आज रामकृष्ण रामनगौडा पाटील उर्फ आर. आर. पाटील वयाच्या 75व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्या जाज्वल्य, चतुरस्र व्यक्तिमत्त्वाचा परिचय करून देणारा
हा लेख...
सर्वसाधारणतः प्रत्येक तरुण किंवा तरुणी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना, खुशमस्कर्या करणे, मौजमजा करणे, करमणूक करणे, मैत्री करणे, प्रेम करणे, गप्पागोष्टी करणे, निसर्गाच्या सान्निध्यात रमणे, पर्यटन करणे, छंद जोपासणे इत्यादी करीत असतात. परंतु, त्याला अपवाद माझा मित्र आर. आर. पाटील, ज्याला मी ‘आर. आर.’ असे संबोधितो.
आर. आरचे संपूर्ण नाव रामकृष्ण रामनगौडा पाटील. त्याचा जन्म दि. 23 डिसेंबर 1950 रोजी मुंबईतील मालाड या उपनगरात झाला. त्याचे वडील रामनगौडा लिंगनगौडा पाटील राज्याच्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्या तसेच स्थानिक यंत्रणा विभागाच्या सेवेत होते. त्याची आई कै. लक्ष्मीबाई पाटील गृहिणी होती. त्याला दोन मोठे भाऊ. सर्वात मोठा भाऊ महादेव म्हणजेच एम. आर. पाटील एक नामांकित स्थापत्य विशारद आहे. मोठा भाऊ कै. रामचंद्र गावी शेती करीत असे. त्यांचे हृदयविकाराने अल्पकालीन निधन झाले. आर. आरचे घराणे शेतकर्यांचे. त्यामुळे आर. आरला शेतीची उत्तम जाण आहे.
आर. आरची पत्नी कै. राधा वर्षापूर्वी देवाघरी गेली. त्याची एकुलती एक मुलगी डॉ. सौ. नुपूर भट्ट, ‘एमबीबीएस’ असून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहे. जावई राघव भट्ट आय.आर.एस. या केंद्र सरकारच्या सध्या राष्ट्रीय सुरक्षा विभागात महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहे. उभयतांना गतवर्षी कन्यारत्न प्राप्त झाले असून तिचे नाव कृतिका असे आहे. भट्ट कुटुंबीय नवी दिल्ली येथे वास्तव्य करून आहेत. ते मुळचे लखनौचे.
आर. आरचे शालेय शिक्षण उत्कर्ष मंदिर, मालाड या शाळेत झाले. त्याचे प्राथमिक शिक्षण मालाड पूर्व येथील लोकल बोर्ड शाळेत झाले. त्याचे महाविद्यालयीन शिक्षण अंधेरी पूर्व येथील चिनॉय कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड इकोनॉमिक्स येथे झाले असून त्याने वाणिज्य विषयात ‘मुंबई विद्यापीठा’ची पदवी प्राप्त केली आहे. त्याने राज्य शासनाच्या सहकार क्षेत्रातील ‘जीडीसीए’ परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
आर. आर. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच, त्याने ‘एल. एम. गानू अॅण्ड कंपनी’, तसेच ‘पी. व्ही. लक्ष्मणन अॅण्ड कंपनी’, ‘गांगल अॅण्ड तुळपुळे’ या तीनही सनदी लेखापालांसोबत काम केले आहे. तो गेली 25 वर्षे स्वतंत्रपणे पूर्ण वेळ सहकारी गृहनिर्माण संस्थांचे लेखापरीक्षण, सल्लागार म्हणून कार्यरत आहे.
आर. आरचे जन्मापासून 50 वर्षे मालाड येथे वास्तव्य होते. गेली 24 वर्षे कांदिवली (पश्चिम) चारकोप सेक्टर-5, मानव बिल्डींग येथे त्यांचे वास्तव्य आहे. पण, तो कायमच प्रसिद्धीपराङ्मुख राहिला आहे.
आर. आर. हा त्याच्या या नावाने महाविद्यालयीन शिक्षण घेत असल्यापासून तसा सुपरिचित. शालांत परीक्षा झाल्यावर त्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध आला व तेव्हापासूनचे त्याचे सार्वजनिक जीवन सुरू झाले. तो महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’च्या संपर्कात आला. तेथे त्याला सगळे ‘रामभाऊ’ म्हणत असत.
