ताडोबातील गिधाडाचे तामिळनाडूपर्यत ४,००० किमीचे स्थलांतर; महाराष्ट्रानंतर 'या' पाच राज्यामधून केला प्रवास

25 Dec 2024 08:17:47
tadoba vulture




मुंबई (अक्षय मांडवकर) -
'बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'ने (बीएनएचएस) 'जीपीएस टॅग' लावून चंद्रपूरातील 'ताडोबा व्याघ्र प्रकल्पा'त सोडलेल्या गिधाडाने तामिळनाडू गाठले आहे (tadoba vulture). पाच राज्यांमधून किमान ४ हजार किलोमीटरचा प्रवास करुन 'एन ११' असा सांकेतिक क्रमांक असलेले हे गिधाड तामिळनाडूतील कलसपाक्कम तालुक्यात पोहोचले आहे. (tadoba vulture)
  
देशातून नामशेष होण्याच्या वाटेवर असणाऱ्या गिधाडांच्या संवर्धनासाठी 'बीएनएचएस' गेल्या कित्येक वर्षांपासून काम करत आहेत (tadoba vulture). याअंतर्गत हरिणायातील पिंजोर येथे 'बीएनएचएस'ने गिधाड प्रजनन केंद्र उभारले आहे. या केंद्रात प्रजनन करण्यात आलेली एकूण २० गिधाडे ही जानेवारी महिन्यात ताडोबा आणि पेंच व्याघ्र प्रकल्पात स्थानांतरित करण्यात आली होती. ताडोबात १० पांढऱ्या पुठ्ठ्याची गिधाडे आणि पेंचमध्ये १० लांब चोचीची गिधाडे हलवण्यात आली. त्यांना याठिकाणी उभारण्यात आलेल्या जटायू संवर्धन केंद्रामध्ये ठेवण्यात आले होते. यामधील १० पांढऱ्या पुठ्ठ्याच्या गिधाडांंना 'जीपीएस टॅग' लावून ३ आॅगस्ट रोजी ताडोबामधील नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले होते. यामधील 'एन-११' या मादी गिधाडाला सोडल्यानंतर तिने ताडोबा ते छत्तीसगड, छत्तीसगड ते गुजरात आणि आणि गुजरात ते तामिळनाडू असा प्रवास केला आहे.
 
आॅगस्ट महिन्यात या गिधाडाला सोडल्यानंतर त्याने २०० किमी अंतर कापून छत्तीसगडमधील नारायणपूर गाठले. अशक्त वाटल्याने त्याठिकाणी त्याला पकडून त्याच्यावर उपचार करुन २६ सप्टेंबर रोजी पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. त्यानंतर जवळपास ६०० किमी अंतर कापत १९ आॅक्टोबर रोजी या गिधाडाने गुजरात गाठले. यादरम्यान त्याने महाराष्ट्रातील नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव, धुळे या जिल्ह्यांमधून उड्डाण केले. २० आॅक्टोबर रोजी सकाळी ८.२५ वाजता गुजरात-महाराष्ट्राच्या सीमेवरील उच्छल तालुक्यातील जामली गावात हे गिधाड जमिनीवर पडलेले सापडले. त्याठिकाणी त्याच्यावर उपचार करुन पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. त्यानंतर या गिधाडाने महाराष्ट्र, कर्नाटक, आंधप्रदेश आणि तामिळनाडू या राज्यातून प्रवास केला आहे.
असा केला प्रवास
गुजरातमधून निघाल्यानंतर या गिधाडाने महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर असा प्रवास करुन कर्नाटकात प्रवेश केला. नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये हे गिधाड बरेच फिरल्याची माहिती 'बीएनएचएस'च्या 'काॅन्झर्वेशन ब्रिडिंग' तज्ज्ञ काझवीन उमरीगर यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली. कर्नाटकातील 'कोलार गोल्ड फिल्ड' येथे एक दिवस थांबून त्याने आंधप्रदेशमार्गे तामिळनाडूमध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले. २३ डिसेंबर रोजी सायंकाळी ४.३५ वाजता या गिधाडाच्या अस्तित्वाचे संकेत तामिळनाडूमधील तिरुवन्नमलाई जिल्ह्यातील कलसपाक्कम तालुक्यातून मिळाले आहेत.

'एन-११' या गिधाडाच्या ताडोबा ते गुजरात या स्थलांतरादरम्यान आम्हाला त्याला दोन वेळा पकडून पुन्हा सोडावे लागले होते. मात्र, गुजरात ते तामिळनाडूच्या प्रवासादरम्यान आम्हाला त्याला एकदाही पकडावे लागलेले नाही. याचा अर्थ या प्रवास त्याने सुकररित्या केला आहे. गुजरात ते तामिळनाडूच्या प्रवासादरम्यान त्याने २ हजार ८६४ किमी अंतर कापले आहे. - किशोर रिठे, संचालक, बीएनएचएस
Powered By Sangraha 9.0