पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा वारसा!

23 Dec 2024 21:29:39
dr kalpana shivaji sargar
 

शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटवणार्‍या धनगर समाजाच्या डॉ. कल्पना शिवाजी सरगर. त्यांच्या आयुष्याचा, विचारकार्याचा प्रवास मांडणारा हा लेख...

"कल्पना, बेटा तू डॉक्टर झालीसच.” नामदेव बाबांच्या बोलण्याने कल्पना यांना आनंदाश्रू आवरता आले नाहीत. प्रा. कल्पना यांनी ‘एज्युकेशन अ‍ॅज अ‍ॅन एम्पॉवरिंग एजन्सी इन आफ्रिकन-अमेरिकन अ‍ॅण्ड दलित ऑटोबायोग्राफी - अ कॉम्परिटिव्ह स्टडी’ या विषयावर ‘डॉक्टरेट’ केली आणि त्यांच्या नावापुढे ‘डॉक्टर’ ही उपाधी लागली. लेकीच्या नावापुढे ‘डॉक्टर’ उपाधी लागली म्हणून नामदेव बाबांचे काळीज सुपाएवढे झाले. नामदेव बाबांना आणि स्वत: कल्पना यांनाही आनंद होणे साहजिकच. कारण, कल्पना यांचे लहानपणापासूनचे स्वप्न होते की, त्यांनी डॉक्टर व्हावे. मात्र, परिस्थितीने आणि नशिबाने असे वळण घेतले की, त्यांना वैद्यकीय डॉक्टर होता आले नाही. मात्र, शिक्षण पूर्ण करून ‘डॉक्टरेट’ मिळवून त्या ‘डॉक्टर’ झाल्या. आपल्या लेकीच्या नावापुढे ‘डॉक्टर’ उपाधी असावी, अशी इच्छा शेवटी पूर्ण झाली होती. एक वर्तुळ पूर्ण झाले होते.

डॉ. कल्पना सरगर, एका महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाच्या प्रमुख, ‘रिसर्च क्रोनिकल अ‍ॅण्ड इंटरनॅशनल मल्टीडिसिप्लेनरी रिसर्च जनरल’च्या ‘एडिटर इन चिफ’ आणि धनगर समाज प्राध्यापक महासंघामध्येही त्या कार्यरत आहेत. शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील वर्तुळात त्यांनी स्वत:चे अस्तित्व निर्माण केले आहे.

भगवान बिरोबा आणि स्वामी समर्थांवर प्रचंड श्रद्धा असलेल्या डॉ. कल्पना यांचा जीवनप्रवास पाहिला, तर स्त्रीशक्तीच्या बहुआयामी कर्तृत्वाची साक्ष पटते. डॉ. कल्पना सरगर या माहेरच्या कल्पना नामदेव शेळके. धनगर समाजाच्या नामदेव आणि सुशिला शेळके दाम्पत्य मूळचे आष्टा सांगलीचे. नामदेव हे अत्यंत समाजशील. गावातल्या सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यामध्ये त्यांची उठबस. घरची शेती होती. वडिलोपार्जित छोटे घर होते. मात्र, नामदेव यांनी गावात दुसरे मोठे टोलेजंग घर बांधले होते. सगळे अगदी सुरेख होते. या दाम्पत्याला तीन मुले, त्यापैकी एक कल्पना. कल्पना या बाबांच्या लाडक्या. आपली लेक हुशार आहे, तिने डॉक्टर बनावे असे नामदेव बाबांना वाटे. त्यामुळेच दहावीनंतर कल्पना यांनी विज्ञानशाखेत प्रवेश घेतला.

