राजकारण साध्य करण्यासाठी काहीही!

27 Dec 2024 21:33:27
churchill secret weapon
(ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांची सून पामेला आणि रुझवेल्ट यांचा युरोपीय देशांसाठीचा विशेष दूत अ‍ॅव्हरेल हॅरिमान)

एखाद्या देशाचा खुद्द पंतप्रधान आपला देश युद्धात जिंकावा म्हणून खुद्द आपल्या सुनेला ‘वापरू’ शकतो. मग त्याच देशाचा व्हॉईसरॉय आपल्या बायकोचा ‘वापर’ का करू शकणार नाही?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये कार्यकर्ता निर्मितीची कार्यपद्धती म्हणून सतत काहीतरी कार्यक्रम चालू असतात. दैनंदिन शाखेवरचे खेळ, कवायत, व्यायाम, कथाकथन, गीतगायन, बौद्धिक मुक्तचिंतन हे तर झालेच. शिवाय उत्सव, साप्ताहिक मीलन, मासिक मीलन, मासिक बौद्धिक वर्ग, मासिक निवासी वर्ग, दिवाळी वर्ग, हेमंत शिबीर, उन्हाळी संघ शिक्षा वर्ग, चंदनाचा कार्यक्रम, रक्तचंदनाचा कार्यक्रम, असे काही ना काही उपक्रम सतत वर्षभर चालूच असतात. स्वयंसेवक पुनःपुन्हा एकत्र येत असतात. घुसळण होत असते. यातूनच कार्यकर्ता हळूहळू घटत जात असतो.

यापैकी सहा ठरलेल्या उत्सवांना स्थानिक पातळीवरचा एखादा वजनदार माणूस अध्यक्ष म्हणून बोलवावा, असा संकेत आहे. अनेकदा असा माणूस हिंदुत्वविरोधी सुद्धा असतो. पण, त्याची हरकत नसल्यास त्याला अध्यक्ष म्हणून बोलावले जाते. यामागे अनेक उद्देश असतात. एकदा मी स्वतःच एका उत्सवाचा प्रमुख वक्ता होतो. स्थानिक शाखा कार्यवाहाने मला आधी कल्पना दिली की, आपले आजचे अध्यक्ष हे एक स्थानिक राजकीय कार्यकर्ते आहेत. त्यांचा पक्ष हिंदुत्वविरोधी आहे. पण, हे कार्यकर्ते तडफदार आहेत. लोकांची कामे करतात. त्यांच्या पक्षाच्या अन्य नेत्यांपेक्षा तुलनेने कमी भ्रष्ट आहेत.

मी त्या दिवशीच्या भाषणात ‘आर्य चाणक्य आणि त्यांचे प्रशासन’ असा सर्वसाधारण विषय मांडला. आर्य चाणक्यांनी अडीच हजार वर्षांपूर्वी लिहून ठेवलेली अनेक मार्गदर्शक तत्त्वे आजही कशी चिरंतन आहेत, कालबाह्य ठरलेली नाहीत, याची अनेक उदाहरणे देताना मी काही घटनाही सांगितल्या. बोलण्याच्या ओघात मी म्हटले, “आज आपण प्रशासकीय अधिकारी असू वा नसू, राजकीय कार्यकर्ता असू वा नसू, परंतु संघ स्वयंसेवक या नात्याने आपण सार्वजनिक, सामाजिक कार्यकर्ते नक्कीच आहोत. तेव्हा आचार्यांनी प्रशासकीय अधिकार्‍यांसाठी, सत्ताधार्‍यांसाठी घालून दिलेले एक महत्त्वाचे मार्गदर्शक तत्त्व आपणही पक्के लक्षात ठेवले पाहिजे, सतत जपले पाहिजे. ते म्हणजे, ‘स्त्रिय:पानम् च वर्जयेत्’- ‘स्त्रिया आणि मद्यपान वर्ज्य करा.’

