा थांबविण्याचा निर्णय घेतल्याच्या वृत्ताचे एसटी महामंडळाकडून खंडन करण्यात आले आहे. मात्र शिवशाही बस गाड्यांमध्ये कोणतेही तांत्रिक दोष असल्याचे निष्पन्न झालेले नसून या गाड्या ताफ्यात धावणार असल्याची माहिती राज्य परिवहन महामंडळाने दिली आहे.
दरम्यान, शिवशाही बसच्या अंतर्गत व बाह्य रचनेत आवश्यक तो बदल केला जाणार असून त्याचे रूपांतर साध्या अर्थात 'लालपरी' बसमध्ये होणार असल्याची माहिती समोर आली होती. अलीकडेच गोंदिया येथे शिवशाही बसच्या अपघातात ११ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. यापूर्वीदेखील शिवशाही बसचे अपघात झाले होते. वारंवार तक्रारी वाढल्याने एसटी प्रशासनाच्या वाहतूक विभागाने शिवशाहीला सेवेतून काढून टाकण्याचा प्रस्ताव दिला असून येत्या काही महिन्यातच शिवशाहीचा प्रवास संपणार असल्याची माहिती समाजमाध्यमांत आली होती. मात्र याबाबत एसटी महामंडळाने खुलासा केला आहे.
एसटी महामंडळाने माहिती दिली की, एसटी महामंडळाच्या ताफ्यात सध्या ७९२ शिवशाही या वातानुकूलित बसेस आहेत. त्यामध्ये कोणताही तांत्रिक दोष नाही. तसेच सदर बसेस या बंद करण्याचा एसटी महामंडळाचा कोणताही विचार असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली आहे.
Powered By Sangraha 9.0