आर. आर. विद्यार्थी परिषदेचे कार्य करीत असताना तो वेळोवेळी मुंबईतील महाविद्यालयांना भेट देत असे. तेथील प्राचार्य, प्राध्यापकवर्ग, विद्यार्थ्यांशी हितगुज करीत असे. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करीत असे. तो विद्यार्थी परिषदेच्या संमेलनात सहभागी होत असे. तेथे त्यांचे माजी खा. कै. बाळ आपटे, रिझर्व्ह बँकेचे विद्यमान निर्देशक सतीश मराठे, संघाचे रविंद्र पवार, प्रा. अशोक मोडक इत्यादींशी चांगले संबंध प्रस्थापित झाले.
आर. आरचा कालांतराने जनसंघांशी संबंध आला. जनसंघासाठी निवडणुकीवेळी तसेच अन्य उपक्रमांत त्याचा सहभाग असे. त्यानिमित्ताने त्याचा स्वर्गीय आ. उत्तमराव पाटील, चंद्रबली सिंह, ग. भा. कानिटकर, माजी केंद्रीय मंत्री, उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, कुसुम अभ्यंकर, माधव मराठे इत्यादींशीही जवळचा संबंध आला.
आर. आर. एका बाजूस सकाळी महाविद्यालयीन शिक्षण घेत असे, नंतर अॅाडिटचे काम करी. संध्याकाळी, रविवारी, सुटीच्या दिवशी सार्वजनिक कार्य करीत असे.
आर. आरने पदवी प्राप्त केल्यावर ते 1970 साली त्याचे सार्वजनिक कार्य वाढत चालले. उत्कर्ष मंदिर, मालाड या शाळेची पालक संस्था ‘शिक्षण प्रसारक मंडळ, मालाड’च्या कार्यकारिणीवर त्याने सलग 30 वर्षे कार्य केले. संस्थेचे नाट्यमहोत्सव, एकांकिका स्पर्धा, व्यवस्थापन शिक्षक-शिक्षकेतरांच्या नेमणुका, विद्यार्थी प्रवेश, विविध स्पर्धा, क्रीडा महोत्सव, वार्षिक स्नेहसंमेलन, वार्षिक सभा इत्यादींमध्ये त्याचा सक्रिय सहभाग असे. संस्थेची आर्थिक घडी बसविण्याचे महत्कार्य त्याने सलग सहा महिने सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत प्रतिदिनी संस्थेच्या कार्यालयात बसून केले. संस्थेला महालक्ष्मी देवस्थान मुंबईकडून वेळोवेळी देणग्या मिळवून दिल्या. संस्थेच्या घटनादुरुस्तीतदेखील त्याचा महत्त्वाचा सहभाग होता.
आर. आरने मालाडच्या ‘श्री समर्थ पुस्तकालय’ व ‘लोकमान्य वाचनालय’ या संस्थेतही 25 वर्षे अविरत सेवा प्रदान केली. संस्थेचे अध्यक्षपदही भूषविले. संस्थेच्या पश्चिम व पूर्व येथील इमारतीच्या विस्तारात त्याचा महत्त्वाचा सहभाग होता. संस्थेसाठी त्याने बोधचिन्ह स्पर्धा राज्यस्तरावर आयोजित केली, ज्यात राज्यातील 200 कलावंतांनी सहभाग घेतला होता. त्यांचे परीक्षण नामवंत जाहिरातदार, कलाकारांनी केले होते. त्याचा बक्षीस समारंभ सुविख्यात व ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’च्या अध्यक्षा व उद्योगपती कै. प्रफुल्ला डहाणूकर यांच्या शुभहस्ते झाले. त्याने संस्थेत गो. नी. दांडेकर, विद्याधर गोखले, सुनील गावस्कर, पोलीस अधिकारी सुरेश पेंडसे, विनायकराव काकटकर, अरविंद पटवर्धन, माजी महापौर बाबुराव शेटे, माजी मंत्री जगेश देसाई इत्यादी मान्यवरांना आणले होते. संस्थेच्या पश्चिम इमारत विस्तार केल्यावर नवीन इमारतीचा पूर्णत्वाचा दाखला (बी. सी. सी.) त्याने केवळ एका दिवसात आणून दिला. ही ऐतिहासिक बाब आहे. त्याने ‘राजाराम मोहन रॉय फाऊंडेशन’, ‘महालक्ष्मी देवस्थान, मुंबई’ इत्यादींकडून संस्थेला अनुदान मिळवून दिले आहे. संस्थेसमोरील चौकाचे नामकरण ‘लोकमान्य वाचनालय चौक’ त्याने करून घेतले. पूर्वीच्या ठिकाणचे नामकरण ‘समर्थ पुस्तकालय’ करून घेतले. संस्थेच्या घटनादुरुस्तीतही त्याचा विशेष सहभाग होता.
