नवी दिल्ली : भाजपने सोमवार, दि. २३ डिसेंबर रोजी राष्ट्रीय राजधानीत सत्ताधारी आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुख अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सरकारविरोधात ‘आरोपपत्र’ जारी केले. भाजपने भ्रष्टाचार आणि यमुना प्रदूषणासह ( AQI ) अनेक मुद्द्यांवरून ‘आप’ला लक्ष्य केले आहे.
दिल्ली विधानसभा निवडणूक तोंडावर आली असून सर्वच पक्षांच्या तयारीस जोर आला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने सत्ताधारी ‘आप’ सरकारविरोधात आरोपपत्र जारी करून आपल्या प्रचाराचा नारळ फोडला आहे. दिल्ली प्रदेश भाजपच्या कार्यालयात माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार अनुराग ठाकूर, दिल्ली प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेव यांच्यासह पक्षाचे नेते उपस्थित होते. माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, “आप’ सरकारने दिल्लीतील शाळांना जागतिक दर्जाचे बनवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, दोन लाखांहून अधिक अधिक विद्यार्थी अजूनही शिक्षणापासून वंचित आहेत. केजरीवाल यांनी २४ तास स्वच्छ आणि मोफत पाणी देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, आज हजारो कुटुंबांना पैसे खर्च करून टँकरमधून पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्यांनी दिल्लीत मोफत दवाखाने आणि मोठी रुग्णालये उभारण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, आज ७० टक्के रुग्णांना एक्यूआय पातळी ओलांडल्यानंतर खासगी रुग्णालयात उपचार घेणे भाग पडले आहे. पूर्वांचलमधील लोक यमुनेच्या तीरावर छठपूजा भक्तिभावाने आणि धार्मिक विधी करत असत. मात्र, आता केजरीवाल सरकारने यमुना प्रदूषणावर उपाय न केल्याने उत्सव साजरा करणे बंद झाले आहे. दिल्लीचा एक्यूआय ५०० पार झाला असतानाही ‘आप’ सरकार भ्रष्टाचारात मश्गूल आहे,” असा टोलाही ठाकूर यांनी लगावला.
दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेव यांनी केजरीवाल यांच्यावर आरोप करत म्हटले की, “लोकांना शिक्षण आणि आरोग्याचे स्वप्न दाखवणार्या केजरीवाल यांनी दारू घोटाळ्याचे काम केले आहे. ते म्हणाले की, ईशान्य दिल्लीतील दंगलीचा डाग अजूनही आठवणीतून हटलेला नाही. या दंगलीत आयबी अधिकारी अंकित शर्मा यांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. केजरीवाल यांच्यावर अंकित शर्माच्या हत्येचा आरोप असलेले ताहिर हुसेन हे आम आदमी पक्षाचे नगरसेवक होते,” याचीही आठवण सचदेव यांनी करून दिली.