मुंबई : बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी माझ्या जवळचा असला तरी त्याला सोडले जाऊ नये, अशी प्रतिक्रिया अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. धनंजय मुंडे यांनी गुरुवार, २६ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली.
त्यानंतर माध्यमांशी बोलताना मंत्री धनंजय मुंडे म्हणाले की, "संतोष देशमुखांची ज्यांनी हत्या केली त्यांना शासन होऊन ते फासावर गेले पाहिजे, असे माझे मत आहे. ते माझ्या जिल्ह्यातील सरपंच असून मलाही त्यांचा आदर आहे. त्यामुळे यात जो कुणी गुन्हेगार असेल त्याला फाशीची शिक्षा व्हायला हवी. अगदी तो माझ्या जवळचा असला तरीसुद्धा त्याला सोडायचे नाही. राजकारणापोटी माझ्यावर आरोप करण्यामागे काय राजकारण आहे हे समजू शकतो."
हे वाचलंत का? - पूंछ येथील अपघातात राज्यातील दोन जवानांचा मृत्यू! राज्य सरकारकडून एक कोटींची मदत जाहीर
या घटनेत वाल्मिक कराड हा गुन्हेगार असून तो धनंजय मुंडेंच्या जवळचा असल्याचा आरोप भाजप नेते सुरेश धस यांच्यासह विरोधकांनी केला आहे. यावर बोलताना मुंडे म्हणाले की, "वाल्मिक कराड यांची जवळीक सुरेश धस यांच्यासोबत होती. माझ्याशीही त्यांची जवळीक आहेच. त्यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याचीही चौकशी पोलिस करत आहेत. ही चौकशीसुद्धा अतिशय पारदर्शी पद्धतीने व्हायला हवी. शासन कुणालाही पाठीशी घालत नाही. पण मला आणि माझ्याविरोधात सकाळी बोलल्याशिवाय एखाद्याचा दिवस उजाडत नाही. माध्यमांमध्ये माझे नाव खराब करण्यासाठी सगळे सुरु आहे. या प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी व्हायला हवी. हे खुनाचे प्रकरण भयंकर असून फास्टट्रॅक कोर्टात खटला चालला पाहिजे," अशी मागणीही त्यांनी केली.