आर. आर. मालाड पश्चिम येथील ‘मालाड युवक मंडळ’ संस्थेच्या व्यायाम मंदिरात, प्रतिदिनी सकाळी व्यायाम करावयास जात असे. संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्ताने त्याने संपूर्ण मुंबईची हुतुतू स्पर्धा व्यायामशाळेच्या पटांगणावर आयोजित केली होती. या स्पर्धेत प्रमुख पाहुणे म्हणून त्याने सुप्रसिद्ध कुस्तीपटू व माजी खासदार दारासिंग यांना आणले होते. त्यामुळे व्यायामशाळेचे नाव प्रसिद्धीस आले, त्या व्यायामशाळेचा पुनर्विकास ‘रोटरी क्लब ऑफ बॉम्बे नॉर्थ’ने केला, जेथे व्यायामशाळेसह ‘रोटरी आय सेंटर’ चालविले जाते.
आर. आरचा ‘नाट्यशिल्प, मालाड’ या संस्थेत महत्त्वाचा वाटा होता. या संस्थेतर्फे नाटके, एकांकिका सादर केल्या जात असत. नाट्यप्रशिक्षण दिले जात असे. काही वेळा आर.आरने भूमिका साकारल्या.
आर. आर ‘महाराष्ट्र हितवर्धक मंडळा’त अध्यक्ष होता. या संस्थेच्या उद्घाटनास सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. अनंत काणेकर आले होते. या संस्थेतर्फे विविध सांस्कृतिक, शैक्षणिक, संगीत कार्यक्रम आयोजित केले गेले. विशेषतः उस्ताद अल्ला खाँ व उस्ताद झाकीर हुसेन यांची पहिली तबला जुगलबंदी मालाड पश्चिम येथील महिला महाविद्यालय (एसएनडीटी) येथील सभागृहात आयोजित केली होती.
आर. आरचा ‘नादब्रह्म, मालाड’ या संगीत संस्थेत महत्त्वाचा वाटा होता. संस्था वेळोवेळी संगीताचे कार्यक्रम आयोजित करीत होते. प्रभा अत्रे, जनार्दन अभ्यंकर (तबलातरंग) मेघा तांबे (कविवर्य भा. रा. तांबे यांची नात) नृत्यनिर्देशक चंद्रप्रकाश शर्मा, देवेंद्र मुर्डेश्वर, धृव घोष, पंडित प्रभाकर धर्माधिकारी इत्यादी मान्यवरांचे कार्यक्रम आयोजित केले होते. एकदा संस्थेच्या पदाधिकार्यांनी आर. आरच्या अपरोक्त शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम मालाड पूर्वेला डॉ. सूचक रुग्णालयातील मोकळ्या जागेत आयोजित केला होता. प्रसिद्धी केली होती. मात्र, पोलीस परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे पोलिसांनी कार्यक्रमावर बंदी घातली. शेवटच्या क्षणी संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर. बी. तांबे, आर. आरकडे गेले व परिस्थिती सांभाळून घेण्यास विनंती केली. आर. आरने तत्काळ त्यावेळचे पोलीस आयुक्त एम. जी. मुगवे यांच्याशी संपर्क साधला व मुगवे साहेबांनी खास बाब म्हणून परवानगी दिली व कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडला. डॉ. नंदलाल सूचक कार्यक्रमास पूर्ण वेळ उपस्थित राहिले होते.
आर. आर. लिबर्टी गार्डन, मालाड (प) येथील गणेशोत्सवात अनेक वर्षे सहभागी झाला होता. त्यावेळीही विविध सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम आयोजित केले जात असत. श्रीगणेशाचे आगमन ते विसर्जन या दरम्यान आर. आर. सहकार्य करीत असे.