संघाच्या उत्सवात इतर सर्व गोष्टींप्रमाणेच ‘वक्त्याचे चहापान’ हा एक महत्त्वाचा कार्यक्रम असतो. स्थानिक संघ स्वयंसेवक, वक्ता, अध्यक्ष यांच्या अनौपचारिक गप्पा या कार्यक्रमात होत असतात. वर उल्लेख केलेल्या भाषणानंतर चहा पिताना अध्यक्ष मला म्हणाले, “शिक्षक, मला ओळखलंत का?” संघामध्ये सगळेच जण एकमेकांना नावापुढे ‘जी’ हे उपपद लावून सन्मानाने संबोधतात. पण, जर कुणी कुणाला ‘शिक्षक’ म्हणजे म्हटले, तर त्याचा अर्थ असा असतो की, शाखेवर, शिबिरात, वर्गात कुठेतरी ते दोघे जण शिक्षक आणि शिक्षार्थी म्हणून एकत्र आले असले पाहिजेत.

मी अर्थातच त्यांना ओळखले नव्हते. मग त्यांनी मला खाणाखुणा सांगितल्या की, “अमक्या हेमंत शिबिरात तुम्ही आमचे गण शिक्षक होतात. मी त्यावेळी अमक्या नगरातला स्वयंसेवक होतो इत्यादी.” मग आता कुठे असतो, काय करतो, याबरोबरच अपरिहार्यपणे प्रश्न आला की, हिंदुत्वविरोधी राजकीय पक्षामध्ये का गेलात? यावर ते नुसतेच हसले. मीदेखील फार ताणून धरले नाही. ‘कुठेही राहा, मनात हिंदुत्व जागे ठेवा,’ एवढे म्हटले आणि जवळच्या रेल्वे स्थानकाकडे निघालो. तेवढ्यात अध्यक्ष माझ्या अगदी जवळ येऊन खासगी आवाजात मला म्हणाले, “शिक्षक, मला माफ करा. पण, तुम्ही आर्य चाणक्यांचं जे सूत्र मघाशी सांगितलंत, ते मला कुठे तरी टोचलं. अहो, स्त्रिया आणि मद्यपान वर्ज्य करा, तर मग काय करा? अहो, या गोष्टींसाठी तर माझ्यासारखे लोक राजकारणात येतात आणि या गोष्टी आम्हाला हिंदुत्वविरोधी पक्षातच मन:पूत करता येतात. पण, असो. मी लक्षात ठेवीन.”

आता या किश्श्यातले तात्पर्य फक्त लक्षात ठेवा आणि एका विलक्षण घटनाक्रमाकडे पाहा. पामेला डिग्बी ही 19 वर्षांची सुंदर तरुणी लंडनच्या ‘फॉरिन ऑफिस’मध्ये म्हणजे परराष्ट्र खात्याच्या सचिवालयात फ्रेंच ते इंग्रजी भाषांतरकार म्हणून नोकरी करू लागली. ब्रिटिश फॉरिन ऑफिस हे अत्यंत प्रतिष्ठित आणि त्याहीपेक्षा संवेदनशील राजकीय घटनांचा केंद्रबिंदू होते. तिथे कुणा मध्यमवर्गीय, कारकुनी पेशातल्या वगैरे लोकांना प्रवेशच नसे. पामेला डिग्बी साधी भाषांतरकार कारकून असली, तरी तिचा बाप एडवर्ड डिग्बी हा ‘बॅरन’ म्हणजे उमराव होता. ब्रिटिश राजदरबारात उमरावांच्या ‘काऊंट’, ‘व्हायकाऊंट’, ‘ड्यूक’, ‘बॅरन’ अशा वेगवेगळ्या श्रेणी आहेत. ते 1939चे साल होते. कोणत्याही क्षणी अ‍ॅडॉल्फ हिटलर युरोपात महायुद्ध पेटवणार, हे जाणत्यांना स्वच्छ दिसत होते आणि ब्रिटनचा तत्कालीन शांतताप्रिय पंतप्रधान नेव्हिल चेंबर्लेन हा ते युद्ध टाळण्यासाठी जिवाचा आटापिटा करत होता. विन्स्टन चर्चिल यावेळी सत्तारूढ पक्षामध्ये नव्हता. पण, युद्ध अटळ आहे आणि एकदा ते सुरु झाल्यावर ब्रिटनचे पंतप्रधानपद आपल्याचकडे येणार, हे द्रष्ट्या चर्चिलला स्पष्टपणे दिसत होते. त्यामुळे एकदा आपण सत्तारूढ झालो की, हिटलरपासून ब्रिटनचे आणि एकंदरीतच युरोपचे रक्षण कसे करायचे, याच्या सैनिकी आणि राजकीय योजना आखण्यात तो पूर्णपणे बुडून गेला होता.

