मराठी नाट्यसंपदेतील बालनाट्य परंपरा अखंड सुरु ठेवण्याचा ध्यास घेतलेल्या डोंंबिवलीच्या मधुरा संकेत ओक यांच्याविषयी...
मराठी रंगभूमीला 100 वर्षांहून अधिक मोठा इतिहास आहे. त्यातही बालनाट्याची वेगळी परंपरा असलेली मराठी, ही एकमेव भाषा असावी. पण, त्यातही आपले करिअर घडवणारे अगदी विरळच. मराठी रंगभूमीवरची फार मोठमोठी नावे यात आहेत. पण, आताच्या पिढीत बालनाट्याची परंपरा जपणार्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच. त्यात मधुरा संकेत ओक यांचे नाव घेतले जाते. मधुरा या गेली 16 वर्षे बालनाट्य क्षेत्रात काम करीत आहेत. आपल्या पतीसोबत ‘वेध अॅक्टिंग अकॅडमी’ची 2011 साली त्यांनी स्थापना केली. नाटकाचा वापर मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाकरिता करण्याचे मुख्य कार्य, ‘वेध’ मार्फत केले जाते. वेधच्या संचालिका असलेल्या मधुरा यांनी, संकेत यांच्या बरोबरीने ‘वेध’च्या शाखा विस्तारल्या आणि आतापर्यंत शेकड्याने मुले ‘वेध’मध्ये शिकत आहेत.
मधुरा यांच्या नाट्य प्रवासाची सुरूवात महाविद्यालयीन जीवनापासूनच झाली. वझे -केळकर महाविद्यालयामध्ये असताना , ‘अस्वस्थ अपूर्णांकाचे पडघम’ या एकांकिकेत त्यांनी मुख्य पात्र साकारले. तिथे आयएनटी, सवाई या मानाच्या स्पर्धेत, अभिनयाची बक्षिसे त्यांनी पटकावली. पुढे मॅन + वुमन = ड्रामा, ‘तेंडुलकरांची रात्र’ या एकांकिकेसाठी त्यांना उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून पुरस्कार मिळाला. तसेच महाराष्ट्र शासनाच्या नाट्य स्पर्धेत, उत्कृष्ट अभिनयाचे रौप्य पदकही त्यांना, ‘सारी रात्र’ या नाटकासाठी मिळालेले आहे. पण, हे करत असताना फक्त अभिनय नाही, तर बाकीही बाजू त्यांना अनुभवून बघायच्या होत्या. यासाठी ’श्रावण क्वीन’ या सौंदर्य स्पर्धेत त्यांनी भाग घेतला. त्यात पहिल्या दहा जणींमध्ये पोहचण्याचा व ‘बेस्ट एसएमएस क्वीन’ हा पुरस्कार त्यांना मिळाला. पण, पुढे सौंदर्य स्पर्धा किंवा मॉडेलिंग हे आपले क्षेत्र नाही, याची त्यांना वेळीच जाणीव झाली. त्यानंतर त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात आपले नशीब आजमावून पाहण्यास सुरुवात केली. त्यासाठी दोन मोठ्या वृत्तपत्राकरता, लेखन करण्यास सुरुवात केली. या दरम्यान मोठमोठ्या कलाकारांच्या मुलाखती घेण्याची संधी त्यांना मिळाली. पब्लिक रिलेशन्स, त्यात चालणारे काम जवळून बघता आले. मधुरा सांगतात की, “या सगळ्याचा उपयोग पुढे आकाशवाणीसाठी काम करताना झाला.” त्यांनी आरजे म्हणून आकाशवाणीसाठी काम केलेले आहे. पण, त्याचबरोबर आकाशवाणीच्या नाटकाच्या त्या ग्रेडेड आर्टिस्टही आहेत.
अभिनय, लेखन, निवेदन अशा तिन्ही आघाडींवर जोमात काम सुरू असताना, मुलांसाठी एक अभिनय कार्यशाळा घेण्याची संधी आली. तिथूनच मधुरा यांना एक सूत्र मिळाल्यासारखे झाले. “खरंतर अभिनय, निवेदन व लिखाण याची खमकी पार्श्वभूमी होती, मालिकांकरिता ऑफर होत्या. पण, मुलांसाठी ती कार्यशाळा घेण्याचा अनुभव मला बरंच काही देऊन गेला आणि मग तेच पुढे चालू ठेवायचे ठरवले,” असे त्या सांगतात.