आर. आर. ‘फोरम ऑफ फ्री एन्टरप्राईज’ या संस्थेतही सक्रिय सहभागी होत असे. या संस्थेतर्फे दर महिन्यास एक तरी मान्यवरांची भाषणे आयोजित केले जात असत प्रामुख्याने बॉम्बे हाऊसच्या सभागृहात, तेथेही आर. आर. उपस्थित असे. तसेच, प्रतिवर्षी देशाचा अर्थसंकल्प लोकसभा व राज्यसभेच्या पटलावर मांडल्यावर, त्यावर विश्लेषणाचा कार्यक्रम ‘क्रिकेट क्लब ऑफ इंडिया’च्या क्रोबार्न स्टेडियमवर होत असे. हे विश्लेषण सुविख्यात कायदेतज्ञ नानी पालखीवाला सादर करीत असत. या कार्यक्रमावेळी आर. आरचा महत्त्वाचा सहभाग असे. या संस्थेचे उपाध्यक्ष कै. एम. आर. पै, दिवाकर यांच्याशी आर. आरचे घनिष्ट संबंध होते. कार्यक्रमानंतर पालखीवाला आर. आरशी संवाद साधत असत. या संस्थेतर्फे प्रतिवर्षी देशातील शाळा-महाविद्यालयीन स्तरावर वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली जात असे. त्यातील विजेत्यांना प्रजासत्ताक दिनी ‘इंडियन मर्चंट्स चेंबर’च्या सभागृहात खास आयोजित कार्यक्रमात बक्षिसे दिली जात असत. उद्योगपती ज्येष्ठ पत्रकार, नामवंत वकील इत्यादी अशा स्पर्धेचे परीक्षक असत.
आर. आर. मराठी व्यापारी, उद्योजक व व्यावसायिक संस्थेशी निगडित असून या संस्थेतर्फे आयोजित केलेल्या दादर येथील राजा शिवाजी विद्यालयातील पहिल्या राज्यव्यापी अधिवेशनात विशेष सहभाग होता. तसेच संस्थेच्या दादर येथील अॅन्टानिया डिसील्वा शाळेच्या पटागंणावर भरणार्या प्रतिवर्षीच्या व्यापारी पेठेच्या कार्यक्रमात सहभागी होत असे. संस्थेचे अध्यक्ष कै. जयंत साळगांवकर तसेच किशोर रांगणेकर, अनंत भालेकर, किशोर साठे इत्यादी पदाधिकार्यांशी त्याचे स्नेहसंबंध आहेत.
काही समाजसेवी व्यक्ती, संस्था स्थापन करणे असो वा कार्यवाही करणे असो आर. आरचा सल्ला घेण्यात, आर.आर. ते निस्पृहपणे देत आला आहे. आर. आर. देशाचा एक नागरिक या नात्याने केवळ सेवाभाव या वृत्तीने, आपल्या अनुभवाच्या, ज्ञानाचा उपयोग देशाच्या, समाजाच्या उन्नतीसाठी, विकासासाठी प्रयत्नशील राहिला आहे. आपला अधिकाधिक वेळ देशाच्या समाजाच्या भवितव्यासाठी उपयोगी पडावा या एका उदात्त हेतूने दिवस-रात्र अभ्यास, मनन, चिंतन, चर्चा, वाचन, संभाषण, लेखन इत्यादीद्वारे प्रयत्न करीत आला आहे.
आर. आरने शालेय शिक्षण झाल्यावर सार्वजनिक कार्याचा वसा अंगीकारलो, तो आजही तितक्याच जोमाने कार्यरत आहे. स्वतःच्या नावे तसेच ‘चैतन्य फाऊंडेशन’चा मुख्य विश्वस्त म्हणून देशाच्या राज्यांच्या विविध घटनात्मक संस्थांकडे पत्राद्वारे व्यक्तिशः भेटीद्वारे विविध विषयांवर संकल्पना, सूचना, मांडीत आला आहे. मात्र, त्याची त्यांनी कधी जाहीर प्रसिद्धी केलेली नाही. त्याच्या कौशल्यामुळे लहान-मोठे उपक्रम देशस्तरावर, राज्यस्तरावर राबविले जात आहेत. त्यातून माहिती म्हणून काही तशा संकल्पना इथे ऊहापोह करणे अपरिहार्य ठरते. ज्यावरून त्याचा दीर्घ दृष्टिक्षेप ध्यानात येतो. ‘चैतन्य फाऊंडेशन’चे रामचंद्र धनावडे, डी.वाय. आरोसकर, अशोक गरुड, अमोल गोखले, डॉ. पन्ना आशर, डॉ. नुपूर भट्ट हे अन्य विश्वस्त असून, या संस्थेस सीए संजय कनगुटकर, कै. चंद्रकांत शंकर गोखले यांचे सहकार्य लाभत आले आहे.