मात्र, एक-दोन महिन्यांतच ती घटना घडली. नामदेव बाबांचा अपघात झाला. शेळके कुटुंबीयांच्या घराचे वासेच फिरले. त्यांच्या शस्त्रक्रियेसाठी राहते घर विकावे लागले. घरच्या अर्थार्जनावरही परिणाम झाला. सधन शेळके कुटुंबावर गरिबीची कुर्‍हाड कोसळली. यात एक समाधान होते की, नामदेव बाबा या आजारातून बरे झाले. मात्र, बारावीनंतरचा कल्पना यांचा वैद्यकीय शिक्षणाचा खर्च आता शेळके कुटुंबीयांना झेपणारा नव्हता. त्यामुळे कल्पना यांनी वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश न घेता, विज्ञान शाखेतून पदवीधर व्हायचे ठरवले. या सगळ्या काळात नामदेव यांना परिचित सांगत असत, “अरे तू असा आजारी. पोरीचं लग्न लवकर कर.” त्यावेळी नामदेव म्हणत, “माझी लेक शिकेल, चांगले स्थळ आले तर बघू.” बोला फुलाला गाठ पडली आणि कल्पना ‘बी.एस्सी.’च्या दुसर्‍या वर्षाला असताना त्यांना डॉ. शिवाजी सरगर या अत्यंत उमद्या आणि विद्वान तसेच कष्टाळू तरूणाचे स्थळ आले. त्यावेळी सरगर कुटुंबाचीही आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. मात्र, घरात शिक्षणाचे वारे होते. कल्पना यांचा विवाह डॉ. शिवाजी यांच्याशी झाला.

विवाहानंतर कल्पना यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. तसेच ‘बी.एड.’ही केले. याच काळात त्यांना दोन अपत्ये झाली आणि पती शिवाजी यांची बदली मुंबईला झाली. सरगर कुटुंब मुंबईला आले. सगळेच नवीन. इथे कल्पना यांनी घरातच खासगी शिकवणी सुरू केली. तसेच, इंग्रजी विषय घेऊन पदव्युत्तर पदवीतही शिक्षण पूर्ण केले. पदवी परीक्षेत त्या त्यांच्या महाविद्यालयातून प्रथम आल्या. घरदार कुटुंब आणि सगळे सांभाळत यश मिळवू शकले, या विचारांनी कल्पना यांना हुरूप आला. तसेच, डॉ. शिवाजी यांनीही त्यांना प्रोत्साहन दिले. दरम्यान मुले मोठी झाली आणि कल्पना आता प्रा. कल्पना म्हणून एका महाविद्यालयात रूजू झाल्या.

महाविद्यालयात काम करताना त्यांनी अनेक ठिकाणी संशोधनपर प्रबंध सादर केले, तर त्यातील सहा संशोधनपर प्रबंध प्रकाशित झाले. डॉ. कल्पना यांनी पाहिले की, अनेकदा संशोधनपर प्रबंध प्रकाशित होणे गरजेचे असते. मात्र, त्यासाठी व्यासपीठ मिळत नाही. आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास समाजातील प्राध्यापकांना ही समस्या भेडसावत असे. डॉ. कल्पना यांनी पतीच्या मार्गदर्शन आणि सहकार्याने समविचारी प्राध्यापकांच्या साथीने ‘रिसर्च क्रोनीक्लर अ‍ॅण्ड इंटरनॅशनल मल्टीडिसिप्लेनरी रिसर्च जनरल’ हे दोन महिन्यातून एकदा प्रकाशित करण्यास सुरुवात केली. या माध्यमातून हजारो संशोधन प्रबंध प्रकाशित झाले.
 
शैक्षणिक क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटवत असतानाच, डॉ. कल्पना या गरजू विद्यार्थ्यांसाठी कार्य करत होत्या. तसेच, समाजातील विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणातील टक्का वाढावा यासाठीही त्या काम करत आहेत. शिक्षण क्षेत्रामध्ये ‘रिसर्च स्कॉलर्स’ म्हणून संधी न मिळालेल्या हुशार बुद्धिमान व्यक्तींना त्या व्यासपीठ मिळवून देतात. डॉ. कल्पना म्हणतात, “बाबांची आणि पती डॉ. शिवाजी यांची मला मोलाची साथ होती आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मातेचे विचारकार्य प्रत्यक्ष जीवनात उतरवणारी मातृशक्ती उभी करण्यासाठी मला खारीचा वाटा उचलायचा आहे.” डॉ. कल्पना शिवाजी सरगरसारख्या विदुषी या समाजासाठी नेहमीच दीपस्तंभ आहेत.
9594969638
Powered By Sangraha 9.0