यावेळी त्याचा 28 वर्षांचा मुलगा रँडॉल्फ चर्चिल हा काय करत होता? मोठ्या बापांची वाह्यात पोरे जे करतात, तेच म्हणजे जुगार खेळणे, दारू पिणे आणि पोरी फिरवणे, तर एवंगुणविशिष्ट रँडॉल्फ महाशयांच्या दृष्टीला बॅरन डिग्बीची पोरगी पामेला ही पडली. आता झाले होते असे की, अनेक लफडी करून रँडॉल्फ कंटाळला होता. वय 28 झाले होते. आता लग्न करून स्थिर व्हावे, असे त्याला वाटू लागले. पण, आश्चर्य म्हणजे ‘ड्यूक ऑफ मार्लबरो’च्या या विद्यमान होतकरू वारसाला एका पाठोपाठ एक आठ मुलींनी नकार दिला. पामेलाने मात्र त्याला होकार दिला. झटपट लग्न झाले. वर्षभरातच एक मुलगा झाला. त्याचवेळी एका पोटनिवडणुकीत विजयी होऊन रँडॉल्फ खासदार झाला.

पण, आता घटना कमालीच्या वेगाने घडत होत्या. दुसरे महायुद्ध धडाडून पेटले होते. पंतप्रधान बनलेला विन्स्टन चर्चिल नवनव्या युद्ध योजना आखणे आणि यांची धडाक्याने कार्यवाही करवून घेणे, यात कमालीचा व्यस्त होता. त्याची बायको क्लेमंटाईन आणि सून पामेला यादेखील त्याला लागेल ती मदत करत होता, तर रँडॉल्फ हा ब्रिटिश कमांडो दलात भरती होऊन इजिप्तमध्ये गुप्त कामगिरीवर रवाना झाला होता.

विन्स्टन चर्चिलला स्पष्टपणे असे दिसत होते की, हिटलरचा झंझावात रोखणे एकट्या ब्रिटनला अशक्य आहे. पहिल्या महायुद्धाप्रमाणेच अमेरिका यात उतरली, तरच आशा आहे, अन्यथा हिटलर जिंकणार. ही गोष्ट तो पुनः पुन्हा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष फ्रेंकलिन रूझवेल्ट याला पटवू पाहात होता. पण, रूझवेल्टचा सत्ताधारी डेमोक्रॅटिक पक्ष आणि विरोधी रिपब्लिकन पक्ष यामधील फार मोठ्या संख्येने खासदारांचे मन विरुद्ध होते. ‘युरोपच्या घाणेरड्या राजकारणात आम्ही का पडावे? युरोपच्या रणांगणावर आम्ही आमची तरुण पोरं मरायला का पाठवावीत?’ असे त्यांचे ठाम प्रतिपादन होते. रूझवेल्ट त्यांच्या विरुद्ध जाऊ शकत नव्हता. रूझवेल्टच्या अतिशय विश्वासातला लंडनमधला राजदूत हॅरी हॉपकिन्स हादेखील याच मताचा होता. चर्चिल स्वतः प्रत्येक प्रकारे रूझवेल्टला युद्धात उतरण्यासाठी मनवत होताच. पण, हॉपकिन्सने सुद्धा जर चर्चिलच्या मताला दुजोरा दिला, तर विरोधी लॉबी हळूहळू विरघळली असती. पण, हे कसे घडावे?