आर. आर. एक चमत्कारिक, विलोभनीय, आदर्श व्यक्तिमत्त्व आहे, ज्याने आपले सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची प्रमुख तीन तत्त्वे आपल्या जीवनात आचरणात आणली आहेत, जशी - 1) परद्रव्याची अभिलाषा न करणे 2) परनिंदा न करणे 3) परस्त्री मातेसमान मानणे. हे खरे तर अत्यंत कठीण आहे, अविश्वसनीय आहे, तितकेच सूर्यप्रकाशासारखे सत्य, स्वच्छ आहे. आर. आरला त्याच्या सद्गुरुंनी तो शालांत परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर स्वतःहून अनुग्रह दिला, त्यामुळे आर. आर आपले संपूर्ण जीवन, जीवनकार्य, सर्व यश सद्गुरुचरणी अर्पण करीत आला आहे. आर. आरने आपल्या सद्गुरुंचे जन्मस्थान व कर्मस्थान गोंदवले, तालुका माण, जिल्हा-सातारा, एवढेच नव्हे तर देशातील सद्गुरुंनी स्थापित केलेल्या मंदिरांची व्यवस्था अखंड अविरत व एकाच पद्धतीने चालावी म्हणून अभ्यासपूर्ण संकल्पना तयार करून सद्गुरुंच्या विश्वस्तांकडे विशेषतः बापूसाहेब दामले यांच्याकडे सोपवली. त्यामुळे देशातील महाराजांच्या सर्व मंदिरांत एकाच पद्धतीने, दैनंदिन उपक्रम राबविले जात आहेत. वेळप्रसंगी स्वतः गोंदवल्यास राहून तसेच काही मंदिराना भेटी देऊन त्यांनी संकल्पना मांडली आहे.
आर. आरला वाचनाची, लिखाणाची, मनन, चिंतन याची आवड महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानापासून आहे. रेल्वे, गाडी, बस, कार्यालय इत्यादी ठिकाणी तो वाचन, निरीक्षण करीत आला आहे. एकाच वेळी डोळ्याने पाहणे, कानाने ऐकणे, स्मरण राहणे याची त्यांच्या अंगी खुबी आहे.
एकाच वेळी पाहणे, ऐकणे, स्मरण करण्यासंबंधी असाच एक आर. आरशी संबंधित किस्सा आवर्जून सांगावासा वाटतो.
बर्याच वर्षांपूर्वी दहिसर पूर्वेला ‘शैलेंद्र एज्युकेशन सोसायटी’च्या एका कार्यक्रमास तत्कालीन सुप्रसिद्ध पोलीस अधिकारी द्वय सुरेश पेंडसे व विनायकराव काकटकर यांचा गुन्हे विषयक गोष्टीचा कार्यक्रम होता. पेंडसेंचे जवळचे नातेवाईक व राज्याचे एक शासकीय अधिकारी विद्धांस व त्यांचे सहकारी व संस्थेचे पदाधिकारी ग. स. पांडलोस्कर यांच्या विनंतीवरून आर. आर. त्या कार्यक्रमास उपस्थित राहिला होता. पेंडसे, वाकटकर व पांडलोस्कर कार्यक्रमात दंग होते, तर काही अंतरावर विद्धांस व आर. आर. यांची चर्चा चालली होती. दुस़र्या दिवशी पेंडसे व वाकटकर यांच्या भाषणाचा गोषवारा आर. आरने एका दैनिकात रेखाटला होता. तो वाचून विद्धांस व पेंडसे आश्चर्यचकित झाले होते. ते शब्दांकन तंतोतंत असल्याचे स्वतः पेंडसेंनी विद्धांस यांना सांगितले. विद्धांसनी आर. आर. पुढे हात जोडले, तर पेंडसेनी आर. आरला धन्यवाद दिले.
