भारतीय क्रीडा क्षेत्र यशाच्या उंचच उंच भरारी घेत आहे. भारतीय खेळाडू लहान वयोगटातील असो अथवा मोठ्या गटामध्ये बसणारा असो तो जिंकण्याच्या उद्देशानेच मैदानात उतरताना दिसत आहे. ही जिद्द जशी लहान मोठ्यांमध्ये सारखीच दिसते,तशीच ती स्त्री आणि पुरुष यांच्यामध्येही एक सारखीच दिसत आहे. त्यामुळेच भारतीय महिला आणि पुरुष खेळाडू विजेतेपदाला गवसणी घालत आहेत. याच विजेतेपदांच्या मालिकेतील काही आनंदमयी क्षणांचा घेतलेला आढावा...
जागतिक बुद्धिबळ पदक विजेता डी गुकेश अर्थात डोमराजू गुकेश, सिंगापूर येथून तो चषक घेऊन सोमवार, दि. 16 डिसेंबर 2024 रोजी मायदेशात परतला. चेन्नईच्या ज्या शाळेतून गुकेशच्या बुद्धिबळाची वाटचाल झाली, त्या वेलाम्मल शाळेने त्याच्या स्वागतासाठी, पत्रकार परिषद आयोजित केली होती. तेथे जल्लोषात झालेल्या स्वागताविषयी गुकेश म्हणाला की, “हे शानदार आहे. या अभूतपूर्व पाठिंब्याने मला ऊर्जा मिळाली. जागतिक अजिंक्यपद मिळवणे शानदार अनुभव आहे. भारतात ही ट्रॉफी पुन्हा आणणे खूप महत्त्वाचे आहे. या स्वागतासाठी सर्वांचे धन्यवाद. मला आशा आहे की, पुढील काही दिवसांमध्ये आपण एकत्रितपणे जल्लोष करत चांगला वेळ व्यतीत करू.”
सगळ्यांचे लक्ष आता गुकेशच्या पुढच्या चालीकडे लागलेले असेल. त्याची पुढील लढत, नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनविरुद्ध दि. 26 मे ते दि. 6 जून या कालावधीत होईल. जगातील सर्वांत बलाढ्य खेळाडूंपैकी एक कार्लसन, याच्याविरुद्ध नॉर्वेत खेळण्यास आपण उत्सुक असल्याचे गुकेशने सांगितले. मागच्या वर्षी गुकेश येथे तिसर्या स्थानावर राहिला. यंदा गुकेश विश्वविजेता या नात्याने कार्लसनला त्याच्या घरीच आव्हान देणार आहे. नॉर्वे बुद्धिबळाची लढत सहा-सहा पुरुष आणि महिलांमध्ये दुहेरी राऊंड रॉबिन पद्धतीने खेळवली जाईल.
या 18 वर्षाच्या गुकेश नंतर अजून एक बुद्धिबळपटू पदक घेऊन आला आहे. भारतीय ग्रॅण्डमास्टर प्रणव व्यंकटेश याने, स्लोव्हेनियाच्या ब्रेझिस येथील टर्मे कॅटेझ हॉटेलमध्ये नुकत्याच झालेल्या ‘फिडे वर्ल्ड यूथ यू-18 ओपन रॅपिड आणि ब्लिट्झ’ स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. त्याने संभाव्य 11 पैकी 9.5 गुण मिळवले. फि मास्टर अलेक्झांडर क्रिपाचेन्कोने, रौप्य पदक जिंकले. युक्रेनच्या रोमन पायरीहने कांस्यपदकावर समाधान मानले.
भारताचे क्रीडाक्षेत्र गेले काही दिवस गुकेशमय झाले होते, तर क्रीडा क्षेत्रात अजून काही घडामोडी घडत होत्या. त्यातील काही सर्वांसमोर ठळकपणे प्रसिद्धीस आल्या, तर फुटबॉलच्या मैदानावरची देशाप्रती असलेल्या दृढ ऐक्याचे प्रतीक असलेली वार्ता, त्या मानाने लोकांपुढे कमी आली.
भरगच्च भरलेल्या प्रेक्षकांनी कोलकात्याच्या ’सॉल्ट लेक’ म्हणजेच, अधिकृतपणे ’विवेकानंद युवा भारती क्रीडांगण’ या मैदानावर. मोहन बगान एस जी आणि केरळा ब्लास्टरस या दोन संघामध्ये, शनिवार, दि. 14 डिसेंबर 2024 रोजी फुटबॉलच्या इंडियन सुपर लीग अर्थात आय.एस.एल. या स्पर्धेतला एक सामना झाला. त्याचे औचित्य साधत बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या मुद्यावर सगळ्यांनी ‘वंदे मातरम’चा उद्घोष करत, आपल्या देशभावना व्यक्त केल्या.
