राजकारण करण्यासाठी राहुल गांधींचा परभणी दौरा

24 Dec 2024 16:48:56
Rahul Gandhi and Pundage

परभणी : “गांधी घराण्याने आणि काँग्रसने नेहेमीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा दुस्वास केला आहे. आजही काँग्रेसचे नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi ) हे परभणीत आले. ते सोमनाथ सूर्यवंशी तसेच जेष्ठ नेते विजय वाकोडे यांच्या घरी गेले. मात्र, जिथे संविधानाच्या प्रतिकृतीचा अपमान झाला, तिथे ते गेले नाहीत. हा एक प्रकारे समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. त्यांचा दौरा हा आमच्या मागास समाजाच्या न्यायहक्कांसाठी नव्हता, तर परभणी प्रकरण दडपण्यासाठी आणि राजकारण करण्यासाठी आहे,” असा घणाघाती आरोप समाज अभ्यासक आणि दलित चळवळीचे धडाधडीचे कार्यकर्ते परभणीतच राहणारे नागसेन पुंडगे यांनी केला आहे.

राहुल गांधीच्या परभणी दौर्‍याबाबत बोलताना ते म्हणाले की, “परभणीमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली. तेव्हा आम्ही सगळे समाजबांधव शांततेने आंदोलन करत होतो. मात्र, महाविकास आघाडीतील शरद पवार गटाच्या खा. फौजिया खान आणि उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे खा. संजय जाधव यांनी घटनेसंदर्भात वक्तव्ये केली. या दोघांच्या वक्तव्यानेच समाजातील काही लोकांना चिथावणी मिळाली आणि परभणीमध्ये हिंसाचार घडला. त्यामुळे परभणीमध्ये झालेल्या हिंसेला महाविकास आघाडीचे खासदाराच जबाबदार आहेत. परभणी हिंसाचाराचे सूत्रधार उघड होऊ नये, म्हणून राहुल गांधींनी दौरा करून समाजाचे लक्ष विचलित केले असे वाटते,” असेही त्यांनी नमूद केले.

Powered By Sangraha 9.0