आर. आर आपल्या घरी एका बाजूस टीव्ही बघत असतो, दुसरीकडे लिखाण करीत असतो व तिसरीकडे फोन वरून वा प्रत्यक्ष वक्तव्य ऐकत असतो म्हणजे ‘थ्री इन वन.
’
समनामाचा एक किस्सा
आर. आरच्या बाबतीत एक मजेदार किस्सा घडला. बर्याच वर्षांपूर्वी राज्याचे गृहमंत्री राहिलेले कै. आर. आर. पाटील, आमदार असताना जे पूर्वी ‘रावसाहेब’ या नावाने सर्वांना परिचित होते, त्यांना ‘आबा’ असे संबोधित केले जात असे. या आबांना भेटावयास आर. आर. आमदार निवासात गेला होता. प्रथमतः आबांनी आर. आरशी कृष्णा खोरे प्रकल्पाबाबत विचारविनिमय केला व त्यानंतर आबांनी आर. आरकडून त्याचे ओळखपत्र म्हणजे व्हिजिटिंग कार्ड मागून घेतले. आर. आर. त्याच्या वयाच्या 15व्या वर्षापासून सार्वजनिक जीवनात प्रवेश केल्यावर ‘आर. आर.पाटील’ या नावाचे कार्ड छापीत आला आहे. व सर्वजण त्याला त्याच नावाने ओळखतात. आबा ते कार्ड पाहून म्हणाले, “अरे, हे नाव भारदस्त आहे. मी वापरले तर चालेल का?” आर. आरने आबांना जरुर वापरावे, असे सांगितले. कारण, असे नाव वापरण्याची प्रत्येकास मुभा आहे, कोणाचाही हक्क नाही. त्यानंतर ‘आबा’ ‘आर. आर. पाटील’ या नावाने पुढे आले व त्या नावाचा दबदबा सर्वांनी पाहिलेला आहे. या घटनेनंतर दोघेही मंत्रालयात तसेच काही समारंभात एकत्र भेटले आहेत.
शरीरसौष्ठवाचा एक किस्सा
आर. आर. व्यायामाचा भोक्ता. त्याचे सुप्रसिद्ध कुस्ती पैलवान व माजी खासदार दारासिंग यांचा चांगला परिचय होता. एकदा दारासिंग व त्यांचा लहान भाऊ रंधावा यांची परदेशी कुस्ती पैलवानासोबत वरळी येथील ‘नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया’ येथील स्टेडियमवर कुस्ती होती. दारासिंगनी आर. आरला यावेळी उपस्थित राहावयास सांगितले होते व आर. आर. उपस्थित राहिलाही. कुस्ती जिंकून स्टेडियम बाहेर पडताना दारासिंग व रंधावा दोघांनी आर. आरला आपल्या मागे प्रेक्षक येतील त्यांना रोखून धरावयास सांगितले. दारासिंग व रंधावा स्टेडियम बाहेर एका खोलीत कपडे बदलावयास गेलेे व कपडे बदलून तो मागच्या दाराने घरी परतले. तोपर्यंत आर.आरने एकट्याने प्रचंड जमावांस रोखून धरले होते. दारासिंग व रंधावा निघून गेल्यावर आर. आरने प्रस्थान केले व सुस्कारा टाकला. दारासिंग व रंधावा दोघांनी आर. आरला फोन करून धन्यवाद दिले.
आर. आर. केंद्र सरकार, राज्य सरकार, घटनात्मक यंत्रणा, स्थानिक यंत्रणा इत्यादींकडे विविध देशस्तरावरील देशहितार्थ, जनहितार्थ संकल्पना लिखित, प्रत्यक्ष भेटीत, चर्चेत मांडीत आला आहे. त्यापैकी बर्याच संकल्पना एकतर प्रत्यक्षात साकारण्यात आल्या, विचारार्थ घेतल्या, काही प्रलंबितही आहेत. त्यापैकी काही येथे मांडत आहे.