सापडला. चर्चिलला उपाय सापडला. चर्चिलच्या 21 वर्षांच्या सुनेने, पामेलाने 51 वर्षांच्या हॉपकिन्सला पटवला. अगदी ‘10, डाऊनिंग स्ट्रीट’ या पंतप्रधान निवासातच पंतप्रधानांची सून आणि अमेरिकन राजदूत यांचे प्रकरण रंगले. परिणाम अगदी चर्चिलला हवा तसा घडला, हॉपकिन्सचा युद्धविरोध पूर्णपणे मावळून तो रूझवेल्टला, अमेरिकेने युद्धात उतरणे व्यापारीदृष्ट्या कसे फायद्याचे आहे, हे पटवून देऊ लागला. धंद्यात फायदा म्हटल्यावर विरोध करणारे खासदार पण हळूहळू नरमत चालले.

आता पुढचा नंबर लागला अ‍ॅव्हरेल हॅरिमान याचा. हॅरिमान हादेखील रुझवेल्ट यांचा युरोपीय देशांसाठीचा विशेष दूत होता. अमेरिकन सरकारने युद्धमान राष्ट्रांसाठी ‘लेन्ड-लीझ’ नावाचे धोरण आखले. युरोपीय राष्ट्रांना अमेरिका अन्नधान्य, कपडा, हत्यारे, वाहने सर्व काही माफक व्याज दराने पुरवेल. कर्ज परतफेड सावकाश करा. मात्र, त्या-त्या देशाच्या भूमीवर किंवा समुद्रात अमेरिका म्हणेल तिथे तिला सैनिकीतळ उभारू द्यावा, असे हे धोरण होते. चर्चिलला या धोरणाद्वारे संमत झालेल्या रकमेतला सर्वात मोठा वाटा हवा होता. पामेला चर्चिल कामाला लागली. 21 वर्षांची पामेला आणि 50 वर्षांचा हॅरिमान. परिणाम, हॅरिमानचे अमेरिकेतले मदतनीस गोंधळून गेले की, मदत निधीतली जास्तीत जास्त रक्कम ब्रिटनकडे वळविण्यात हॅरिमान साहेब एवढे आग्रही का? तब्बल 40 कोटी 20 लक्ष डॉलर्स (आजच्या किमतीत नऊ हजार कोटी) किमतीचे अन्नधान्य आणि शस्त्रास्त्रे एकट्या ब्रिटनला मिळाली.

‘कोलंबिया ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस’ उर्फ ‘सीबीएस’ ही ख्यातनाम अमेरिकन रेडिओ कंपनी होती. एड मरो हा ‘सीबीएस’चा युद्ध वार्ताहर रोज युरोपातल्या विविध रणभूमींवरून युद्धाचे समालोचन करायचा आणि लक्षावधी अमेरिकन श्रोते न चुकता तो कार्यक्रम ऐकायचे. युद्ध समालोचन करावे तर ते एड मरोनेच, इतकी अफाट लोकप्रियता त्या कार्यक्रमाला आणि एड मरोच्या आवाजाला, शैलीला मिळाली होती. चर्चिलने आपले पामेला रूपी मोहजाल एड मरोवर पण फेकले. मग एडच्या बातमी पत्रांमधून पुनः पुन्हा, नाझींनी युरोपात कसा उच्छाद मांडला आहे नि सर्वसामान्य माणसाच्या बचावासाठी अमेरिकेने सर्व शक्तिनिशी युरोपला मदत करणे कसे आवश्यक आहे, हे पुनः पुन्हा येऊ लागले. अमेरिकन जनमानस टोकाच्या युद्धविरोधाकडून पूर्णपणे युद्ध अनुकूल होत गेले.

आता विचार करून पाहा. एखाद्या देशाचा खुद्द पंतप्रधान आपला देश युद्धात जिंकावा म्हणून खुद्द आपल्या सुनेला ‘वापरू’ शकतो. मग त्याच देशाचा व्हॉईसरॉय आपल्या बायकोचा ‘वापर’ का करू शकणार नाही? या अमूक देशाला नाईलाजाने स्वातंत्र्य द्यावे लागत आहे. मग ते देण्यापूर्वी त्या देशाला शक्य तितका खंडित, विभाजित करून ठेवायचा आहे. पण, त्या देशाचे नेते कदाचित याला तयार होणार नाहीत. मग गरज पडल्यास व्हॉईसरॉयची बायको वापरा, पण विभाजन घडवा. राजकारणासाठी काहीही! येतंय का लक्षात?

Powered By Sangraha 9.0