भारतीय संघाने अजिंक्यपद मिळवत, ‘कनिष्ठ विश्वचषक महिला हॉकी स्पर्धा 2025’ मध्ये आपले स्थान निश्चित केले. हॉकीत भारतीय कनिष्ठ महिला संघाने, दि. 16 डिसेंबर रोजी एक बातमी मन सुखावणारी ठरली. मस्कत ओमान येथे महिला ज्युनियर आशिया चषक स्पर्धेच्या विजेतेपदाचा चषक भारतात आणला आहे. भारतीय कनिष्ठ महिला संघाने, अंतिम सामन्यामध्ये हेवीवेट चीनचा 1-1 आणि 3-2 असा शूट आऊटमध्ये पराभव करून विजय मिळवत, प्रतिष्ठित करंडक पुन्हा जिंकला. स्टार ड्रॅगफ्लिकर दीपिकाने भारताच्या विजेतेपदाच्या मोहिमेत, जबरदस्त भूमिका बजावली. कारण, तिने पाच पेनल्टी कॉर्नरवरून 12 गोलांसह स्पर्धेचा शेवट गोड केला. फायनलमध्ये, महिला ज्युनियर आशिया चषकातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल धन्यवाद, भारताने चिली येथे होणार्या एफ.आय.एच. कनिष्ठ विश्वचषक 2025 मध्येही आपले स्थान निश्चित केले आहे.
भारताची आघाडीची गोल स्कोअरर दीपिका विजेतेपद जिंकल्यानंतर खुशीत म्हणाली, “मी इतके गोल करण्यात यशस्वी झाले, याचा खरोखर आनंद आहे. पण, माझ्या सहकार्यांच्या मदतीशिवाय हे शक्य झाले नसते. शिबिरातील प्रत्येक खेळाडूने खूप मेहनत घेतली आहे आणि प्रत्येकाच्या प्रयत्नाशिवाय आम्ही विजेतेपद जिंकू शकलो नसतो. इतर फॉरवर्ड्सचे आभार. आम्ही बरेच पेनल्टी कॉर्नर जिंकले आणि मी त्यांचे गोलमध्ये रूपांतर करू शकले.” ती पुढे म्हणाली, “काही तरुण खेळाडूंमध्ये अतुलनीय क्षमता आहे आणि मला खात्री आहे की, ते संघाच्या यशाची उभारणी करतील.” तर कर्णधार ज्योती सिंग म्हणते, “मला आनंद आहे की, प्रशिक्षणात संघाने घेतलेली मेहनत अखेर फळाला आली आहे. संपूर्ण स्पर्धेत आम्ही क्वचितच चूक केली आणि मला माझ्या सहकार्यांचा अभिमान आहे की, त्यांनी इतक्या उच्च दर्जाची कामगिरी केली. अंतिम फेरीत चीनला सामोरे जाणे हे आव्हान होते. पण, आम्ही मैदानावर आमचे सर्वस्व दिले आणि चषक मायदेशी परत आणला. दीपिकाने गोलसह उत्कृष्ट कामगिरी केली. कनिका सिवाच, सुनेलिता टोप्पो आणि मुमताज खान यांनीही, आक्रमणात चांगली कामगिरी करत,. दीपिकाला तिच्या स्कोअरिंगमध्ये साथ दिली.”
यानंतर सगळे सायकलकडे धावलेले दिसले. केंद्रीय क्रीडामंत्री मनसूख मांडविया यांनी मंगळवार, दि. 17 डिसेंबर रोजी दिल्लीच्या ध्यानचंद नॅशनल स्टेडियमवर, फिट इंडिया सायकलिंग ड्राईव्हला हिरवा झेंडा दाखवला. सायकलीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने, मनसुख मांडवियांनी चळवळीचा एक भाग म्हणून सायकलस्वारांच्या तुकडीचे नेतृत्व करत, ‘फिट इंडिया सायकलिंग ड्राइव्ह’द्वारे देशव्यापी फिटनेस चळवळीला बळकटी दिली. क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, खासदार तेजस्वी सूर्या, क्रीडापटू सिमरन शर्मा, नितू घनघास आणि प्रीती पवार यांच्यासह सुमारे 500 सायकलप्रेमी, मंत्रिमहोदयांसमवेत सामील झाले. युवा मामले आणि क्रीडा मंत्रालयाची फिट इंडिया मोहीम, भारतीय सायकलिंग महासंघ, एमवाई भारत संघटना, विविध क्रीडा प्राधिकरण यांच्यामार्फत आरंभलेल्या कार्यक्रमात, देशभरात हजाराच्या आसपास ठिकाणी एकाचवेळी ती मोहीम आयोजित करण्यात आली. त्यात अंदाजे 50 हजारावर लोक सहभागी झाले होते.
सायकलिंगला समर्थन मिळावे म्हणून, मनसुख मांडविया तसेच इतर मंत्रिमहोदयांसह अनेकांनी, आपल्या कार्यालयात जाण्यासाठी सायकल प्रवास केला. लोकांमध्ये जागरूकता उत्पन्न व्हावी म्हणून, ते स्वतः सायकलिंग करुन दाखवत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फिट इंडिया मोहिमेतील एक भाग म्हणून, ‘फिट इंडिया सायकलिंग ड्राईव्ह’ला ओळखले जात आहे. माणसे तंदुरुस्त राहावी ते प्रदूषणमुक्त असावे, यासाठी असे प्रोत्साहन दिले जात आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी जवळच्या जवळ एकदोन किलोमीटर अंतरावर ये-जा करण्यासाठी, सायकलचा वापर करावा, अगदी रोज जरी शक्य नाही झाले तरी रविवारसारख्या सुट्टीच्या दिवशी तरी सायकल वापरावी. ‘संडे ऑन सायकल’चा नारा त्यांनी त्या प्रसंगी दिला. संसदपटू तेजस्वी सुर्या यांच्यासारख्यांचा त्यातील सहभाग लक्षणीय होता. गोव्यात नुकत्याच झालेल्या ‘एंड्युरन्स रेस’मध्ये, तेजस्वी सुर्या यांनीदेखील सहभाग घेतला होता. या एंड्युरन्स रेसमध्ये 1 हजार, 900 मीटर पोहणे, 90 किलोमीटर सायकलशर्यत, 21.1 किलोमीटर धावणे, अशांचा सहभाग असतो. पंतप्रधान मोदींनीही त्यांना दाद दिली होती. अनेकजण काळाच्या ओघात सायकल सोडून पेट्रोलवरच्या, इलेक्ट्रिकवरच्या स्कूटर, मोटरसायकल सारख्या स्वयंचलित दुचाकी, मोटारींसारख्या चारचाकी याचा वापर सर्रास करु लागले आहेत. आपल्या शरिराचे वजन वाढले म्हणून व्यायामासाठी परत सायकलिंग करु लागले. वाहतुकीचे साधन म्हणून यादृष्टीने सायकलचे महत्त्व विशेष आहे.
आपल्याकडे प्रत्येक पालक आपल्या मुलामुलींना तीन चाकी सायकलपासून, सायकल द्यायला चालू करतात. मुलांना सायकलचे वेड लावायला चालू करतात. काही दिवस आपणही मुलांबरोबर सायकलिंगचा आनंद घेतात. पण, बघता बघता पालक सायकलपासून दूर होऊ लागतात. म्हणून घरातल्या लहानांबरोबर मोठ्यांनी ‘फिट इंडिया सायकलिंग ड्राइव्ह’ला बाकीच्यांसारखाच इतर वेळीही पाठिंबा द्यायला हवा.
क्वालालंपूर येथे क्रिकेटमध्ये भारतीय संघाने 19 वर्षाखालील ‘महिला आशिया चषक 2024’ च्या स्पर्धेत दमदार कामगिरी करून दाखवत, अंतिम फेरी गाठली. 19 वर्षांखालील भारतीय महिलांसारख्या, संघाने अंतिम चारच्या लढतीत, श्रीलंकेला पराभूत केले. रविवारी गतविजेत्या बांगलादेशविरुद्ध रंगलेल्या त्या सामन्यात, भारताने विजय पटकावला.
भारताचे कनिष्ठ खेळाडू सध्या देशात व परदेशात लहान वयाच्या क्रिकेटसारख्या तसेच, हॉकीपटूंसाठीच्या हॉकीसारख्या खेळात स्पर्धा जिंकत आहेत. वयाने लहान असो वा मोठा, मोठ्यांचेही बुद्धिबळासारखे जगज्जेतेपद एक 18 वर्षे वयाचा नवयुवक मिळवत आहे. हे भारतीय क्रीडाविश्वाला सन्मान देत आहे. त्याच जोडीने लहानपणाची सायकल, आपले मंत्रिमहोदय मोठ्यांच्याही वापरात आणायला प्रोत्साहित करत आहेत. एकूणच ही डिसेंबरातली छोट्यांची(?) कामगिरी भारतीय क्रीडाक्षेत्राला उद्युक्त करत आहे, हे लक्षणीयच आहे.
श्रीपाद पेंडसे
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख,
पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत.)