इलेक्ट्रोनिक इंडिकेटर्स (नामफलक)
रेल्वे, बसेस इत्यादी वाहतात तसेच रेल्वे स्थानके, विमानतळ, पोर्ट्स, बस स्थानके इत्यादी ठिकाणी इलेक्ट्रोनिक माध्यमाचा वापर केला जावा, जेणेकरून, प्रवाशांना दूरुनही संभाव्य स्थानके, वेळा, फलाट क्रमांक, गाडीचे नाव व क्रमांक विमानाचे नाव व क्रमांक, जहाज, बोटी यांचे क्रमांक व नाव, बसेसची नावे व क्रमांक गंतव्य स्थान इत्यादी आवश्यक माहिती स्पष्ट दिसावी, यासाठी आर. आर वेळोवेळी प्रयत्न करीत आला आहे. त्याचा उपयोग देश-परदेश येथील प्रवाशांना, पर्यटकांना मोठ्या प्रमाणात होत आला आहे. त्यातून संबंधित यंत्रणा त्यात वेळोवेळी आवश्यक त्या सुधारणा करीत आले आहेत. त्यामुळे प्रवाशांना आवश्यक माहिती वेळेवर मिळते, वेळेचा अपव्यय होत नाही, मनस्ताप सहन करावा लागत नाही. त्यातून रेल्वेवर सरकते जिने, लिफ्टस आदी सुविधांची उपलब्धता होत असल्याने ते सर्वांना सोयीस्कर, सुखकारक ठरले आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगजन, गर्भवती महिला, रुग्ण, पर्यटक यांना अतिशय फायदेशीर ठरत आले आहे.
रस्त्यावर होणारे वाहन अपघात रोखण्याबाबत
आपल्या देशात रस्त्यावर प्रतिवर्षी साधारणतः चार ते पाच लाख वाहन अपघात होतात व तेवढेच लोक अपघातात जखमी होतात, त्यातले काही, एक तर कायमचे जायबंदी होतात, काहींचे अवयव निकामी होतात व मोडले जातात, त्यातून साधारणतः दीड लाख लोक मृत्युमुखी पडतात. या विषयाचा आर. आरने प्रदीर्घ अभ्यास केला, प्रत्यक्ष रस्ते, हमरस्ते, उड्डाणपूल इत्यादी ठिकाणी उभे राहून पाहणी केली व त्यानुसार केंद्र व राज्य सरकारकडे संकल्पना मांडली, पाठपुरावा करीत आला आहे.
त्यातून मुंबई उच्च न्यायालयानेही या संकल्पनेस दुजोरा दिला आहे. ही संकल्पना सर्वोच्च न्यायालयापुढे प्रलंबित आहे. दरम्यान, या संकल्पनेवर आधारित केंद्र व राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय घेतले आहेत, त्यातून काही अमलात आणले गेले आहेत. केंद्र सरकारने या संकल्पनेपासून प्रेरणा घेऊन देशव्यापी एक सूत्रबद्ध परिवहन योजना आखली आहे, ज्याद्वारे सर्व दळणवळणाचे मार्ग एकमेकास जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे, जेणेकरून प्रवाशांना, पर्यटकांना सोयीस्कर ठरेल. त्यात विमानसेवा, जहान-बोटी सेवा, रेल्वे सेवा, बसेस, टॅक्सी, ऑटोरिक्षा, मेट्रो, मोनोरेल, अशा विविध दळवळणाचा त्यात समावेश असेल. त्यातून त्याची वेळीच व व्यवस्थित उपलब्धता होण्यासाठी संपर्क सहज सोपे करण्याचेही केंद्र सरकारचा विचार आहे. या संकल्पना व परिवहन प्रणालीवर विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी व रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी लक्ष देऊन आहेत.
अनैसर्गिक मृत्यूमुळे मोबदला मिळणे
एखादा माणूस अनैसर्गिकरित्या मृत्यू पावला, तर त्याच्या कुटुंबास आर्थिक मोबदला तोही यथोचित मिळाला पाहिजे, तेही मयत व्यक्तीचे वय, वार्षिक उत्पन्न, त्यावर आधारलेले कुटुंब यांचा विचार करणे आवश्यक असते. त्यातून रेल्वेत माणूस अनैसर्गिकरित्या मेल्यास रु. चार लाख, देशी किमान अपघातात मेल्यास रु. 50 लाखांवर, परदेशी विमानात अपघातात मेल्यास रु. एक कोटीही आर्थिक मोबदला मिळू शकतो. इतकी प्रचंड तफावत योग्य नव्हे, हे विचारात घेऊन आर. आरने केंद्र सरकारकडे केवळ आर्थिक मोबदला ते ही संपूर्ण देशस्तरावर व कोणत्याही परिस्थितीत मनुष्यहानी झाल्यास एक समान धोरणाने आर्थिक मोबदला दिला जावा, ही संकल्पना त्याने केंद्र सरकारपुढे मांडलेली आहे.
