काँग्रेस म्हणजे नवी मुस्लीम लीग; भाजपचा हल्लाबोल

27 Dec 2024 15:15:19
Congress

नवी दिल्ली : काँग्रेसच्या ( Congress ) बेळगाव येथे होत असलेल्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या पोस्टर्समध्ये पाकव्याप्त काश्मीरला भारताचा भाग दाखवण्यात आलेला नाही. त्यावरून काँग्रेस म्हणजे नवी मुस्लीम लीग असल्याचा टोला भाजपने लगावला आहे.

कर्नाटकातील बेळगाव येथे गुरुवार, दि. २६ डिसेंबर रोजीपासून काँग्रेस कार्यसमितीची दोन दिवसीय बैठक होत आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी शहरात विविध ठिकाणी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि खा. प्रियांका गांधी-वाड्रा यांची छायाचित्रे असलेली पोस्टर्स लावली आहेत. मात्र, या पोस्टर्समध्ये असलेला भारताचा नकाशा हा विकृत पद्धतीने दाखविण्यात आला आहे. या पोस्टर्समध्ये पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग दाखविण्यात आलेला नाही.

या मुद्द्यावरून भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी काँग्रेसवर टीकेची झोड उठविली आहे. मालवीय म्हणाले की, “काँग्रेस म्हणजे नवी मुस्लीम लीग असून त्यांना पुन्हा भारताचे विभाजन करायचे आहे. बेळगाव येथील आपल्या कार्यक्रमात काँग्रेसने आपल्या सर्व होर्डिंग्जवर भारताचा विकृत नकाशा दाखवला आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका वाड्रा यांच्या छायाचित्रांसह काश्मीर पाकिस्तानचा भाग म्हणून दाखवले आहे. ही चूक असू शकत नाही. हा काँग्रेसच्या लांगूलचालनाचा एक भाग असून त्यांच्या मते भारतीय मुस्लिमांच्या निष्ठा पाकिस्तानसोबत आहेत. सोनिया गांधी या जॉजर्र् सोरोसद्वारे वित्तपुरवठा होणार्‍या ‘फोरम ऑफ डेमोक्रॅटिक लीडर्स इन एशिया पॅसिफिक फाऊंडेशन’च्या सहअध्यक्षा आहेत. त्यामुळे त्यांच्याद्वारे काश्मिरी स्वातंत्र्याचा पुरस्कार करणे स्वाभाविक आहे,” असे टीकास्त्र मालवीय यांनी सोडले आहे.

Powered By Sangraha 9.0