मुंबई, दि.३: प्रतिनिधी म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे अत्यल्प, अल्प व मध्यम उत्पन्न गटाकरिता प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावरील घरांच्या विक्रीसाठी विशेष मोहीम राबविली जाणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत विरार-बोळींज, खोणी-कल्याण, शिरढोण-कल्याण, गोठेघर-ठाणे, भंडार्ली-ठाणे येथे ही घरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. घरांच्या विक्रीत वाढ व्हावी व या गृहनिर्माण प्रकल्पांतील सदनिकांबाबत सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी दि. ०२ ते ११ डिसेंबरया कालावधीत व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे, अशी माहिती कोंकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी दिली.
गायकर म्हणाल्या की, मंडळातर्फे राबविल्या जाणार्या या मोहिमेअंतर्गत म्हाडा कोकण मंडळातर्फे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावरील विक्रीसाठी उपलब्ध सदनिकांबाबत सर्वसामान्य नागरिकांना माहिती देणे व ऑनलाइन अर्ज नोंदणी, ऑनलाइन अर्ज सादर करण्याबाबत मार्गदर्शनासाठी ठिकठिकाणी २९ स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. या स्टॉल्सवर मंडळाचा एक कर्मचारी नियुक्त करण्यात आला आहे. सर्वसामान्यांसाठी उपलब्ध असलेल्या सदनिकांची माहिती सामान्य जनतेला व्हावी यासाठी ठिकठिकाणी माहितीपत्रक वाटप व पथनाट्य सादरीकरण केले जात आहे. विविध महानगरपालिका कार्यालये, रेल्वे स्थानके, जिल्हाधिकारी कार्यालय, चर्च, मंदिरे या ठिकाणी हे स्टॉल्स लागणार आहेत.
योजनांचा तपशील
विरार बोळींज - १७४ (पीएमवाय)
विरार बोळींज - ४१६४
खोणी-कल्याण - २६२१ (पीएमवाय)
शिरढोण-कल्याण- ५७७४ (पीएमवाय)
गोठेघर-ठाणे- ७०१ (पीएमवाय)
भंडार्ली-ठाणे- ६१३ (पीएमवाय)