अनैसर्गिक मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाची हालअपेष्टा होणार नाही, हे पाहणे महत्त्वाचे आहे. किंबहुना, त्यासाठी आर. आरने केवळ मोबदला देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा देशस्तरावर, राज्यस्तरावर, जिल्हा स्तरावर उभारावी व त्यांना कायद्यान्वये अधिकृतरित्या अधिकार कार्यालये, मनुष्यबळ सोयी-सुविधा उपलब्ध करून दिले पाहिजेत.
निर्णयांची अंमलबजावणी
केंद्र सरकार, राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश, घटनात्मक यंत्रणा, सार्वजनिक उपक्रम, बँका, वित्तीय संस्था, प्रशासन इत्यादी नेहमीच धोरणे आखतात, निर्णय घेतात, ठराव पारित करतात, त्यांची जाहीर प्रसिद्धी केली जाते, मात्र त्यांची नीट व वेळीच, सर्व स्तरावर अंमलबजावणी केली जावी, याबाबतची संकल्पना आर. आरने केंद्र सरकार, राज्य सरकारांकडे सादर केलेली आहे. त्याची परिणीती वेळोवेळी दिसून येते. मात्र, त्यात, गतिमानता वाढणे, त्यांची योग्य प्रसिद्धी करणे आवश्यक असल्याचे त्याला वाटते.
देशात निवडणुका एकाचवेळी
आर. आरने देशातील लोकसभा व विधानसभा निवडणुका एकाच वेळी शक्यतो एकाच दिवशी घेण्याबाबत सूचना निवडणूक आयोग, केंद्रीय कायदामंत्री, पंतप्रधान यांच्याकडे केली होती. त्याचा विचार करून पंतप्रधान नरेंद्र मोदींना, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती व या समितीने तशी शिफारस राष्ट्रपती व केेंद्र सरकारकडे केली. त्यानुसार 2029च्या लोकसभा व विधानसभा एकाचवेळी होऊ शकतात. त्यामुळे बराच खर्च वाचेल. वेळेचा अपव्यय होणार नाही. वेळोवेळी आचारसंहिता लागू होणार नाही व विकासकामांना गती मिळेल, असे आर. आर. यांचे मत आहे. तसेच, निवडणुकांस जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करण्यासाठी यथोचित प्रयत्न करण्याचे निवडणूक आयोगाने ठरविले आहे.
आर. आरचे लेखन
आर. आरने विविध विषयांवर, दैनिकांत, मासिकांत, अंकांत विपुल लेखन केले आहे. माझ्या ‘सत्यता’, ‘बित्तंबातमी’ त्या ‘चित्रछायातही’ लेखन केले आहे. त्यांनी पुस्तकरुपी लेखनही केले आहे. मात्र, पैशाअभावी ते ते प्रकाशित करू शकला नाही. कारण, प्रकाशक पुस्तक प्रकाशनासाठी पैसे मागत आहेत. आर. आरने आपले आयुष्य गेली 60 वर्षे देश व सार्वजनिक हितासाठी निरपेक्षपणे व्यतीत करीत आला आहे. यातून प्रकाशनासाठी त्याच्याकडे लाखो रुपये नाहीत.
आर. आरचा षष्ठ्यब्धी समारंभ मालाड देवस्थानचे मुख्य विश्वस्त श्रीपाद त्रैलोक्य यांनी दि. 1 जानेवारी 2021 या दिवशी देवस्थानच्या आवारात आयोजित केला होता. यावेळी अध्यक्षपदी माजी केंद्रीय मंत्री व उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, प्रमुख पाहुणे म्हणून सारस्वत बँकेचे तत्कालीन अध्यक्ष किशोर रांगणेकर, विशेष पाहुणे म्हणून मुंबई मराठी पत्रकारसंघाचे तत्कालीन अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार प्रसाद मोकाशी उपस्थित होते. माझ्या ‘वैद्य प्रकाशन’तर्फे संपादित स्मरणिकेचे यावेळी विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात संस्कृत मंडित कै. वि. के. वैशंपायन यांच्या प्रार्थनेने झाली होती.
अनिकेत जोशी