“मुलांना नाटक शिकवताना, त्यांच्यावर नाटकाचे संस्कार करताना, त्यांच्यात आपसूक काहीतरी बदल होत आहेत, हे जाणवायचे. मग नाटक बसवताना असे काही प्रयोग मुद्दाम करून बघितले. नाटकाचा मुलांमध्ये खूप फरक पडतो आणि तिथूनच ‘वेध’चे बीज रोवले गेले,” असे मधुरा सांगतात.
मधुरा आणि संकेत या जोडीने एकत्र येऊन ‘वेध’ची सुरुवात केली. एकदा मुलांचे स्पर्धेत बालनाट्य उतरवायचे ठरवले. पण, वेगळा विषय काय? तर ‘सिंगल पॅरेन्ट’ असणार्या मुलांवर नाटक करायचे ठरले. ‘हरवली पाखरे’ हे नाटक त्यांनी लिहिले. त्यासाठी ’रविकिरण’ या मानाच्या बालनाट्य स्पर्धेत, उत्कृष्ट लेखनाचा पुरस्कार मिळाला आणि तिथून बालनाट्याच्या लिखाणाला सुरूवात झाली. ‘ओरिसा इंटरनॅशनल फेस्टिवल’मध्येही त्यांच्या बालनाट्याला उत्कृष्ट बालनाट्य व लेखनाचा पुरस्कार मिळाला.
मुलांना शिकवताना मागच्या 16 वर्षांत वेगवेगळ्या गोष्टींचे आयाम त्यांच्यासमोर आले. या 16 वर्षांत त्यांच्या कितीतरी विद्यार्थ्यांनी व्यावसायिक पातळीवर काम करत यश मिळवले आहे. मराठीमधील असे एकही पुरस्कार नाही, जे त्यांच्या ‘वेध’मधील मुलांनी मिळवलेले नाही, याचा त्यांना अभिमान आहेच. परंतु, उद्या मुले ऑस्करही नक्की मिळवतील, असा विश्वासही त्या व्यक्त करतात. मागच्या वर्षी ‘सुंदर ती दुसरी दुनिया’ हे ‘वेध’कडून त्यांनी दोन अंकी, महाबालनाट्य आणले. ज्याचा जागतिक विक्रमही झाला. यावर्षी 80 बालकलाकारांना घेऊन ‘जत्रा’ हे महाबालनाट्यही त्यांनी आणलेले आहे. या दोन्ही नाटकांचे अनुभव एकदा घ्यावेच असे होते. पण, याचे वैशिष्ट्य म्हणजे फक्त पाच प्रयोग या बालनाट्यांचे करतात. कारण, बालनाट्याचा असणारा आवाका बराच मोठा असतो. आता येत्या वर्षात मुलांकरिता अजून वेगवेगळे उपक्रम घेऊन येण्याचा, त्यांचा मानस आहे. त्यात चित्रपट, वेबसीरिज याचाही विचार आहे. त्यांनी नुकताच ‘वेध थिएटर’ हे नवीन वेंचरही सुरू केलेले आहे. ज्यात चित्रपटांचे प्रमोशन, मुलाखती असे सारे काही आहे आणि त्याच्या माध्यमातून नवीन कलाकार, आर्टिस्ट यांना प्लॅटफॉर्म देण्याचा त्यांचा उद्देश आहे. मधुरा सांगतात की, “जेन झीच्या पिढीमधून येणारे टॅलेन्ट अतिशय सुंदर आहे. मुळात वेगवेगळ्या गोष्टींमध्ये त्यांना खूप गती असते, त्यात सोशल मीडियामध्ये खूपच. ‘वेध क्टिंग अकॅडमी’ व ‘वेध थिएटर’च्या माध्यमातून येणार्या नवीन प्रोजेक्टवर आता त्यांचे काम सुरू आहे. अशा या हरहुन्नरी कलाकाराला पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरूण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा!